खोट्याची दुनिया

खोट्याची दुनिया राहिली नाही.... सगळीकडे खऱ्याचाच जमाना आला आहे.

पूर्वी असं नव्हतं...

आमचे गुरू पु. ल. देशपांडे यांनी आयुष्यभर अनेक व्यक्ती, वल्ली बनून इतरांना बनवलं. अनेक खोटी आत्मचरित्रं लिहिली. (शेवटी खरं चरित्र सुनीताबाईंना लिहावं लागलं). त्यांचे गुरू वुडहाऊसचं पण तेच.

आमचे दुसरे एक गुरू चि. वि. जोशीं यांनी 'चिमणराव' बनून लोकांना हसवलं. (दिलीप प्रभावळकरांची उमेदवारीच्या काळात पोटा-पाण्याची सोय केली.)

हल्ली मात्र असे लेखक राहिलेत कुठे? खरं नाव घेऊन खरं-खोटं कुणी सुनावत नाही आणि खोट्याला कुणी विचारत नाही. याचं आम्हांला अतीव दुःख व्हायला लागलं. आम्ही विमनस्क झालो.... लिखाण बंद झालं. (आधी फारसं सुरू नव्हतं... बंदच पडलं होतं; पण त्याची कारण शोधून काढता काढता हा दुनियेतल्या बदलाचा शोध लागला, आणि आपल्या प्रतिभेत कमतरता नाही हे लक्षात आलं.)

अचानक हे संकेतस्थळ सापडलं..... अनेक खरे आणि खोटे सापडले. मांजराला (फडताळातलं) दूध बघून किंवा माशीला (दुकानातली) बर्फी बघून जो आनंद होतो, तो आम्हांला झाला! आता मनोगत आहे, तुम्ही आहात आणि आम्हीही!

- ख. रे. खोटे