तिची आठवण!!!

शांत, थंड आणि मनोहर वाऱ्याची झुळुक येत होती. साधारण सायंकाळचे सहा वाजले असतील. ऑफिसचा निम्मा स्टाफ सुटीवर गेला होता. मलादेखील ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे आज दहा वाजेपर्यंत थांबण्याची इच्छा नव्हती. काम असो नसो, मी घरी लवकर जातच नव्हतो. माझे सर्व कलीग "तू कितीही वेळ थांबलास तरी तुला पगार तेवढाच मिळणार आहे, तो जादा होणार नाही. " असे माझी चेष्टा करायचे. मी केवळ स्मित करून याला प्रतिसाद द्यायचो. त्यांना कुठे माहिती होतं, खरं कारण, काय आहे ते? मनाची सारखी चालू असलेली चुळबूळ थांबत नसल्यामुळे त्याला बाहेर फिरवून आणण्यासाठी मी बाहेर पडलो. काही वेळ कंपनीच्या मनोरम्य वातावरणात फिरत होतो. पण, मनाला नेहमी जास्तच हवं असतं. त्याच्या बालहट्टाला पूर्णं करण्यासाठी शेवटी मी गाडिला किक मारली. काही वेळ हायवे वर ड्रायविंग केल्यानंतर मी वस्तीकडे वळलो.

वातावरणात सर्वत्र एक निराळे चैतन्य जाणवत होते. जणू दिवाळीची चाहूल लागल्यामुळे निसर्गसुद्धा तिच्या स्वागताची तयारी करत होता. पारिजातकाचा सुगंध दरवळत होता. त्या इवल्याश्या श्वेतपुष्पांचा गजरा दिवाळीला अर्पण करण्यासाठी झाडांनी अंगावर धारण करून ठेवला होता. माणसे, झाडे, पुष्प, फले, प्राणी प्रत्येकाने आपापल्या परीने दिवाळीच्या स्वागताची जबाबदारी घेतली होती. वसुधेने देखिल एक निराळी योजना आखली होती. तिच्या अंगावर पडणाऱ्या प्रत्येक सलिलाच्या अंशागणिक 'मृद्गंध' नावाचे अत्तर ती सृष्टीला परत देत होती आणि दिवाळीच्या स्वागताच्या जय्यत तयारीमध्ये हातभार लावत होती. संबंध सृष्टीमध्ये हर्षवायू पसरला होता, "दिवाळी" साजरी होत होती. इकडे त्याच सृष्टीमध्ये एका ठिकाणी मन आठवणीच्या कोंदट गुदमरणाऱ्या वाऱ्यामध्ये घुसमटत होते. त्याचे "दिवाळे" निघत होते.

लहान मुले फटाक्याच्या धुंदीत होते. घरातील आजी आजोबा त्यांच्याकडे लक्ष ठेवत होते. ज्येष्ठ कनिष्ठांना रस्त्यावरच्या रहदारीकडे लक्ष ठेवून काळजीपूर्वक दूरून फटाके उडविण्यास बजावत होते. पण, ऐकतील तर ती मुले कसली? त्यामुळे ज्येष्ठांची धावपळ होत होती आणि त्यांना धापा लागत होत्या. इकडे, घरातील बायका, पाणी शिंपडणे, रांगोळ्या काढणे यात गुंतल्या होत्या. मध्येच त्या घरच्या ज्येष्ठांना जास्त मुलांमागे धावपळ करू नका असे सांगत होत्या. म्हणतात, म्हातारपण आणि बालपण यात फारच थोडा फरक असतो. दोघांनाही दुसऱ्यांचे ऐकायला नको असते. तेदेखील, 'आमच्या अंगात फिरण्याची ताकद आहे अजून' असा आव आणत दुर्लक्ष करत होते. दूरवरून आकाशामध्ये दिसणाऱ्या रॉकेटमुळे, जवळपास दिसलेल्या ऐकाऐक सर्वत्र निशेला प्रकाशसंध्यास्नान घालणाऱ्या अनारामुळे मुले आणखीनंच चेकाळून फटाके उडवत होती. हळूहळू तिमिराचे आक्रमण सुरू झाले. त्या आक्रमणापासून आपापले घर वाचविण्यासाठी सर्व दिवे एकत्र येऊन स्वतःचे रक्त जाळून तेजशर तयार करण्यात गुंतले होते. या पहारेकऱ्यांची युद्धनिती बघण्यासारखी होती. घरातील अंगणाच्या अगदी मध्यभागी सेनापती तुळशीच्या किल्ल्यामध्ये बसून सर्व सेनेला आधारस्तंभ बनून होता. त्याच्या नुसत्या अस्तित्वाने संपूर्ण अंगणामध्ये प्रकाशशर उधळत होते आणि इतर सैन्य शत्रूंवर त्या पासून प्रेरणा घेऊन तुटून पडत होते.

स्वामी विवेकानंद म्हणतात, "मनाला सतत इंद्रियाच्या खिडकीतून बाहेर बघायला आवडते. " इथे आता मनाला खिडकीतून बाहेर साक्षात दिवाळी दिसली होती. तेव्हा तर त्याने आनंदी व्हायलाच हवे! पण, काय त्याची धुसमुस वाढत होती. गाडी घराजवळ येत होती. पण, त्याने चक्क घरी जाण्यास नकार दिला. ते घर आपले नाहीच. ती तर झोपण्यासाठी किंबहुना झोपण्याचे नाटक करण्यासाठी पाया पडून 'भाड्याने' घेतलेली जागा होती. असे मनाने मला सुचवले. त्याच्या समाधानासाठी मी गाडी परत वळवली. थोड्या दूरवर आलो, तेथे एका दुकानात जाऊन "दुःखावरचे आठवणीवरचे औषध" घेतले. मी आजारी आहे हे संपूर्ण जगात फक्त मलाच माहीत होते आणि त्याचा इलाजही मलाच माहीत होता. काही दूरवर असलेल्या मोकळ्या ठिकाणी गाडी आपोआप येऊन थांबली.

गाडी उभी करून मी जवळच्या बाकावर बसलो. काही दूरवर तुरळक जोडपी दिसत होती. निशेने सृष्टीला आपल्या कुशीत संपूर्ण ओढले नव्हते पण बऱ्यापैकी अंधारून आले होते. मी आय पॉड खिशातून बाहेर काढला आणि हेडफोन कानामध्ये घातला. हाय म्युसिकमोडवर गाणे सुरू केले आणि "औषध" खिशातून बाहेर काढले. औषधाच्या कॅनचे झाकण उघडले. "टॅट... " असा आवाज झाला आणि फस्स..... आवाजासकट फेस बाहेर येऊ लागला. मी कॅनचे तोंड ओठामध्ये दाबून धरले. अतिशय कडू असल्यामुळे लवकरच माझे डोळे लाल झाले. जसे जसे औषध पोटात उतरत होते तसा तसा मनाला तजेला येत होता. पूर्णं कॅन पोटात रिचवून मी तिचे अवलोकन केले. "कॅनॉन १००००" अगदी सुरेख आणि सुंदर अक्षरात लिहिले होते. तिचा आकार, वर्ण सर्वच जणू फुरसतीमध्ये बनविल्यागत वाटत होता. एवढे असूनसुद्धा तिला स्वतःविषयी अजिबात गर्व नव्हता. माझ्या शरीराचा ती श्वास होती. माझ्या मनाचा तजेला होती. मला जगण्यासाठी आता तिच्या सहाऱ्याची आवश्यकता होती. कॅन बाजूला ठेवून मी बाकावर आडवा झालो. पार्थिवाशी माझा संबंध तुटला होता. मी डोळे घट्ट मिटले होते.

... अहाहा!!! काय स्मित होते तिचे! मधालादेखील गोडवा हिच्यास्मितामुळेच मिळत असावा. काय स्त्रिसुलभ लाज तिच्या चमकदार डोळ्यात होती. वाटते जणू, लाजाळूच्या झाडानेही हिच्याकडूनच लाजणे शिकले असावे. काय घनदाट, रेशमी, लांबसडक अश्वेत केस. निश्चितच मेघांना दाटणे, निशेला काळोखणे आणि वेलींना लांबणे हिच्याकडूनच लाभले असावे. ते सूर्याला तेज देणारे पांढरेशुभ्र दात. कळीसारखे छोटेसे नाजुक नाक आणि बघताक्षणी स्वतःला विसरण्यास भाग पाडणारे बोलके मौक्तिकाप्रमाणे भासणारे ते लोचन. दहावीच्या ट्युशन्सला जाण्याचा माझा एकमेव उद्देश. एकतरी दिवस ती या वेड्या मनाची भक्ती ऐकून तिच्या होकाराचा वर देईल. देवाला भक्ताची भक्ती माहीत असूनही तो केवळ परीक्षाच बघतो. म्हणून मूर्तीला देव मानणाऱ्या माणसानेदेखील त्याच्या भक्ताची परीक्षा बघावी हे कितपत योग्य आहे? की मूर्तीची भक्ती करता करता माणूसही मूर्ती होतो. भावनाशून्य दुसऱ्याच्या मनाचा विचार न करणारा. ट्युशन्स आटपत आल्या. पेपरसेट सुरू झाले. (तिला)वेळ मिळेनासा झाला. मी अजूनही अभ्यास न करता, भविष्याचा विचार न करता केवळ तिच्याच विचारात दिवस काढत होतो. परीक्षा कधी आली आणि कधी गेली कळलेसुद्धा नाही. ती आता परत कधी दिसेल की नाही हे सुद्धा माहीत नव्हते. मी केवळ तिच्या शोधात सर्वत्र फिरत होतो.

एक दिवस निकाल लागला. मित्राकडून तिचा निकाल कळला. तिला म्हणे परसेंटेज कमी पडले आता ती कॉमर्सला जाणार आहे. माझ्या निकालावर सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. लहानपणीपासून हुशार समजल्या जाणाऱ्या माझा मेरिट अगदी थोड्या गुणांमुळे हुकला होता. माझ्या नाराजीचे हेच कारण सर्वांना वाटत होते, त्यामुळे प्रत्येक जण माझे सांत्वन करू पाहत होते. अकरावी सुरू झाली. तीसुद्धा माझ्याच कॉलेजमध्ये पण कॉमर्सला आणि मी सायंसला. क्वचित ती दिसत होती आणि या भक्ताच्या मनात भावनेचा पाझर वाहवत होता.

एक दिवस मित्राकडून बातमी आली. "ती तुझा खूप राग करत होती रे! नशीब तू कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. नाहीतर खूपच मोठी भानगड झाली असती. या श्रीमंत मुलींचा काही नेम नाही. तुला खूपच मोठे नुकसान सहन करावे लागले असते. तुला आयुष्यातून उठवणार होती म्हणे ती असे ती म्हणत होती तिच्या मैत्रिणीजवळ. आता बघ! परधर्मीयासोबत फिरते तेदेखील "बांड्या"मुलाबरोबर! " ती परधर्मीयावर प्रेम करते या गोष्टीचे दुःख अजिबात नव्हते. परधर्मीय काय माणसे नसतात. पण, मी काय चूक केली होती की हिंदू आहे
म्हणून मी चूक केली? ती पण तर हिंदूच आहे. हिंदू मुली सगळ्या अशाच असतात का? दुसऱ्यांचा विचार न करणाऱ्या. प्रेमाच्या बदल्यात तिरस्कार देणाऱ्या? मी तर तिच्यावर प्रेम करत होतो तिला कधी त्रास नाही दिला मग माझा राग का? दुसऱ्यांवर प्रेम करण्यासाठी काही कारण लागत नाही पण, राग करण्यासाठी निश्चित कारण लागते. आणि माझे तिच्याविषयीचे निरासक्त प्रेम जर रागाचे कारण असेल तर? अतिशय हळवा स्वभाव असणाऱ्या माझ्यावर या घटनेचा दूरगामी परिणाम झाला. मी हसणे विसरलो. आयुष्याविषयी नकारार्थी झालो...... वयाच्या सोळाव्या वर्षी केलेले पहिले प्रेम शेवटले ठरले.

अचानक कोणीतरी मला हालवून जागे केले. उठून बघतो तर रात्र चांगलीच वाढली होती. प्रथम, हेडफोन बाजूला केला. "निगडे, घ्या या *****ला आत! " शिव्या आणि आवाजातला माजलेपणा ऐकून हे नक्कीच पोलीस आहेत हे मला लगेच समजले. मागच्या गाडीचा लाइटमध्ये आधी मला काहीच दिसत नव्हते, पण हळूहळू चित्र स्पष्ट झाले. आता आम्ही दोघेही एकमेकांना स्पष्ट बघू शकत होतो. "काय केले मी साहेब? " मी नेहमीपेक्षा थोड्या नरम आवाजात बोललो. "काय केले? सार्वजनिक स्थळी दारू पिताना लाज नाही वाटत का रे, *****? " "साहेब, आय ऍम सॉरी पण, माझ्यासाठी ते औषध आहे, मला त्याने नशा येत नाही, ते माझ्या जगण्याची गरज आहे" माझ्याकडे त्याने एकदा निरखून बघितले. "काय करतो तू? " "साहेब, सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे" "या गोष्टी तुम्हाला शोभत नाही. " सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हटल्याबरोबर त्याने मला मान देण्यास सुरुवात केली. आणि "तू" ऐवजी "तुम्ही" म्हणू लागला. माझ्याजवळ आय पॉड, अनामिकेत सोन्याची अंगठी, पीटर इंग्लंड चा शर्ट आणि लेविस ची जीन्स बघून तो थबकला. "रात्रीचे दहा वाजले तुम्ही आता घरी असायला हवेत. आतंकवाद वाढतो आहे, केव्हाही कोठेही बॉंबं असू शकतो. तुम्हाला काही झाले म्हणजे आधी आम्ही लोक बदनाम! ""मरण येईल इतक्या लवकर इतके चांगले नशीब नाही माझे! आणि घरी कोणासाठी जाऊ मी. माझ्याविषयी सहानुभुती बघू शकेन असे डोळे घरी नाहीत. आज ऑफिसमधून लवकर बाहेर पडलो म्हणून येथे आलो नाहीतर येथे येत नाही मी नेहमीच. "तुमच्यावर कुठल्या केसेस फाइल होऊ शकतात सांगू? " "त्यामुळे फाशीची शिक्षा होऊ शकते का? असे तर लवकर केसेस फाइल करा आणि मला फाशी द्या! " माझ्या या उत्तराने तो हादरला.
"एवढे चांगले आयुष्य का बरबाद करत आहात? " पोलिसांनादेखील दया येते माझी फक्त तिला आली नाही किती विटंबना!! "आयुष्य उरले असेल तर बरबादी, सर! " माझ्या डोळ्यात पाणी बघून प्रॉब्लेम सीरियस आहे असे त्याला उशीरा का असेनावाटले "काही सीरियस प्रॉब्लेम आहे का? " "माणूस जन्माला का येतो? " "निगडे, याला जरा दारू जास्त चढली आहे, जरा पाणी घ्या" तो बाजुच्याला बोलला. "आणि सोबत जहरही! " माझ्या बोलण्याने निगडेही जागेवरच थांबला. "काय प्रॉब्लेम आहे लवकर सांगा, माझं डोकं फिरवू नका. "

"मी केले प्रेम! तिने केला काहिरचा अपमान!
काय सांगू हे राम! या सादिकाचा झाला किती 'सन्मान'! "

"चला पाचशे रुपये काढा आणि लगेच घरी जा इथून. " माझी एकंदर अवस्था बघून त्याने माझ्यावर दया केली आणि पाचशेच मागितले. त्याच्यासोबत जास्त बोलण्यात अर्थ नाही हे मला माहीत होते, म्हणून मी चुपचाप पैसे दिले, जवळ ठेवू तरी कोणासाठी? तो निघून गेला पण, मी तेथेच थांबलो. आठ वर्षे होऊन गेली तिला बघितल्याला. कशी दिसत असेल ती माहीत नाही. काय करत असेल कुठे असेल काहीच माहीत नाही. तिच्यापासून कितीही दूर आलो तरी माझ्याहृदयाच्या ती तितकीच जवळ आहे आजही. पण, आता माझा कशावरही विश्वास नाही. देव, प्रेम, समाज, दया, नशीब, यश, अपयश सगळं खोट आहे, भास आहे. हे आयुष्यच भास आहे. मुलगी शंभर टक्के खऱ्या प्रेमामध्ये धोका देते. तिला प्रेम नको असते. तिला भावना नसतातचं हेच एकमेव सत्य आहे. लोक उगाच बिअरला बदनाम करतात. माझ्यासारख्याच्या जगण्याचे तो एकमेव आसरा आहे. बिअर पिणे अजिबात वाईट नाही. मुलीवर प्रेम करणे वाईट आहे. तिच्या आठवणी जगू देत नाहीत आणि फक्त बिअरच माणसाला ह्यातून बाहेर काढू शकते. तिच्या आठवणीने नुकतेच ऐकलेले एक गाणे ओठांवर तरळले...

"भरी बरसातमे ये दिल को जला देती है!
याद क्या चीज है आती है रुला देती है!! "