अनुरूप पत्रे-१

कॉलेज मध्ये असताना (२००३ पर्यंत ) मी डायरी मध्ये काही तरी लिहायचो. त्यातली ही काही...

काल बऱ्याच दिवसांनी घरी गेलो. टेपरेकोर्डेर वर जगजित सिंग सुरू होता...

                               कभी यू भी तो हो..

                              पूरे चांद की रात हो..

                              और तुम आवो..

                              कभी ....

पून्हा तुझी आठवण आली. तुझी आठवण देणारी पत्र मला नको असतानाही ड्रावर मधून निघाली. कुलूप जुनाट झालं होत. पण चावी लवकरच फिरली. म्हणजे अजूनही ते आतून गंजलेल नव्हत. पण तुझं मन?

तुझी एक एक पत्र मी बघत होतो आणि काळाच्या मागे जात होतो.. उण्यापुऱ्या चार वर्षांचा काळ... या चार वर्षात जेवढा आनंद मी मिळवलाय तो पुन्हा कधी मिळेल का? एक एक पत्र पाहत होतो, तसतसे हात थरथरत होते. ज्या पत्रांमुळे माझे हृदय धडधडत होते, ते आज कठोर बनले होते, मग हातांना कंप का सुटावा?

तुझ्या पत्रांना अजूनही तोच रंग होता, गंध होता. तुझी अक्षरही तशीच होती, पण मग कमतरता कशाची होती? त्या पत्रात असणाऱ्या ओलाव्याची. पार कोरडी झाली आहेत त्यातील अक्षरे.

शेवटच पत्र पाहून लक्षांत आलं, पत्रांचा कोरडेपणा नाहीसा झालाय, पण त्याचबरोबर एक गोष्टही झाली आहे. गंध तर निघून गेला, पण रंग आणखी गहिरा झालाय माझ्या अश्रूंनी...