एक विनोदी चित्रपट, प्रमुख भूमिकेत : चप्पल!

सकाळची  साडेसहा-सातची वेळ, रविवार असूनही फलाटावर चिक्कार गर्दी होती. पण त्या गर्दीची मला मात्र पर्वा नव्हती... कारण त्या दिवशी मी अनेक दिवसांनी - दिवसांनी कशाला अनेक महिन्यांनी, कदाचित अनेक वर्षांनी - एकटीच मुंबईला निघाले होते. म्हणजे, ’प्रवास करणारी एकटी बाई’ या अर्थाने नव्हे तर बरोबर माझा मुलगा नाही, काहीही सामान नाही आणि मुख्य म्हणजे नवरा पण नाही अशी एकटी!!... सडी-फटिंग आणि म्हणूनच एकदम निवांत!! मुंबईला एका लग्नाला निघाले होते. लग्न आटोपून संध्याकाळी लगेच परतायचं होतं, पण तोपर्यंत म्हणजे तब्बल १२-१३ तास मी एकटी असणार होते आणि तीच माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय गोष्ट होती.
गाडी यायला अजून दहा-पंधरा मिनिटं अवकाश होता. मी पर्स मधून पुस्तक काढून उभ्या-उभ्याच वाचायला सुरुवात केली. फलाटावर माझ्या शेजारीच एक वयस्कर जोडपं आणि त्यांचा तरूण मुलगा असे उभे होते. सोबत दोन-तीन पिशव्या आणि एक बॅग होती. आजी-आजोबा मुंबईला निघाले होते आणि त्यांचा मुलगा त्यांना रेल्वे-स्थानकावर पोचवायला आला होता हे थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं. गर्दी आणि सोबतचं सामान यामुळे त्या आजी-आजोबांच्या चेहेऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. अशा प्रसंगी त्यांच्या वयाची म्हातारी माणसं जितकी हवालदिल होतात तितकेच ते ही दोघं झालेले होते. माझं लक्ष थोडं हातातल्या पुस्तकात, थोडं त्या दोघांकडे आणि थोडं येणाऱ्या गाडीच्या दिशेला होतं. इतक्यात ’गाडी अर्धा तास उशीराने येईल’ अशी घोषणा झाली. आजी-आजोबांचा चेहेरा अजूनच चिंतित झाला. मी मात्र ’बारा-तेरा तास’ चे ’बारा-साडे तेरा तास’ झाल्यासारखी अजूनच निवांतपणे पुस्तक पुढे वाचायला सुरूवात केली.

... गाडी येताना दिसल्यावर मी पुस्तक आत टाकलं, पर्स आणि ओढणी सरसावून पुढे सरकले. मागून ते आजी-आजोबाही होतेच. गाडीच्या दरवाज्यापाशी प्रचंड गर्दी आणि धक्काबुक्की सुरू झाली होती. ’आधी तुम्ही चढा आणि सामान आत घ्या; नको तू थेट आत जा, आम्ही सामान चढवतो; किती गर्दी आहे हो, जमेल ना चढायला? ’... आजी-आजोबांची घालमेल शब्दरूपाने कानावर पडत होती. मी डाव्या हाताने गाडीच्या दरवाज्याचा कडेचा गज धरला. आता गाडीत चढणार इतक्यात अचानक मला काय वाटलं कोण जाणे पण मी त्या आजी-आजोबांना पुढे जाऊ द्यायचं ठरवलं. म्हातारी माणसं शिवाय जवळ सामान होतं; माझं काय, एकटी सडी-फटिंग होते, त्यांच्या मागाहूनही चढता येईल असा विचार केला आणि त्या आजोबांना पुढे जायची खूण केली. एकदम हायसं वाटल्यासारखं दोघांनी माझ्याकडे पाहिलं. माझे आभार मानून तीनही पिशव्या घेऊन ते आत चढले. मी डावा पाय गाडीत ठेवला. त्यांचा मुलगा पाठोपाठ त्यांची बॅग आत ठेवतच होता. मी माझा दुसरा पायही उचलणार तेवढ्यात ते आजोबा क्षणभर घुटमळले. मागून मुलाकडून बॅग घ्यायची आहे हे त्यांना आठवलं आणि ते एकदम मागे वळले. एक सेकंद मलाही अडखळायला झालं आणि या सगळ्या गडबडीत गाडीच्या पायरीला थटून माझ्या उजव्या पायातली चप्पल खाली रुळांवर पडली!!!
त्या क्षणी माझ्या चेहेऱ्यावर जे-जे भाव उमटले - म्हणजे, पु. लं. च्या भाषेत गाडी चुकल्यासारखे, गणिताच्या पेपरला समाजशास्त्राचा अभ्यास करून गेल्यासारखे, भर पावसात छत्रीची काडी तुटल्यासारखे, लग्नाचं बोलावणं करायला जाताना लग्न-पत्रिका घरी राहिल्यासारखे किंवा दुकानातून चांगला हलवून, खात्री करून आणलेला नारळ घरी आल्यावर कुजका निघाल्यासारखे - या सगळ्याचा एक विनोदी चित्रपट तयार झाला असता!! पहिले एक-दोन सेकंद मी अत्यंत बावळट चेहेऱ्याने खाली वाकून रुळांवरच्या त्या चपलेकडे बघत राहिले. काय करावं आधी काही सुचेना. एकदम भानावर येऊन आजुबाजूला पाहिलं. माझी फजिती खरं म्हणजे कुणीच पाहिली नव्हती!!!
खाली उतरून तडक घरी निघून जावं हा पहिला विचार मनात आला. पण घरी जाऊन काय होणार होतं? मुंबईचं यायचं-जायचं आरक्षण वाया गेलं असतं शिवाय नवीन चपलांचा जोड विकत घ्यावा लागणारच होता.   त्यापेक्षा ठरल्याप्रमाणे जायचं आणि मुंबईत पोचल्यावर नवीन चपला विकत घ्यायच्या असा निर्णय मी घेतला.
गाडीला हिरवा सिग्नल मिळाला, फलाटावरचा तिकिट-तपासनीस आता चढायच्या तयारीत होता. जणू एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी अत्यंत निर्बुद्धपणे त्याला "ती चप्पल काढून द्याल का? " म्हणून विचारलं. विचारतानाच त्यातला फोलपणा मला शब्दाशब्दाला जाणवत होता. पण, न जाणो, त्याच्या कारकिर्दीत असा प्रसंग या आधी कधीतरी आलाच असेल, त्यावेळी त्याने कदाचित काहीतरी शक्कल लढवली असेल, अशी एक आशा उगीच मला वाटली. अर्थात त्याच्या चेहेऱ्यावरून तो ’शक्कल’ वगैरे लढवणारा वाटत नव्हता तो भाग निराळा!! त्याने तशी काही शक्कल तर लढवली नाहीच शिवाय वर मला मूर्खात काढायची संधीही सोडली नाही... ती तशी कुणीच सोडली नसती म्हणा! "क्या मॅडम, जान से ज्यादा चप्पल प्यारी है क्या? ऐसी और दस चप्पल ले लेना लेकीन पैर कट गया या जान चली जायेगी तो क्या होगा? " असं म्हणून त्यानं माझा परतीचा शेवटचा दोर कापून टाकला. इतक्यात गाडीही सुटली.
चेहेऱ्यावरचा तो विनोदी चित्रपट तसाच पुढे चालू ठेवून मी आत शिरले आणि मुकाटपणे माझ्या जागेवर जाऊन बसले; तर ते मगाचचे आजी-आजोबा माझ्याच शेजारी होते. आता सामान-बिमान बाकाखाली ठेवून जरा ’हुश्श’ करून निवांत बसले होते. त्यांना तो निवांतपणा देण्याच्या नादात मला माझी चप्पल - आणि ती ही एकाच पायातली - गमवावी लागली होती हे त्यांच्या गावीही नव्हतं.
प्रवासात अनेक प्रकारे गोंधळ आणि फजितीचे प्रसंग येतात. बॅगेचे हॅंडल तुटणे ही एक लोकप्रिय फजिती (इतरांची जी फजिती बघायला मनातल्या मनात मजा येते त्याला लोकप्रिय फजिती म्हणायला हरकत नाही. ) दोन वेगवेगळ्या आरक्षणांवर एकच सीट-क्रमांक असणे ही दुसरी लोकप्रिय फजिती. त्यामानाने तिकिट हरवणे किंवा गाडी चुकणे हा जरा गंभीर मामला आहे. या यादीत आता ’एका(च) पायातली चप्पल पडणे किंवा हरवणे’ या फजितीची भर पडली होती.
पहिली दहा-पाच मिनिटे माझी जरा अस्वस्थतेतच गेली. डोळ्यांच्या कोपऱ्यांतून मी सारखी इकडे-तिकडे बघत होते. कुणा-ना-कुणाचं आपल्या पायांकडे लक्ष जातंय आणि ते आपल्याला मनातल्या मनात वेड्यात काढताहेत असं वाटत होतं. खरं म्हणजे वेळ कुणाला होता माझ्या दोन्ही पायात चपला आहेत की नाहीत ते पहायला!
अनवाणी उजवा पाय थेट खाली टेकवायला नको वाटत होतं. मग वाणी पायावर (चप्पल नसलेला पाय अनवाणी, तर मग ज्या पायात चप्पल आहे तो आपोआपच वाणी) हे पाऊल जरा तिरकं करून टेकवलं. उरलेल्या दुसऱ्या चपलेचं काय करायचं याचा मी आता विचार करायला लागले होते. तीही टाकूनच द्यावी लागणार होती. बिचारीची साथीदार तिला ’जीवन-भॅंवर में’ एकटी सोडून गेली होती. खरं म्हणजे ती दुसरी तरी मी पायात अजून का जपून ठेवली होती कोण जाणे. पण बुडत्याला काडीचा आधार तसं अर्ध्या-अनवाणीला एका चपलेचा आधार वाटत होता बहुतेक! पण चप्पल टाकून द्यायची म्हणजे तरी नक्की काय करायचं? एखादा कागद आपण टाकून देतो म्हणजे तोपर्यंत तो पर्समध्ये किंवा पिशवीत किंवा कपाटात असतो, तो त्याक्षणानंतर खाली म्हणजे जमिनीवर दिसायला लागतो. पण चप्पल तर आधीपासूनच जमिनीच्या संपर्कात असते. ती ’टाकायची’ म्हणजे वेगळं काय करायचं? नुसती पायातून काढून पुढे चालायला लागलं की झालं! पण मग ’टाकून दिली’ या शब्दप्रयोगातली जी नको असलेली वस्तू भिरकावून देण्याची मजा आहे ती यात नाही. तसंही, चप्पल ही वस्तू अनेक मजांपासून वंचितच असते म्हणा! बरं, भिरकावून देण्यासाठीसुद्धा खाली वाकून ती कुणी हातात घेण्याचे कष्ट करणारच नाही. वाटेत एखादे मनगटी घड्याळ, पाकीट किंवा पर्स पडलेली दिसली तर बघणारे क्षणभर तरी थबकतातच. पण एखादी(च) चप्पल पडलेली दिसली तर कुणी तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही! तात्पर्य काय, तर ती दुसरी चप्पल टाकून देणं हे इंग्रजीत ज्याला आपण ’लो प्रोफाईल’ म्हणतो असं एक काम होतं जे करणं भाग होतं.
प्रवासात किंवा एकंदरच सार्वजनिक ठिकाणी माझं लोकांच्या पेहेरावाकडे वगैरे लगेच लक्ष जातं. कुणाच्या हातात कसली पर्स आहे, कुणी कसलं घड्याळ घातलं आहे, कुणाच्या पायात कसली पादत्राणं आहेत या गोष्टी आधी दिसतात मला. त्या दिवशी पर्स, घड्याळ नाही मात्र प्रत्येकाच्या पायातल्या चपलांकडे - आणि त्या सुद्धा दोन्ही पायातल्या - सारखं लक्ष जात होतं. सर्व चप्पलांकृत उजव्या पायांचा मला हेवा वाटत होता. लोकं एकाच हातात ब्रेसलेट घालतात, एकाच कानात डूल घालतात, पूर्वीच्या काळी एकाच डोळ्यावर लावायचा चष्माही असायचा पण एकाच पायात कुणी चप्पल घातलेली स्मरणात नव्हती. सगळेजण एकतर दोन्ही पायांत चपला घालतात किंवा दोन्ही पायांत घालत नाहीत... मी एकाच पायात घातली होती!!
सारखा तिरका ठेवल्यामुळे आता उजवा पाय अवघडायला लागला होता. गाडीच्या दारापासून बाकापर्यंत अनवाणीच चालत आले होते, त्यामुळे आता पाय वर घेऊन मांडी घालून बसायलाही नको वाटत होतं. पण बसल्या जागी चुळबुळ करण्यापलिकडे काही करणंही शक्य नव्हतं. एखादं स्थानक जवळ आलं की खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या दुकानांतून नेमकं माझं लक्ष एखाद्या चपलांच्या दुकानाकडेच जात होतं... चोराच्या मनात चांदणं तसं अनवाणीच्या मनात चपला! आठ-साडेआठचा सुमार असल्यामुळे ती सगळी दुकानं अजून बंद होती. अजून तासाभरात गाडी मुंबईत पोचली असती. तोपर्यंत तिथली दुकानं तरी उघडली असतील की नाही ही चिंता आता मला सतावायला लागली. तिथे उतरून अनवाणीच चालत तसल्याच एखाद्या दुकानाचा शोध घ्यायचा होता, नवीन चपला खरेदी करायच्या होत्या आणि हे सगळं करून वर लग्नाचा मुहूर्त गाठायचा होता. खरंच की...!! लग्न, तिथे सगळी भावंडं, नातेवाईक भेटतील या ज्या आनंदात मी सकाळपासून होते ते सगळं त्या पडलेल्या चपलेच्या नादात विसरायलाच झालं होतं.

हळूहळू मुंबईची उपनगरी स्थानकं दिसायला सुरूवात झाली. उतरल्यावर स्थानकाबाहेर लगेच एखादं चपलांचं दुकान असेल असं मी गृहीत धरून चालले होते. पण त्यापूर्वी अनवाणीच गाडीच्या स्वच्छतागृहाला भेट द्यायचं दिव्य करायचं होतं. मनावर दगड ठेवून, मनाची कवाडे बंद करून, मन निर्विकार करून, डोळ्यांसमोर आणि पायांखाली सुंदर फुलांचा ताटवा आहे असं समजून ते ’न भूतो न भविष्यती’ कार्य मी पार पाडलं... इलाजच नव्हता दुसरा! पण त्यामुळे एकदम इतकी विरक्ती आल्यासारखं वाटायला लागलं की आता फलाटच काय जगात कुठेही अनवाणी जायची माझी तयारी होती.
गाडी थांबली. डावा पाय चपलेतून काढून घेऊन मी चालायला सुरूवात केली - ’एकच चप्पल टाकून देणं’ हे इतकं सोपं होतं पण जे आजवर कधीच करायची वेळ आली नव्हती. गाडीचा डबा नेमका फलाटाच्या दुसऱ्या टोकाला होता. रेल्वेस्थानकासारख्या ठिकाणी पायात चप्पल असताना सुद्धा चारदा बघून मग पाऊल टाकणारी मी त्यादिवशी मऊसूत हिरवळीवरून चालल्यासारखी निघाले होते. आता कुणाच्याही चपलांकडे माझं लक्ष नव्हतं. आपल्याला कुणी वेड्यात काढत असतील का हा विचारही मनाला शिवत नव्हता. संपूर्ण फलाट पार करून स्थानकाबाहेर आले. त्यादिवशी माझ्या तळपायांनी जे-जे पाहिलं ते काय वर्णावं!
बाहेर रस्त्यावर नेहेमीची रेल्वेस्थानकाबाहेर असते तशी दुकानांची झुंबड गर्दी असेल ही माझी अपेक्षा सपशेल फोल ठरली. चपलांचंच काय कुठलंच दुकान पटकन दृष्टीस पडेना. अरे देवा! त्या तळपायांना अजून काही दाखवायचं राहिलं होतं की काय! पुन्हा एकदा एक-दोन सेकंद काय करावं सुचेना. इतक्यात रस्त्याच्या कडेला एक चांभार बसलेला दिसला. चांभार आणि चपला यांचा असलेला घनिष्ठ संबंध हा आता एकमेव आशेचा किरण होता. चपलांशी घनिष्ठ संबंध असला तरी त्या चांभाराला चपलांचं दुकान कुठे असेल ते माहिती असलंच पाहिजे असं काही नव्हतं. पण त्याला ते चक्क ठाऊक होतं. चांभाराने तिकिट-तपासनीसाच्या वरचा नंबर पटकावला होता.
त्यानं दाखवलेल्या दिशेला मी तरा-तरा चालायला सुरूवात केली. ते अंतर आता कित्येक मैलांचं वाटत होतं. एका वळणानंतर अचानक चपलांची एकदम आठ-दहा दुकानं समोर आली. आंधळ्याने एक डोळा मागितला तर देवाने दोन डोळे आणि सोबत त्या डोळ्यांवर लावायला गॉगलही देऊ केला होता! पहिल्याच दुकानातून एक चपलांचा जोड अर्ध्या मिनिटात खरेदी केला. दाने-दाने पे जसं लिखा है खानेवाले का नाम तसंच चप्पल-चप्पल पे पण लिखा है पहननेवाले का नाम!
काही घडलंच नाही अश्या थाटात मी एका टॅक्सीला हात केला.
टॅक्सीत मागे डोकं टेकून, डोळे मिटून पाच मिनिटं शांतपणे बसून राहिले. ’माझा नवरा ती रुळांवर पडलेली चप्पल हातात धरून सगळीकडे फिरतोय आणि ही चप्पल जिच्या पायात बसेल तीच माझी बायको असं सिंड्रेलाच्या गोष्टीसारखं सगळ्यांना सांगतोय’ असं दृश्य डोळ्यांसमोरून तरळून गेलं. विनोदी चित्रपटाचं शेवटचं दृश्यही विनोदीच असायला हवं ना!!