अफलातून बातम्या (२)

  • अंड्यातील पिवळा बलक जास्त आवडणारे लोक आयुष्यात श्रीमंत होतात, तर पांढरा भाग आवडणारे लोक काटकसरी असतात, पण अंडेच न आवडणारे लोक उधळपट्टी करणारे असतात, असा निष्कर्ष एका पाहाणीत काढण्यात आलेला आहे. ही पाहाणी करण्यासाठी पैसे आंतरराष्ट्रीय अंडे प्रसारक संस्थेने पुरवीले होते.
  • जाहिर सभेत नेत्याचे आव्हान : "मला निवडून देण्याची हिम्मत तर करा, मी एकेकाला बघून घेईन. "
  • बाटा मोटर्स बाजारात आणणार बुटाच्या आकाराची स्वस्त कार. यात बाटा चप्पल घालूनच बसता येईल व बुटात गाडीची सिक्रेट पासवर्ड चाबी असेल. त्यामुळे गाडी चोरीला जाण्याची शक्यता कमी असेल, आणि चोरी झालीच तर, बुटातून एक सिग्नल निघेल जो चोराला पकडून देण्यास पोलिसांना मदत करेल.
  • वरच्या मजल्यावर राहाणाऱ्यांचा 'वरचा मजला' *, खालच्या मजल्यावर राहाणाऱ्यांपेक्षा जास्त रिकामा असतो असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. हे सर्वेक्षण तिसऱ्या, चवथ्या व पाचव्या मजल्यावरच्या लोकांनी मिळून केले आहे. खालच्या मजल्यावरच्या लोकांनी सर्वेक्षणात भाग घेण्याचे नाकरले होते.
  • शास्त्रज्ञांचा अदभुत प्रयोग : भूकंपाद्वारे वीजनिर्मिती. भूगर्भात भूकंप घडवण्यासाठी विशिष्ट उपकरणाची निर्मिती सुरू. अनेकांकडून शास्त्रज्ञांना धमकी. हा प्रयोग चंद्रावर जावून करा असे धमकी देणाऱ्यांचे म्हणणे.
  • चित्रपटात यापुढे खलनायक नसावा : उच्च न्यायालयाचा निर्वाळा. खलनायकांमुळे समाजावर विपरीत परीणाम. मात्र, नायकच जर खलनायकी कृत्ये करत असल्यास त्याविषयी काय कायदा आहे, असे पत्रकारांनी विचारल्यावर उत्तरास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान इमरान हाश्मी यामुळे खुष झाल्याचे सूत्रांकडून समजते.
  • चहा पिल्याने कॅन्सर होतो : शास्त्रज्ञ

             शास्त्रज्ञांना चहाच्या मळ्यातून धमकी.

             चहा पिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. चहा हे दुसरे अमृत असल्याचा निर्वाळा: शास्त्रज्ञ

  • मोबाईल वापरामुळे मेंदूत गाठ व कॅन्सर होतो.  : सर्वेक्षण

           सर्वेक्षणकरत्यांना मोबाईल कंपन्यांकडून मोफत लाईफलाँग व्हॅलिडीटी व टॉप अप चा प्रस्ताव.

            मोबाईल वापरामुळे मेंदूत गाठ होण्याची शक्यता नाही. मोबाईलमुळे मेंदूचा विशिष्ट पेशीसमूह उत्तेजीत होतो, त्यामुळे मुले खुप हुशार होतात : सर्वेक्षण

* वरचा मजला : मेंदू, बुद्धी