डब्यात देण्याचे पदार्थ

माझी मुलगी चार वर्षांची आहे.  तिच्या शाळेच्या नियमांप्रमाणे तिला डब्यात रोज पोळी-भाजीच न्यावी लागते (फार तर भाज्या घातलेले पराठे), अपवाद फक्त बुधवारचा.  बुधवारी गणवेशही घालावा लागत नाही आणि डब्यातही 'च्याऊ-म्याऊ'चे पदार्थ चालतात (फळं आणि द्रवपदार्थ सोडून).  माझी सत्त्वपरीक्षा खरी ह्याच दिवशी असते.  मुलगी नेहमी बुधवारची वाट बघते आणि मला मात्र दर वेळी डब्यात काय नवीन आणि पौष्टिक द्यावं ते कळत नाही.  शिरा, उपमा, पोहे आणि सँडविच आलटून-पालटून इतक्यांदा देऊन झालेत की मलाच आता त्यांचा कंटाळा आलाय.  कधी पुरेसा वेळ मिळाला तर मी इडली किंवा आप्पेही देते, पण त्याचाही आता कंटाळा येऊ घातला आहे.  (तिला नव्हे मलाच!)

वाचकहो, तुम्ही मला मदत करू शकाल काय?  मला काही नवीन, वेगळे किंवा जुनेच पण विस्मरणात गेलेले पदार्थ सुचवू शकाल काय?  पाककृती दिल्यास उत्तम.  पाककृती कुठे दुसरीकडे असल्यास किंवा हा लेख वाचल्यावर मनोगतावर प्रसिद्ध केल्यास प्रतिसादात कृपया त्याचा दुवा द्यावा.

तुम्हा सर्वांना (विलायती पद्धतीप्रमाणे!) अगोदरच धन्यवाद.