पण ह्या 'शहिदांचे' काय ?

 
            २६/११ ला जो आतंकवादी हल्ला मुंबई शहरावर झाला त्यानंतर जनता जरी हवालदिल झाली असली तरी काही नेत्यांच्या मनात मात्र वेगळाच असंतोष धुमसत होता. इकडे करकरे, कामटे व साळसकर निधड्या छातीने शत्रूशी मुकाबला करून शहीद झाले. (त्यांच्या शौर्याला सहस्र सलाम‍! ) तर तिकडे विलासराव व आबांना त्यांचा जीव की प्राण असणाऱ्या खुर्चीची कुर्बानी द्यावी लागली. ह्या जनतेच्या सेवकांना सुद्धा जनतेने शहीद होण्याचा सन्मान दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. ह्या 'अस्सल' शहिदांनासुद्धा श्रद्धांजली वाहणे गरजेचे आहे नाही का? जनता त्या शहीदांना सलाम करते, श्रद्धांजली वाहते, मात्र आमच्या सारख्या शहिदांचे बलिदान व्यर्थ ठरणार की काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यासाठी  तमाम मराठी जनतेला आवाहन करण्यात येत आहे!

 
            कारण त्यामुळे निवडणुकांचे वेळी पुनर्जन्म होताना ह्याच श्रद्धांजली रुपी शुभेच्छा त्यांना पुन्हा तीच खुर्ची मिळवून देतील हे त्यांना पक्के ठाऊक आहे. सामान्यांनी वाहिलेली श्रद्धांजली अत्यंत मनापासून असते व ते आशीर्वाद फुकट जाणार नाहीत हे त्यांनी अगोदरच ताडले आहे.

 
            विलासरावांनी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा देणे, मग दिल्लीला भेटायला जाणे, पुन्हा दोन दिवस ताटकळत बसणे, काही हालचाली न घडल्याने आशा (की निराशा) पल्लवित होणे व अखेरीस घात होणे, हा सगळाच प्रकार किती केविलवाणा होता हे लातूरच्या उड्डाणपुलावरून म्हशी हाकणाऱ्या एका गुराख्याने एका न्यूज चॅनलवरच्या चर्चेत सांगितले. जर विलासरावांना खरंच जनतेच्या रोषाची यत्किंचितही पर्वा असती तर त्यांनी आपली अशी केविलवाणी अवस्था करून न घेता ह्या सर्व घटनाक्रमाची जबाबदारी घेऊन हल्ला झालेली स्थाने मुक्त होताच राजीनामा दिला असता अशी पुस्ती जोडायला तो विसरला नाही. असे झाले असते तर खरोखरीच त्यांना मुक्ती  मिळून पुन्हा कदाचित निवडणुकांनंतर लातूर मतदार संघातच पुनर्जन्म मिळाला असता. आता मात्र स्वर्गाला जाणारे विलासरावांचे विमान अतिरेक्यांच्या करिश्म्याने थेट नरकातच जाणार आहे असे कळते आहे.

             त्यामानाने आबा मात्र एकदम हुशार! राजीनामा दिल्यावर स्वतःची गाडी नसल्यामुळे पक्षाची स्कोडा घेऊन हा अंजनीचा सुत सरळ पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणाशी  जाऊन थडकला. त्या बिचाऱ्या विठ्ठलाचे पाय आबांनी असे काही घट्ट धरून ठेवले की विठ्ठलाला अखेरीस आपले कमरेवरील हात काढून आबांना उठवावे लागले. आबा आपली मान हालवून हालवून धाय मोकलून रडू लागले.   विठ्ठलच तो, झाला एकदाचा प्रसन्न. विठ्ठल प्रसन्न होताच आबांनी येणाऱ्या निवडणुकीत पुनर्जन्माचा वर मागून घेतला. वर मिळताच विठ्ठलाला तसेच सोडून आमदार म्हणून कार्य करण्यासाठी बाहेर पडले. बाहेर येऊन बघतात तर काय? मिडियावाले येथेही हजरच! आबा तरी आता काय करणार. हिंदीत बोलण्याची चुका यावेळी न करता पुन्हा एकदा मान हालवत त्यांनी मराठीतच सांगून टाकले की आता आपल्याला कसलेही टेन्शन नाही. प्रत्यक्ष विठ्ठलानेच अभय दिले आहे. आबांना विठ्ठलाने अंजनीला जाऊन मतदार संघात काम केले तर तुझा पुनर्जन्म होईल असे सांगितले आहे हे चतुर मीडियावाल्यांनी ओळखले व लागलीच ब्रेकिंग न्यूज पाठवून दिली.
   
             या ताणतणावाच्या काळात राणेंना तर कुणी विचारेनासेच झाले. पण यावेळी आपण शहीद व्हायचे नाही असे पक्के ठरवून सुद्धा जे होऊ नये तेच झाले. शुक्रवारची संध्याकाळ होईपर्यंत राणेंची ब्रेकिंग न्यूज द्यायला मीडिया काही तयार नव्हता. अखेरीस स्वतःच पत्रकारांना बोलवून आपण कॉंग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे शहीद झालो आहोत याची ब्रेकिंग न्यूज त्यांनी स्वतःच दिली. आता जनतेने त्यांना सुद्धा श्रद्धांजली द्यावी म्हणजे या शहिदाला सुद्धा पुनर्जन्म मिळेल.