पाचवी 'क' परंपरा पाळतो

खाटोळी बुद्रुक गावी पानतवणे पाटलांनी मागील वरशीपासून कळशीबाई पानतवणे पाटील माध्यमिक शीकशण सौंस्ता सुरू केली होती. आत्तापावरतो चौथीच्या फ़ुड शिकशाण घेयला धा कोसावर्च्या तालुक्याला जाव लागायच. पानतवणे पाटलांचा पोरगा जीतू, चौथी पास झाला, तेव्हा केवळ त्याच्यासाठी म्हनून पाटलांनी आपल्या स्वरगीय पत्नीचे नांव देऊन माध्यमीक शाळा सुरू केली. दमादमानं वाढवू म्हनून आधी येकच वर्ग म्हनजे इयत्ता पाचवी सुरू केला. आता दमादमानं वाढणार म्हनजे दर वर्शी जीतूबरोबरच फ़ुडच्या वर्ग सुरू होनार हे सगळ्यांना ठावं होतंच. घरबसल्या आपली पोर म्याट्रीकपातूर जाणार म्हनून गाववाले पाटलांवर खूष होते. चौथि परयंत शीकून, शेतात उनाडक्या करत फ़िर्नाऱ्या पंदरा इस पोरांना गोळा करून आणले. इस्त्री शिकशानात आपून मागे राहू नये म्हनून दोनचार पोरींना पण भरती केलं. अशी खोगीरभर्ती होऊन एकमेव पाचवीचा कलास पाचवी ’क’ सुरू जाला.

पाचवी ’क’च्या पोरांना आज लांडे मास्तराने समाजशातराच्या पीरीडात भार्ती सौंकृतीची शानदार परंपरा आपनच टिकवाय पायजेलेय असे सांगीतले. भौतेकांना काही समजलेच नाय. तर काहींनी भौतेक आयक्लेच नाय.

लवाराचा म्हाद्या बाजुच्या पवन्याच्या कानांत कागदाची सुरनळी घालण्यात बीजी होता.
कानात गुदगुल्या जाल्याबरुबर पवन्याला लई ग्वाड वाटलं. तो म्हनला हिकडच्या कानातबी कर नां.

रंग्या फ़ुडच्या बाकावर्च्या किसन्याला चिमटा काढत कुजबुजला. "आयला ह्या मास्तराच्या! बेणं काय काय तिरफ़ाट बोलत असतं! बोलतं तर बोलतं, वर परष्नबी इचाऽरतं."
त्याच येळी किसन्या नेमका डाव्या बाजूच्या बाकांवर बसलेल्या पोरींकडे पहात वहीच्या कागदाचा बाण फ़ेकण्यात दंग होता. तो कागद त्याने बाजुच्या शितूच्या वहीतून मोठ्या मुष्कीलीने नजर चुकवून फ़ाडून घेतला होता. नेम धरता धरता अचानक कमरेत चिमटा बसला, तसा त्याचा बाण बरोब्बर लांडे मास्तराच्या समोर जाऊन पडला.

पाटलाच्या जीतूला वरगातल्या दंग्यात किंवा मास्तराच्या भाशानपट्टीत मुळीच रस नव्हता. त्यामुळे तो बापाच्या कपाटातून चोरलेल्या फ़ीलमी म्यागजीन मदल्या नटरंग्या पहाण्यात नेहमी परमानं गुंतला होता. जानी दोस्त भीम्यालाच जीतूच्या रंगीत चोपडीत डोके खुपसायला परवानगी असायची. त्यामुळे हे दोघे डोक्याला डोके भिडवून चित्रदुनीयेत सफ़र करत होते.

बाण समोर पडताच लांडे मास्तर येकदम तरवरला. किसन्याचा गोरामोरा चेहरा बगून जे वळखायच ते वळखला. "काऽय रेऽऽ ये झामलटाऽ शाळंत ह्ये धंदे कराय येतस कां?" लगालगा किसन्यापाशी जाउन त्याने किसन्याचा कान रेडूची खुंटी पिळावी तसा पिळला. तशी किशन्याचा रेडू किंचाळू लागला. "आय आय आय आय. मेलो."
"आता माय आठवली का रे ढसरांगड्या"
"मास्तर मी नाय"
"तू नाय माहीत आहे मला. तुज्या भुतान मारला नां तो बाण?
"नं नं...."
"चल सांग पाहू भार्ती सौंकृतीची परंपरा काय आहे त्ये."
"मास्तर तुमी मगा सांगीतलं त्ये कायबी समजलं नाही."
"समजलं नाही काय? ऐकत होतास तू?"
"हो मास्तर. तुमी म्हटल "भार्ती सौंकृतीची शानदार परंपरा आपनच टिकवाय पायजेलेय"
"अरे व्वा! आता कसा पोपटावाणी बोलाय लागलास!" हा पोपट कान पिळला की बोलतो असे समजून जाता जाता लांडे मास्तरांनी आणखी येकडाव किसन्याची खुंटी पिळली आणि ते आपल्या टेबलाकडे जायला निघाले.

त्यांची पाठ फ़िरताच किसन्याने मागे वळून एक गुद्दा रंग्याच्या थोबाडावर ठेवून दिला. रंग्याने आईन येळेस चिमटा काढल्यानं येकतर आपला बाण पोरींकडे पोचला नाही. आणि फ़ुक्काट मास्तराची बोलणी खावी लागली. मास्तराने कान पिळला तवा फ़ुडच्या बाकावरची शेवंता कशी फ़ीदीफ़ीदी दात दाखवत होती. अचानक गुद्दा बसताच रंग्या कळवळला. पण लगेच उठून त्याने किसन्याचे केस धरले आणि ते उपटून काढण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांची अशी झुमकलेली पहाताच बाकावर्ची पोरे कुस्तीच्या फ़डागत ह्योऽ आजुबाजुला गोळा झाली. पाटलाचा पोरगा जीतू फ़ील्म म्यागजीन सोडून फ़डाचे नेतृत्व करत होता.

ह्यो गलका आयीकताच टेबलाकडे गेलेला लांडे मास्तर परत फिरला. पाहतो तर काय कलासात एकच धुमडी सुरू दिसली. तसाच टेबलवर्ची पट्टी घेउन सुटला आणि दांडपट्टा फ़ीरवावा तशी पट्टी मारत पोरांना जागेवर बशीवले. हे करतांना पाटलाच्या जीतुला एखादा फ़टका चुकून लागू नये ह्याची खबरदारी घेउनच त्याने ही दादाजी कोंडदेवकी गाजवली. थोड्यात वेळात पट्टीचे लाल डाग गोंजारीत पोरे बाकांवर बसली.

"आयला ह्या वांदरांच्या!" लांडे मास्तर कावून ओरडला. आता नीट कान देऊन आयका. परंपरा म्हनजे काय ते. डोसक्यात नाही गेलं तर इचारा त्वांड उचकटून. पट्टीचा दांडपट्टा पुन्हा पडायला नको म्हणून सारी मुले कानात प्राण घेऊन आयकत बसली. अगदी पाटलाच्या जीतूनंबी फ़ीलमी म्यागजीन डेस्कात ठेवून दिल्लं.

परंपरा म्हनजे आपले पुरवज ज्या चालीरीती पाळत होते. आपले आईबाप त्यांच्या आईबापांनी शिकवले तसे वागतात. म्हनजे दिवाळीला देवळात जातात, पुजा करतात, घरी गोड धोड बनवतात ते सगळ सगळ. म्हनजे आपल्या सौंकृतीत शिकवलं आहे की वडील मंडळींचा आदर करायचा. गुरूने सांगीतलेले आयकायचे. इथे तुम्ही वांदरं तर गुरूला गुंडाळून वरगात हुंबडपना करत बसतात. जरा शिका आपली थोर परंपरा. मोठ्यांचे आयकायचे, मोठ्यांनी घालून दिलेल्या रीती पाळायच्या. ही परंपरा.

मास्तरानी लांबलचक भाषण संपवून मुलांकडे पाहीले. पट्टीच्या धाकाने ती सगळी ताठ, एकटक नजर लावून त्याच्याचकडे बघत होती. "अरे कारे वेताळांनो? अशे मुरद्यागत काय थीजून बसला? काही समजले की नाही? नाही समजले तर इचारा आत्ताच."

अशा येळेस अनुबवाने शहाण्या मुलांना बरोबर माहीत असते. यावेळी, ’हो समजलं’ अस जो कोणी म्हणेल, त्याला मास्तर पकडणार आणि इचारणार- "समजलं म्हनतोय तर सांग काय समजलं ते" त्यामुळे सर्व वरगं आळीमिळी गुपचिळी. समजलं अशी मान हलवायची पन भीती वाट्तं होती. परंतू मास्तराला काहीतरी परष्न इचारणे भागच होते. त्याशीवाय तो गप बसला नसता.

पाटलाचा जीतूच एकटा काय तो मास्तराला प्रश्न इचारण्याचे ढाढस करू शकत होता. सगळे जन त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा जीतू पन चालून आलेल्या लीडरकीला जागला. झोकात उबे राहून त्याने इचारले- "मास्तर तुमी मनला परंपरा म्हनजे मोठ्यांचे आयकायचे, मोठ्यांनी घालून दिलेल्या रीती पाळायच्या. ही परंपरा. बरूबर?"

"आरं माज्या लेकरा. बापावानीच लई हुशार हायसं रं. हो मी असच सांगीतलं. मोठ्यांनी घालून दिलेल्या रीती पाळायच्या. ही परंपरा."
"मग मास्तर येक सांगा"
"काय?"
"आपन परंपरा पाळायला पाहीजे की नाय?"
"येकदम पाळायला पाहीजे."
"इधानसबेतले आपले लीडर आपले मोठे की नाय?"
"सोळा आनं खरं बोललास."
"मंग मघाशी आमी सगळे गुथ्थमगुथ्था करत होतो ते परंपराच पाळत होतो की. मी पायलय टीवीवर. मागे इधानसबेत लीडरांनी ह्याहून मोठी धुमडी केली होती. लई मजा आली होती. पन मास्तर तवा त्यांच्या मास्तरांनी त्यांना पट्टी नवती मारली. ते फ़कस्त माईकवर "शांतता पाळा" असं ओरडत होते."
"आरं तिच्यायला" लांडे मास्तरला दुसरे काही बोलायला सुचेचनां.
"हो ना मास्तर आमी इद्यारथ्यांनी मोठ्यांची परंपरा पाळली. पन तरी तुमी उगाचच पट्टी मारली. इधानसबेसारख "शांतता पाळा" असं सांगून तुमी परंपरा पाळायला पायजे होती की नाय मास्तर?"

लांडे मास्तर तोंड बोळक्यावानी उघडं ठेवून गपगारच बसला. जीतू सगळ्यांकडे विजयाने पहात होता, तशी काही मुलांनी टाळ्या वाजवल्याच. लांडे मास्तर आता पट्टी काढणार नाही ह्याची त्यांना पक्की खात्री होती. आणि झालेही तसेच. तासाची घंटा होईतोवर मास्तराने समाजशातराची पुसतके वाचत बसा असा हुकूम सोडला. आणि मग कलास वर्गात वागन्याची परंपरा पाळन्यात पुन्हा येकवार बीजी जाला.