तिकीट `कलेक्टर!'

कॉंग्रेसच्या सरचिटणीस, आजी-माजी प्रभारी, वर्षानुवर्षांच्या निष्ठावंत नेत्या आणि बंडखोर-सुस्त-अकार्यक्षम नेते-कार्यकर्त्यांच्या कर्दनकाळ मा. मार्गारेट अल्वाताई यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे केवळ कॉंग्रेस नव्हे, तर अख्खा देश, संपूर्ण जग, किंबहुना (भारताचे यान चंद्रावर पोचल्यामुळे) परग्रहांवरील वातावरणही ढवळून निघाले. अवघे भूमंडळ डळमळले.
पृथ्वी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे, असे कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांना, निष्ठावंतांना वाटले असणार! (रामानंद सागरांच्या) रामायणातल्या इंद्रजीताप्रमाणे, (बी. आर. चोप्रांच्या) महाभारतातल्या दुर्योधनाप्रमाणे आणि एकता कपूरच्या कुठल्याही मालिकेतील सासू-सून यांच्याप्रमाणे तेही "क्या? ' असे करून बेंबीच्या देठापासून ओरडले असणार!! कॉंग्रेसमध्ये चक्क उमेदवारीची तिकीटे विकली जातात? कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पैसे घेऊन उमेदवारी दिली, असा अतिशय गंभीर, कुणाही सर्वसामान्य कॉंग्रेसप्रेमी व्यक्तीचं हृदय विदीर्ण करणारा आरोप अल्वाबाईंनी केला. तोदेखील निवडणुकांमध्ये कॉंग्रेस तोंडघशी पडून सहा महिने झाल्यानंतर!!
आरोप जाहीर झाल्यानंतर अर्थातच त्याची कॉंग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्राणांची आहुती लावणाऱ्या घराण्याचे नेतृत्व ज्या पक्षाला लाभले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरूंसारखे थोर नेते ज्या पक्षाने दिले, शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या या महासागररूपी पक्षातल्या एका थेंबाने असा घाणेरडा आरोप करावा? साक्षात आपल्या पित्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेत? छे छे! हा कहर झाला...
हिऱ्याप्रमाणे पारखून, प्रत्येकाच्या सचोटीची-निष्ठेची-कार्यक्षमतेची कसोटी पाहून उमेदवारी देण्याची पक्षाची महान परंपरा. काही जणांना मरणोत्तर "भारतरत्न' देतात, तसं काही नेत्यांना "उमेदोत्तर' (म्हणजे राजकारणातील त्याची उमेद संपल्यानंतर) उमेदवारी देण्याची थोर परंपरा असलेला हा पक्ष. त्यात पैसे देऊन तिकीटवाटप कसे होईल? असा घाणेरडा, खालच्या पातळीचा, पक्षप्रतिमा मलिन करणारा आरोप करणाऱ्या अल्वा यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी अनेकांनी दबक्या आवाजात आग्रह धरला असणार.
अल्वाबाईंचा हा "भावनिक उद्रेक' असल्याचा खुलासा कॉंग्रेसने अधिकृतपणे केला आहेच. महाराष्ट्रानेही असे अनेक भावनिक उद्रेक अलीकडच्या काळात अनेकदा पाहिले आहेत. प्रश्न हा आहे, की हा केवळ उद्रेक असेल, म्हणजे राजकीय ज्वालामुखी अजून उसळायचा बाकी आहे तर!
---
टीप : नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकमध्ये सार्वजनिक सेवेतील बसच्या तिकीट वापटपात गैरप्रकार, असा आरोप आपण केल्याचा खुलासा मार्गारेट अल्वा यांनी केला आहे. आपल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला असून, (पक्षात असेपर्यंत) आपण असे घाणेरडे आरोप करणे शक्यही नसल्याचे म्हटले आहे!