कूजन

(ईश्वरावर घालता बंधन कसले?
हे कड्या-कुलुपांतले दर्शन कसले?)

ओढ ना ज्याला तुझी, ते मन कसले?
ज्यात तू नाहीस ते जीवन कसले?

बंद तू केलेस सारे दरवाजे...
चालले आहे मना चिंतन कसले?

उघड आता तू मनाच्या चक्षूंना
बघ पुढे आहे खुले दालन कसले...

ना कुणीही ओळखीचे येथे, पण-
गुंजते कानी जुने कूजन कसले!

खूप आहे वाहणारे जीवन, पण-
ज्यात नाही 'क्वीन' ते लंडन कसले?

फिरत बसशी तू सदा त्या नाक्यावर...
(हे वधूंचे फुकट संशोधन कसले? )

सर्व येथे वाटण्या ऋण तत्पर, पण-
प्राप्त जे होते असे, ते धन कसले?

- कुमार जावडेकर