बरं झालं...

बरं झालं - अतिरेक्यांची गोळी करकरेंचं बुलेट-प्रूफ जॅकेट भेदून गेली. आता निदान पोलिसांना निविदा, कंत्राटं इ. च्या कचाट्यात न अडकलेली बुलेट-प्रूफ जॅकेटस मिळतील.

बरं झालं - करकरेंच्या पत्नीनं मोदींची आर्थिक मदत नाकारली. निदान आता तरी निगरगट्ट मोदींना शहाणपण येईल.

बरं झालं - गिरगाव चौपाटीवर अतिरेक्यांवर तीन(च) फैऱ्या झाडल्यावर पोलिसांच्या बंदुका नादुरुस्त झाल्या. निदान पोलिसदलाकडे दुर्लक्ष झाल्याचं मुर्दाड राजकारण्यांच्या लक्षात तरी आलं. (की त्यांनी मिडियासमोर नुसतं तसं दाखवलं? कारण आजपर्यंत त्यांनी दुसरं केलंय तरी काय? )

बरं झालं - राम गोपाल वर्मा आणि रितेश देशमुख पण ताज हॉटेलमध्ये ’मजा’ बघायला गेले. निदान त्यामुळे तरी निर्लज्ज मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची सोडली.

बरं झालं - ताजमध्ये दगावलेल्या टाईम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ स्त्री-पत्रकाराचा त्या दिवशी हरवलेला मोबाईल रायगड जिल्ह्यात कुठेतरी सापडला. निदान त्यामुळे दहापेक्षा जास्त अतिरेकी मुंबईत घुसले होते हे सामान्य जनतेला कळलं.

बरं झालं - हेलिकॉप्टर मधून दोरखंडाच्या सहाय्याने सरसर उतरणारे कमांडो अवघ्या देशाने पाहिले. निदान तसंच प्रशिक्षण पोलिसांनाही देता येऊ शकतं हा मतप्रवाह निर्माण झाला.

बरं झालं - मिडीयावाल्यांच्या अति उत्साहामुळे कमांडो कारवाईला विलंब लागला. निदान आता तरी मिडीयासाठी एखादी आचारसंहिता बनवली जाण्याची आशा (पुन्हा एकदा) निर्माण झाली.

बरं झालं - फटाक्यांचा आवाज ऐकून कुतुहलानं बाहेर डोकावलेल्या हरिशचा दुसऱ्या क्षणी अतिरेक्यांची गोळी लागून जीव गेला. तो फटाक्यांचा आवाज नसून बंदुकांचा होता हे कळायच्या आत त्याचा प्राण गेला. निदान आता तरी उठसूट कुठल्याही कारणांसाठी रस्त्यांवर फटाके फोडण्यावर निर्बंध घातले जातील ही आशा (पुन्हा एकदा) निर्माण झाली.

बरं झालं - अतिरेकी समुद्रामार्गे मुंबईत घुसले. त्याच समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं घाणेरडं राजकारण करणाऱ्या आणि ते उभारण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चायला तयार असणाऱ्या राजकारण्यांना आता महाराजांचा आत्माच मुस्कटात भडकावून ’आधी सागरी सीमा सुरक्षित ठेवा’ म्हणून खडसावेल.

बरं झालं - अतिरेक्यांनी या वेळी उच्चभ्रू हॉटेल्स आणि उच्चभ्रू व्यक्तींना वेठीस धरलं. दर चार-सहा महिन्यांनी कुठे ना कुठे बॉंबस्फोटांत मरणाऱ्या सामान्य लोकांची अगतिकता यांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपली.

बरं झालं - आय. एस. आय. च्या प्रमुखांना भारतात पाठवण्याचं कबूल करून नंतर पाकिस्ताननं घूमजाव केलं. निदान आता तरी डोळ्यांवर कातडी ओढून बसलेल्या अमेरिकेला पाकिस्तानचा दुटप्पीपणा लक्षात येईल.

बरं झालं - माझ्यासारख्या सामान्य भारतीय नागरिकाला (इच्छा नसताना) अशी खोचक भाषा वापरावीशी वाटली.

असेच, राजकारण्यांच्या पापांचे पाढे अजून वाढतील, या यादीत अजून भर पडेल...

पण, एक ना एक दिवस काही ठोस उपाययोजना केली जाईल आणि निदान आपल्या पुढच्या पिढ्या तरी निर्भय मनानं जगतील.