विलासप्रसादांची दिवाळी

दारावर थाप पडली आणि विलासप्रसादांची झोप मोडली. आज पाडवा असूनही विलासप्रसाद अंमळ उशीराच उठले.  उठल्याबरोबर ताबडतोब त्यांनी आरशात पाहून केस व्यवस्थित केले,  ठेवणीतले हास्य तोंडावर चिकटवले आणि दार उघडले.

हातात ओवाळायचे ताट घेऊन बाईसाहेब उभ्या होत्या.

"हे काय तुम्ही अजून तयार नाही. आज पाडवा ना. रितेशबाबा पण अजून उठायलाय"

कावरेबावरे होऊन विलासप्रसादांनी आजूबाजूला पाहिले.

"अगं हळू बोल. कोणी ऐकलं तर.. खुर्ची जाईल माझी "

"का काय झालं.?"

"खुशाल जोरजोरात पाडवा पाडवा ओरडतेस. मॅडमना काय वाटेल? कृपाशंकर, अहमद पटेल, निरूपम सगळे काय म्हणतील?"

"काय म्हणणारेत? आपण आपली दिवाळी सेलिब्रेट करतोय. त्यांची काळजी कशाला?"

"दिवॅळी म्हणे.. शिमगा होईल शिमगा... दिवाळं निघेल आपलं."

"हो पण काय झालंय सांगाल की नाही.?"

"हे बघ, एका राज्याची जबाबदारी मॅडमनी माझ्यावर सोपवली असली तरी मी एका राष्ट्रीय पक्षाचा निष्ठावंत सेवक आहे."

"बरं मग"

"पाडवा वगैरे क्षुल्लक प्रादेशिक उबळींना येथे जागा नाही. देशाच्या एकात्मतेचं काय होईल? प्रत्येकानं जर आपलेच सण साजरे करण्याचा हट्ट बाळगला तर लोकांच्या भावना दुखावतील ना! रितेशबाबाची  करिअरही महत्त्वाची आहे. ते काही नाही. आपण करवा चौथ साजरी करणार आहोत. शेवटी पाडवा काय आणि करवा चौथ काय, तुझं सौभाग्य (आणि तुला घातलेली ओवाळणी) हे महत्त्वाचं. काय? मी कृपाशंकरला बोलावलंय. हे बघ आलाच तो. दार उघड बरे"

कृपाशंकर नमश्कार नमश्कार करत आत आले.

"आईये, आईये, आईये", विलासप्रसादांनी हातभर तोंड वेंगाडले.

"दिवालीच्या शुभेच्छा तुमाला. केस थोडेसे खाली आलेत. कपालापर्यंत.", कृपाशंकरांनी जणू काही एमेनेसचा धसका घेतला होता.

विलासप्रसादांनी खिशातून गोल आरसा काढून हातानेच केस व्यवस्थित केले. आणि आपल्या सहकाऱ्याला शुभेच्छा दिल्या.

"हैप्पी दिवाली कहों जनाब.. और आपका वो बूड रखो खुर्चीपें... क्या कहते है उसे, तकलीफ?"

"तकलीफ?"

"हा वो बैठने के लिए खुर्ची पे रखते है उसें?"

"तश्रीफ! तश्रीफ कहिएँ विलासप्रसादजी."

"ओहोहो. तश्रीफ रखिए."
 
"मै तुमको एक शंका विचारना चाहता हूं"

"अरे मराठीत बोला साहेब.. मला तेवढी मराठी कळते."

"मी बोलेन हो. पण तुम्ही मॅडमना सांगू नका मी मराठीत बोललो ते!"

"नाही नाही साहेब.. तुम्ही विचारा.. "

"म्हणजे काय आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना सहानुभूती दाखवण्यासाठी आम्हांला करवा चौथ साजरा करायचा आहे. तो सण कधी असतो?

"तो तर ऑक्टोबरमध्येच होऊन गेला साहेब"

विलासप्रसादांना नैराश्याचा झटकाच बसला. त्या गडबडीत त्यांचे केस थोडे विस्कटले.

"पण कालजी नको. छटपूजेला सगलं मेकअप करता येईल. निरूपमही येतोय मागून. तो छटपूजेचं बघतो. शिवाय हा थोडा वादग्रस्त विषय असल्यानं प्रसिद्धीही जास्त मिळेल."

विलासप्रसादांना चान्स न हुकल्याचं समाधान वाटलं. बाहेर निरूपमच्या गाडीचा आवाज आला. कृपाशंकरांनी दार उघडलं.

विलासप्रसादांनी त्यांचे स्वागत केले. नमस्ते नमस्ते करत निरूपमही आत आले. .

"दिवालीकी शुभकामनाएँ विलासप्रसादजी. केस थोडे विस्कटल्यासारखे दिसतात."

आपल्या प्रतिमेची आणि व्यक्तिमत्त्वाची इतकी काळजी करणारे सहकारी आपल्याला मिळाले याचा विलासप्रसादांना अतीव आनंद झाला.