१ डिसेंबरला आकाशात दिसणार `हसरा चेहरा'

१ डिसेंबरला आकाशात दिसणार 'हसरा चेहरा'

   सोमवार दि. १ डिसेंबरच्या संध्याकाळी पश्चिम आकाशात एक अत्यंत विलोभनीय दृश्य पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र, शुक्र आणि गुरू हे ग्रह पश्चिम आकाशात एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत. त्या दिवशी या ग्रहांची स्थिती अशी असेल की ज्यामुळे आकाशात स्माईली (हसरा चेहरा) दिसेल. शुक्र आणि गुरू या ठळक ग्रहांच्या रूपात दोन तेजस्वी डोळे आणि त्याखाली चंद्रकोरीच्या रूपात हसणारे ओठ असे स्माईलीशी साधर्म्य असणारे दुर्मिळ दृश्य तयार होईल.

सध्या पश्चिम आकाशात गुरू व शुक्र हे ग्रह दर्शन देत आहेत व त्यातील अंतर झपाट्याने कमी कमी होत आहे. १ डिसेंबरला त्यांच्या जोडीला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीची चंद्रकोरही येईल आणि आकाशात अप्रतिम असा देखावा दिसेल. तेजस्वी शुक्राच्या २ अंश उजवीकडे ठळक असा गुरू दिसेल. त्यावेळी शुक्राची दृश्य प्रत उणे ४. १ तर गुरूची दृश्य प्रत उणे २. ० इतकी असेल. संध्याकाळी ६:४५ च्या सुमारास सर्वोत्तम असे दृश्य दिसेल. त्यानंतर जसजसे हे 'त्रिकूट' क्षितिजाकडे मावळतीला लागेल तसतसे त्यांच्यातील अंतर वाढलेले भासेल. अशी संधी अनेक वर्षातून एकदाच मिळते तेव्हा हे दृश्य चुकवू नये. तसेच शक्य असल्यास चांगल्या कॅमेऱ्याने छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करावा. 

 *सोबत जोडलेले चित्र आणि प्रत्यक्ष दृश्य यात काहीसा फरक जाणवेल.