शिकार!

.......................................
 शिकार!
...............................................

उन्हास या कोवळ्या कशी काय धार येते ?
कशी सकाळीच कोण जाणे दुपार येते !

कधी तरी भेटतो जुना मित्र ऐनवेळी...
तशात होतात छान गप्पा... बहार येते !

सदैव हा माळ तापलेलाच पाहतो मी...
झुळूक येथे कधी तरी एक गार येते !

कुणीच नाही मनास या छेडले तरीही...
कशी कळेना मलाच ऐकू सतार येते !

फिरून मी पाहतो सुखाचा प्रसन्न वाडा...
मध्येच बाहेर दुःख, उघडून दार येते !

कधी कधी राग राग येतो तुझा परंतू...
कधी कधी कीवही तुझी फार फार येते ! 

धरून तू नेम बैस़; ध्यानात ठेव हेही...
तशी मलाही, करायची तर, शिकार येते !!

- प्रदीप कुलकर्णी

.......................................
रचनाकाल ः २ नोव्हेंबर २००८
.......................................