संभ्रमा!

......................................
संभ्रमा!
......................................

चंद्रमुखी नाहीस तशी तू...
तुझा चेहरा जरा गोलसर
म्हणावेत हे कसे गुलाबी?
ओठ कुसुंबी तुझे, ओलसर!

नव्हेसही तू तशी सावळी...
गव्हाळ किंवा तू निमगोरी
पुरती बाई कधी कधी तू
कधी कधी तू अल्लड, पोरी!

गडद तपकिरी या डोळ्यांना
जुन्या मधाचा रंग जरासा...
तुषार कोमल कधी स्मितांचे
हसू कधी हे गूढ झरासा...!

प्रसन्नताही तुझी अशी की,
त्यात मिसळली जरा उदासी
कधी सुखाची धनीणही तू...
कधी कधी दुःखाची दासी!

काय हवे ते, तुझे तुलाही
कळले नाही कधी नेमके
शोधत बसलो उगाच मीही
विचारायला शब्द शेलके!

रुकार नाही; नकार नाही
तुझी न भाषा तुज कळणारी
'हो-नाही'च्या उंबरठ्यावर
सदैव तू तर घुटमळणारी!

कधी इकडची, कधी तिकडची..
कधी अशी तू... कधी तशी तू...
मीही झालो तुझ्यासारखा...
मला कळेना खरी कशी तू!!

अशी चंचला, अशी संभ्रमा
कुठेच नाही कधी पाहिली...
निघून तू गेलीस कुठेशी...
झिळमिळ झिळमिळ इथे राहिली!

- प्रदीप कुलकर्णी

......................................
रचनाकाल ः १८ डिसेंबर २००८
......................................