मोलाचा सल्ला आणि सल्ल्याचे मोल

               (तिचा सल्ला नेहमीच मोलाचा असतो आणि त्याचे मोलही तितकेच असते !
                        एक अनुभवी नवरा (अर्थात मीच))
 

   परिस्थिती माणसाला किती बदलायला लावते पहा! जोपर्यंत दूरदर्शन आमच्या शहरात आले नव्हते तोपर्यंत त्यामुळे मुंबईतले लोक कसे माणुसघाणे झाले आहेत.दूरदर्शनवर काही कार्यक्रम चालू असताना कोणी भेटायला आले की त्यांचा चेहरा कसा वाकडा होतो.त्यांचे बाहेर जाण्याचे वेळापत्रक कसे दूरदर्शनच्या तालावर बेतलेले असते.अशा गोष्टी एकमेकाना सांगून "आपण नाही बुवा त्यातले" अशा आम्ही आपापल्या पाठी थोपटून घेत होतो पण तेच दूरदर्शनने आमच्या शहरात प्रवेश करताच आमच्यापैकी ज्यानी त्या लाटेत प्रवेश केला तेही मुंबईच्या लोकांच्याच पावलावर पाउल ठेऊन तसेच चालू लागले. सुरवातीला बराच काळ मी मात्र त्या लाटेत प्रवेश केला नव्हता.अर्थात त्याचे कारण मी दूरदर्शन संचच घेतला नव्हता हे होते.अलीकडे मात्र आपणही एकादा संच घ्यावा असा विचार माझ्या मनात डोकावू लागला होता आणि तिथेच माझा आणि सुमतीचा वाद सुरू झाला होता.खर म्हणजे तिचा स्वभाव हट्टी आहे असे मी म्हणणे योग्य ठरणार नाही(अर्थात असे उघड म्हणण्याची कोणत्या नवऱ्याची छाती असते?)पण एकादी गोष्ट तिने डोक्यात घेतली की ती माझ्या मताचा विचारही करत नाही ही माझी मोठी अडचण असते.
  ज्यावेळी आम्ही दूरदर्शन संच घेण्याची शक्यता नव्हती तोपर्यंत रंगीत संचच घेणे बरे असे आम्हा दोघांचेही मत होते म्हणजे तसे तिचे एकटीचेच असले तरी त्याला मी विरोध दर्शवत नव्हतो त्यामुळे माझेही मत तसेच आहे असे ती समजत होती.पण आता प्रत्यक्ष घ्यायची वेळ आल्यावर मात्र सध्या साधा कृष्णधवल संच घ्यावा आणि पुढे जरा किमती कमी झाल्या की रंगीत घेता येईल असे अर्थशास्त्रावर आधारित मत मी व्यक्त करू लागलो.याउलट तिच्या मते मी इतके दिवस तिला उगीचच आशेवर झुलवत  ठेवले आणि याचाच तिला जास्त राग आला होता. त्यामुळे आता घ्यायचाच झाला तर रंगीतच घ्यायचा नाहीतर नकोच असा वटहुकूम निघाला होता..थोडक्यात म्हणजे आता हा प्रश्न जरा प्रतिष्ठेचा (अर्थात तिच्या)झाला होता.तिच्या बहुतेक मैत्रिणींकडे रंगीत संच होते हे त्यामागचे खरे कारण होते.माझ्या मते इतके दिवस आपण कृष्णधवल चित्रपटही अगदी चित्रपटगृहात जाऊन पाहिले मग त्यामुळे त्यांचा आस्वाद घेण्यात कधीकाही उणीव
भासली नाही ते चित्रपट रंगीत दूरदर्शनवरही रंगीत थोडेच दिसणार आहेत?शिवाय त्यावेळी आजच्यासारख्या शेकडो वाहिन्याही नव्हत्या एकच एक दूरदर्शन त्यामुळे दिवसातून  तास दोन तासच मिळणाऱ्या करमणुकीसाठी जादा पैसे खर्च करणे मला पटत नव्हते. हा बऱ्याच मोठ्या रकमेचा प्रश्न असल्याने ती नेहमीप्रमाणे मला न विचारता आपली पैशाची थैली घेऊन दूरदर्शन संच खरेदी करून आणू शकत नव्हती नाहीतर मला विचारण्याच्याही फंदात ती पडली नसती.
   त्यामुळे तो प्रश्न तसाच अधांतरी राहिला होता आणि आमचे संबंध जरा ताणल्यासारखे झाले होते कारण आता माघार कोणी घ्यायची?
   अशात आमच्या महाविद्यालयाचे स्नेहसम्मेलन उपटले त्यावेळी आमच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनात माझी भूमिका कार्यक्रमाचा मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून पडद्यामागेच असायची.पण एक दिवस आमचे एक प्रयोगशाळा सहाय्यक विचारे अचानक माझ्याकडे आले आणि त्यांच्या नेहमीच्या खास अदबीच्या सुरात विचारते झाले. "सर,आपल्याकडे एक काम होते." त्यांच विचारण इतक्या हळुवार स्वरात असत की बहुधा वामनान बळीला तीन पावले जमीनच काय ती या सुरात मागितली असेल "बोला" त्यांना तेवढ्याच हळुवारपणे नाही तरी शक्यतो तसा प्रयत्न करीत मी म्हणालो.आणि त्यानी विचारलेला प्रश्न ऐकून मी तीन ताड उडालोच कारण त्यानी विचारल, "सर आपल्या स्नेहसंमेलनाच्या नाटकात भाग घेऊ शकाल का? "
मी नाटकात काम करावे अशी कल्पना कोणी करू शकेल यावर मी कधीच विश्वास ठेवला नसता,म्हणजे तसा माझा चेहरा इतका टाकाऊ नाही आणि दररोज वर्गात तासभर मी मुलांचे मनोरंजन करत असल्यामुळे रंगमंचावर उभा रहायला मी घाबरणार होतो अशातला भाग नव्हता.पण वर्गात ठराविक विषयावर बोलणे वेगळे आणि नाटकात भाग घेणे वेगळे. रंगमंचावर चढण्याचा माझा लहानपणीचा पूर्वानुभवही बव्हंश एरंडो॓ऽपि द्रुमायते या प्रकारातील होता.म्हणजे केवळ वर्गातील हुशार मुलगा म्हणून मला शाळेतील नाट्यप्रवेशात भाग घ्यावा लागे.त्यात माझ्या नाट्यगुणांपेक्षा पाठ्यगुणांचाच अधिक वाटा होता म्हणजे हा कमीतकमी नक्कल तरी चोख पाठ करील अशी खात्री गुरुजींना असल्याचा.त्यामुळे विचाऱ्यानी असा अविचार का केला असावा याचा मला विचारच पडला. 
  विचाऱ्यांनी अविचार केला असला तरी अशी पार्श्वभूमी असणाऱ्या मला त्यांच्या विचारणेला अनुकूल प्रतिसाद देण्याचे खरे तर  काहीच कारण नव्हते.पण पण माझा एक दुर्गुण (वा इतरांच्या दृष्टीने गुण म्हणा हवा तर) असा की मला कुणालाही नकार देण्याचे फार जिवावर येते,(त्याचमुळे मी सांगून आलेल्या पहिल्याच मुलीशी लग्न केले आणि तिचा घात केला नाहीतर कित्येक चांगल्या चांगल्या स्थळांकडून तिला होकार येत होते ही गोष्ट सुमतीन त्यानंतर कितीवेळा मला बजावून सांगितली याची मोजदाद ठेवणे मला तरी शक्य झालेले नाही अर्थात ही गोष्टनंतरची).अगदी कोणी पैसे मागायला आला तरी माझा हात चटकन खिशात जातो (आणि त्यात काही नसल्याने तसाच बाहेर येतो ती गोष्ट वेगळी) त्यामुळे विचाऱ्यांना नकार देऊन नाराज करायचे माझ्या जिवावर आले.आणि मी होकार देऊन बसलो.
   "मग सर आणखी एक रिक्वेस्ट आहे "तेवढ्याच मृदु स्वरात विचारे.आता हे मलाच नाटकही लिहायला सांगतात की काय अशी भीती मला पडली कारण मागे एकदा स्त्रीपात्रविरहित नाटक न सापडल्याने मी ते लिहिण्याचा प्रयत्नही केला होता. पण विचाऱ्यांचा प्रश्न वेगळाच निघाला,"सर तुमच्या शेजारी रहाणाऱ्या जोशीमॅडम नाटकात काम करतात असे ऐकले आहे त्यांना आपल्या नाटकात काम करण्याविषयी तुम्ही विचाराल का?" अच्छा तर मला प्रथम नाटकात भाग घेण्याची संधी देण्यामागे विचाऱ्यांचा हा कावा होता तर!
   त्यावेळीपर्यंत अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विद्यार्थिनी अगदी तुरळक म्हणजे सगळ्या कोलेजात एक अथवा दोनच प्रवेश घेत असल्यामुळे त्यांना रंगमंचावर येण्याचे मुळीच धैर्य नसे किंवा ज्यांच्यात असे धैर्य असे त्यांना रंगभूमीवर आणण्याचे धाडस आम्ही करू शकत नसू.त्यामुळे नाटक करायचेच झाले तर स्त्रीपात्रविरहित करावे लागे किंवा स्त्रीपात्रांसाठी शोधाशोधच करावी लागे.माझ्या मध्यस्थीने जोशी मॅडमनी काम करायला होकार द्यावा म्हणून मला प्रथम विचारण्याचे चातुर्य विचाऱ्यांनी दाखवले होते त्यामुळे जोशीमॅडमनी होकार दिला तर मी नाटकात काम केले नाही तर चालणार होते. ही गोष्ट लक्षात न येण्याइतका मी दुधखुळा नव्हतो,त्यामुळे मी विचा़ऱ्यांना म्हणालो,"अच्छा,जोशीवहिनीनी काम करायला होकार दिला तर मग मी काम करायला हवेच असे काही नाही असेच ना?"
 "काय हे सर माझी अगदी लाजच काढताय आम्हाला तुम्ही तर हवेच आहात"विचारे जरा लज्जित झाल्यासारखे दाखवत म्हणाले."ठीक आहे बघतो  जमतेय का." असा मी त्यांचा निरोप घेतला.
     मी घरात शिरताच सुमतीने मला लगेचच विचारले,"काय हो काय म्हणत होते विचारे?"मी घरी जाण्यापूर्वीच माझ्या अंगावर पडलेल्या या कामगिरीचा सुगावा तिला कसा लागला कुणास माहीत.ती जर शिवकाळात जन्मास आली असती तर बहिर्जीचीही तिने छुट्टी केली असती याची मला खात्री आहे.तिचे गुप्तहेरखाते अगाथा ख्रिस्तीच्या मिस मार्पलपेक्षाही अधिक विस्तृत असावे."आता तुला विचाऱ्यांनी माझी गाठ घेतल्याचे कळलेच असेल तर त्यानी काय विचारले हे तुझ्यापासून थोडेच लपून राहिले असणार?"तिचा डाव तिच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो.
 "हे बघा तुम्हाला सांगून ठेवते उगीच नसत्या फंदात पडून त्या भटकभवानीच्या नादी लागू नका"
 "ही भटकभवानी कोण आणि मी कोणाच्या नादी लागणार (तू समोर असताना)?" कंसातील भाग मनातल्या मनात बोलत मी म्हणालो
आणि जोशी वहिनी या तिच्या लेखी भटकभवानी आहेत अशी माझ्या ज्ञानात भर टाकण्यात आली.
"हे बघ तसले काही मी करणार नाही मला फक्त त्यांना आमच्या कॉलेजच्या नाटकात काम कराल का हे विचारायच आहे बस्स !"
"मग मला हे सांगा की विचाऱ्यांना काय झाले होते स्वत: विचारायला,का ते घाबरतात त्या पोळाला?" आता हा पोळ कोण हे मला समजेना."अग हा पोळ कोण आणि ---"
"मिस्टर जोशी,इतकेही माहीत नाही का?"माझ्या सामान्यज्ञानाची कींव करत सुमती.
"हे बघ आता मला ही कामगिरी पार पाडणे भागच आहे कारण मी विचाऱ्यांना तसा शब्द दिला आहे."
"हो हो तुमचा शब्द कसा खोटा ठरेल, तुम्ही म्हणजे अगदी हरिश्चंद्राचे अवतारच ! मात्र एकदा रंगीत--"
"पुरे पुरे तो विषय आता येथे नको "तिला मध्येच थांबवत मी म्हणालो.
"ठीक आहे जाताना अंगावर चिलखत वगैरे घालून जा,म्हणजे बरे"
    सुमतीने मला असे घाबरवण्याचे काय कारण होते हे जोशींच्या घरात शिरेपर्यंत मला कळले नाही.जोशी कुटुंब आमच्या शेजारी दोन घरे सोडून रहात होते आणि कधीतरी श्री.जोशी आणि मी कामासाठी बाहेर पडल्यावर एकमेकास पाहून ओळखत होतो तीच गोष्ट जोशी वहिनींची !एवढ्या थोड्या ओळखीवर मी ही कामगिरी कशी काय स्वीकारली याचे आता मलाही आश्चर्य वाटू लागले होते पण एकदा काम हाती घेतल्यावर माघार घ्यायची नाही हा माझा बाणा नडला आणि मी धाडस करून जोशींच्या घरात शिरलोच.
   मी घरात शिरताच श्रीयुत जोशींनीच "या" असे म्हणून माझे स्वागत केले. त्यांचा चेहरा नेहमीपेक्षा उग्र वाटला कदाचित तो नेहमी उग्र असेल पण त्याचे कारण ते कामावरून नुकतेच घरी आले असावेत आणि तेही ऑफिसात त्यांच्या वरिष्ठांच्या शिव्या खावून असा मी समज करून घेतला किंवा सुमतीने मला अगोदर घाबरवून सोडण्याचा जो प्रयत्न केला होता त्याचाही मानसिक परिणाम असावा.
   एवढ्यात जोशीवहिनी बाहेर डोकावल्या आणि "अगबाई सुधीर भावजी तुम्ही ?" असे त्यांच्या नाटकात काम करून कमावलेल्या लाडिक स्वरात त्या उद्गारल्यावर माझा ताण बराच हलका झाल्यासारखे मला वाटले पण लगेचच श्रीयुत जोशींनी त्यावर बोळा फिरवला आणि आपल्या उग्र चर्येपेक्षा उग्र सुरात "तुम्ही आत जा" असा हुकूम त्यांनी बायकोला सोडला आणि त्याही निमुटपणे आत गेल्या.यापुढील कामगिरी म्हणजे संताजी धनाजीनी मोगलांच्या तंबूचे कळस कापून न्यावे तितकीच वाचायला रोमहर्षक पण करायला अवघड होती आणि माझी अवस्था मात्र उत्तरगोग्रहण मधील उत्तर किंवा मानापमानातील लक्ष्मीधर यांच्या पंक्तीत बसण्याच्या लायकीची होती.
   मी उसने अवसान आणून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी जोशींनीच,"कसे काय बरे आहात ना?" असा प्रश्न विचारून वातावरण मोकळे करण्याचा प्रयत्न केला अर्थात त्या प्रश्न विचारण्यामागे माझ्या तब्येतीपेक्षा त्यांच्या घरात प्रवेश करण्यामागे माझे डोके ठिकाणावर आहे ना याचाच शोध घेण्याचा तो प्रयत्न असावा असे मला वाटले कारण ते पुढे म्हणाले,"काही नाही आज अचानक आमच्या घरी आलात म्हणून विचारले "अर्थात त्या काळी फोन वगैरे करून पूर्वपरवानगी घेऊन कोणाच्या घरी जाण्याचा प्रघात नव्हता,
  आता ताकाला जाऊन भांडे लपवण्यात अर्थ नव्हता म्हणून "बरका जोशी साहेब,एक काम आहे तुमच्याकडे"
"माझ्याचकडे ना ?"आपल्या स्वरात उगीचच मार्दवबिर्दव न आणता जोशी.
"हो म्हणजे तसे तुमच्याकडेच कारण तुमची हरकत नसेल तर वहिनींना एक विनंती करायची होती."   
"कसली?"जोशींनी हे शब्द अशा आवेशात उच्चारले की आता काहीही न बोलता पळ काढणेच बरे असे मला
वाटू लागले पण शिक्षणप्रसारक मंडळाचे(मी स.प.चा विद्यार्थी ना !) "हाती घ्याल ते तडीस न्या" हे ब्रीद पुरेपूर माझ्या अंगी बाणलेले
असल्यामुळे तशाही स्थितीत मी धीर धरून विचारलेच " काहीनाही फक्त आमच्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात आम्ही एक नाटक करायचे म्हणतोय त्यात काम करणे वहिनींना जमेल का  एवढेच विचारायचे होते."
   पण त्यानंतर दगडांचा वर्षाव झेलण्याची तयारी असताना गुलाबपाण्याचा शिडकावा अंगावर व्हावा अशी माझी परिस्थिती झाली कारण माझे वाक्य पुरे होताच,"हात्तीच्या एवढेच ना ?ती जशी इतर नाटकात काम करते तशी तुमच्या नाटकातही करेल त्यात काय विशेष?"असे जोशींनी त्यांच्यापरीने हसतहसत म्हटल्यावर माझा जीव एकदम भांड्यात पडला." थॅन्क्स जोशीसाहेब मग तसे मी निश्चित समजूना?" असे म्हणून मी खुंटा हलवून बळकट केला."अगदी शंभर टक्के मग तर झाले ना"इति जोशी.
"अच्छा तर निघतो मी," म्हणून मी निघू लागलो तर जोशींनी मला हाताला धरूनच बसवले आणि म्हणाले,
"अहो हे काय तसेच जाताय आज आमच्याकडे पहिल्यांदाच येताय आणि चहा सुद्धा न घेता कसे जाल"आणि सौ.जोशींना हाक मारत
"अग,काका निघालेत त्यांना चहा वगैरे काही देणार की नाही?" असे त्यानी म्हटल्यावर जोशी वहिनीही हसत हसत पुढे आल्या आणि
म्हणाल्या,"तर चहा करते ना" आणि मी चहा पिऊनच घरी आलो आणि सुमतीला अगदी जोरात हाक मारून म्हणालो "बघ उगीचच
मला घाबरवून सोडलस,जोशीवहिनींचा होकारच काय पण चहादेखिल घेऊन आलो आहेस कुठ?" यावर आपल्या ठेवणीच्या सुरात तिने,"अस का बरेच झाले ,पण पहा बाई घी देखा पण बडगा नही देखा अस होऊ नये म्हणजे झाल"अस म्हटल्यावर मी गप्प थोडाच बसणार."हे बघ आता पुढे काय होणार ते विचारे पाहून घेतील""पण शेवटी ही जबाबदारी तुमचीच आहे,लक्षात ठेवा"असा तिने शेवट केलाच.
  दुसऱ्या दिवशी विजयी मुद्रेने मी विचाऱ्यांना ही बातमी सांगितली आणि त्याचबरोबर मी नाटकात काम करणार नाही असेही सांगितले,मग मात्र विचाऱ्यांनी,"असे कसे सर,जोशीमॅडमनी होकार दिला नसता तरी तुम्हाला आम्ही सोडणारच नव्हतो,"असा आग्रहाचा सूर काढल्यावर मी "मग आता जोशीमॅडमनी माझ्या ऐवजी काम केले असे समजा"असा युक्तिवाद करून त्या संकटातून माझी सुटका करून घेतली.त्यामागे आता या झेंगटातून विचाऱ्यांनी मला मोकळे करावे हाही उद्देश होताच.म्हणजे पुढे यदाकदाचित काही भानगड उपस्थित झाली तर त्यात विचाऱ्यांनी मला अडकवू नये.       
  पण मी कितीही आत्मविश्वासाने एकादी गोष्ट केली तरी त्यात सुमतीने शंका घेतली तर तिची बत्तिशीच खरी ठरण्याची धाकधुक माझ्या मनात होतीच. नाटकाच्या तालमी सुरू होऊन आठ दिवस होतात न होतात तोच महाविद्यालयाच्या प्रांगणात विचारे समोरून येताना दिसले मला पाहून त्यांचा चेहरा उजळल्यासारखा दिसला.
 "बर झाल सर तुम्हीच भेटलात ते,मी तुमच्याकडेच चाललो होतो" ते म्हणाले आणि आता हे काय सांगतात या कल्पनेने माझे काळीज धडधडू लागले."जरा एक अडचण निर्माण झाली आहे सर,"
"हे बघा विचारे,नाटकाविषयी काही असेल तर मला काही विचारू नका,कारण मी त्यातून अंग पूर्णपणे काढून घेतले आहे."मी त्यांना झटकण्याचा प्रयत्न करत म्हणालो.
"अस कस सर,काही झाल तरी स्नेहसम्मेलन आणि नाटक हे आपल्या सगळ्यांचच नाही का?"मला चुचकारत विचारे.पण मी आता या भानगडीत परत अडकायचे नाही असा निश्चयच केला होता आणि त्यामुळे "हे बघा विचारे,मला आता तासाला जायच आहे,तेव्हां नंतर बोलू या"म्हणून माझी सुटका करून घेतली.पण विचारे माझ्यापेक्षाही सवाई निघाले,कारण मी तास संपवून आलो तेव्हां प्राचार्यांचा शिपाई मुरलीधर माझी वाट पहातच उभा होता. ."सर आपल्याला साहेबांनी बोलावल आहे"अस नमस्कार करीत त्याने मला सांगितले.
  प्राचार्यांना माझी का आठवण झाली याचा अंधुकसा अंदाज मला तासाला जाण्यापूर्वी विचाऱ्यांची गाठ पडली असल्यामुळे आलाच होता.मी त्यांच्या दालनात प्रवेश करताच"या या सुधिरजी " म्हणून त्यानी माझे स्वागत केले.आमच्याच विभागात माझ्याच आद्याक्षराचे आणि आडनावाचे आणखी एक प्राध्यापक असल्याने ते आमचा उल्लेख असा नावाने करत.त्यानी त्यांच्यासमोरील खुर्चीवर बसायला सांगितले.मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पहात राहिल्यावर  फारशी प्रस्तावना न करता ते म्हणाले,"अहो आपल्या स्नेहसम्मेलनाच्या नाटकाची गाडी काही रुळाला लागत नाही.""पण सर,मी नाटकाशी संबधित नाही.ते खाते प्रा.सोमलवार संभाळतात."
"हो बरोबर आहे पण संपूर्ण स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक तुम्ही आहात त्यामुळे तुम्हाला असे म्हणून अंग झटकता येणार नाही.तुम्ही
प्रा.सोमलवार आणि विचारे बसून काय अडचणी आहेत त्यावर विचार करून काय ती तोड काढा,काहीही झाले तरी नाटक उत्तम झाले पाहिजे."
विचाऱ्यांच्या तावडीतून जशी सुटका करून घेऊ शकलो तसे येथे काही जमणार नव्हते त्यामुळे
"ठीक आहे सर बघतो मी " म्हणून मी बाहेर पडलो.बाहेर विचारे माझी वाटच पहात जणु थांबले होते.
"अहो,विचारे,नाटकाचे सोमलवार सर सोडून तुम्ही माझ्यामागे काय हे शुक्लकाष्ट लावून दिलय?"
"माफ करा सर अडचणच अशी आहे जी तुम्हीच फक्त सोडवू शकता."
"बर बोला"
"अस करूया सर,कॅंटीनमध्ये जाऊन बसू या का? शांतपणे चहा पीत बोलू या.सोमलवार सरही येतीलच एवढ्यात.."
"बर झाल सर,तुम्ही आलात,"मला पाहून सोमलवार सरांनी उद्गार काढला,"अहो ते जोशीं आपल्या नाटकाची अगदी वाट लावायला लागलेत."
"का काय झाल?"मी विचारले
"चला,कॅंटीनमध्ये बसून तेथेच बोलू."
"हं आता बोला"चहाचा पहिला घोट घेत मी विचारले.
"अहो सर,ते जोशी काय स्वत: नाटकात काम वगैरे करतात का?"
"काही कल्पना नाही बुवा.अगदी खर सांगू का सोमलवार, विचाऱ्यांनी विनंती केली म्हणून मी या फंदात पडलो नाहीतर तुमच्या नाटकाच्या
भानगडीत मी काही पडलो नसतो.आणि आताही मला पुन्हा त्यात ओढू नका "मी अंग झटकण्याचा प्रयत्न केला.
"अहो सर अस कस म्हणताय?ते काय सांगतात ते ऐकून तरी घ्या"मला पुन्हा आखाड्यात खेचण्याचा प्रयत्न करीत विचारे.
"बर सांगा सर,काय अडचण जोशींनी उपस्थित केलीय?"
"अहो सर ते जोशी प्रत्येक दिवशी नाटकाच्या तालमीला अगदी अथपासून इतिपर्यंत बसतात."
"बरोबरच आहे,आपल्या बायकोची त्यांनी काळजी घ्यायची नाही तर कोणी?"
"बरोबर आहे,त्याविषयी आमची काही तक्रार नाही.सर्वांच्याबरोबर ते चहाफराळही भरपेट करतात त्यालाही आमची काही ना नाही."
"मग गाडे कुठे अडलेय?" मी आश्चर्याने विचारले.
"अहो ते मुलाना एक वाक्य नीट बोलू देत नाहीत,सारखे मधे मधे त्यांना अडवून हे वाक्य असे म्हणायला हवे आणि या ठिकाणी अशी हालचाल करायला हवी असे त्यांचेच दिग्दर्शन चालू असते."
"मग तर बरेच झाल,त्यांच्याकडेच दिग्दर्शनाचा भार सोपवा म्हणजे तुम्हीही मोकळे आणि मीही"
"अहो सर,मला तसे करायलाही वाईट वाटणार नाही,पण मग जोशी आणि आपल्या विद्यार्थ्यांची मारामारी होऊन कोणालातरी दवाखान्यात पोचवायला लागले तर नाटक उभे करायची जबाबदारी तुमची"
"ठीक आहे मग जोशींना का सांगत नाही,तुम्ही येऊ नका म्हणून."
"अहो मी तसे सुचवून पाहिले,त्याना म्हटलेदेखील की तुम्ही उगीच येण्याचा त्रास घेऊ नका आम्ही सौ.जोशींना न्यायला आणि परत घरी सोडायला स्वत: येऊ म्हणून पण तो गृहस्थ ऐकायला तयारच नाही"सोमलवार हताशपणे म्हणाले.  
"आता तुम्ही सांगून काही परिणाम होतो का पहायचे"विचाऱ्यांनी आपले विचारी मन खुले केले.
"म्हणजे पुन्हा तुम्ही माळ माझ्याच गळ्यात घालताय म्हणजे लग्न कर म्हटल तर तूच बायको हो असच झाल हे. इथ तर मी नाटक करायलाही सांगितले नाही "वैतागून मी म्हणालो.
"अस काय करता सर,आता तुम्हीच ही नाटकाची नाव पैलतिरी लावू शकता"काव्यात्मक भाषेचा आधार घेत विचारे.ते स्वत: नाटकात काम करत असल्याचा परिणाम असावा हा.
"बर ठीक आहे काय जमते ते बघतो" उठून आम्ही बाहेर पडलो.
मी घरी आलो तेव्हां माझा चेहरा बराच चिंताक्रांत दिसत असावा,कारण मला पाहून सुमतीने विचारलेच.
"काय हो असा का चेहरा पडलाय.तब्येत ठीक आहे ना?"
"काही नाही"तिला काय सांगायचे हा पेच मला पडला कारण या भानगडीत न पडण्याचा इशारा तिन मला दिला होता.तिने भाकित केल्याप्रमाणेच बडगा आता मला दिसू लागला होता.
"हे बघा,माझ्यापासून काही लपवू नका.तरी मी अगोदरच सांगत होते त्या जोशींच्या भानगडीत पडू नका"
आता तिन विषय काढलाच होता म्हणून मी तिला आमच्या नाटकात उद्भवलेला समरप्रसंग सांगितला.माझे सगळे ऐकून झाल्यावर जरा विचार करत ती म्हणाली,"समस्या अवघड आहे पण काहीतरी तोड काढता येईल असे वाटते"तिच्या मुद्रेवरील भाव मी ओळखले,
"तुझा रंगीत टी.व्ही.घ्यायचा विचार बरोबर होता असे आता मला वाटू लागले आहे."
"मग तुमचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा."सुमतीने मला आश्वासन दिले,"उद्यापासूनच जोशी तालमींना येणार नाहीत" तिने इतक्या आत्मविश्वासाने सांगितले तरी मला काही खात्री वाटत नव्हती.पण आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी मी महाविद्यालयातून परत येताना वाटेतच जोशी मला भेटले म्हणजे त्यांनी मला गाठलेच म्हणणे योग्य ठरेल.आणि कसानुसा चेहरा करत म्हणाले,
"आजपासून मिसेसला नाटकाच्या तालमीला घेऊन जाण्यासाठी काहीतरी व्यवस्था करू शकाल का ?"
"का बरे तुम्हाला येणे जमणार नाही का ?" मी
"हो मला येणे जमणार नाही तेव्हां तिला नेण्यासाठी आणि परत सोडण्यासाठी तुम्हाला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे"
जोशींचे हे वाक्य ऐकून सुमतीचा आत्मविश्वास काही खोटा नव्हता याविषयी माझी खात्री झाली..
"काही काळजी नका करू.आमच्या ग्रंथपाल सौ.बिडकर त्यांना न्यायला येतील"मी त्यांना आश्वासन दिले.
मी घरात पोचताच सुमतीने लगेचच विचारलेच,"काय सुटला ना तुमचा प्रश्न?"मी आश्चर्याने अगदी थक्कच झालो होतो.म्हणजे तिनेच हा तिढा सोडवला होता एकूण.कौतुकाने तिला गदगदा हलवत मी म्हणालो,
"कमाल आहे तुझी,काय जादू केलीस जोशींच्यावर?"
"काही नाही मिसेस टेमकरांना सांगितले आणि काम फत्ते!"
"मिसेस टेमकरांचा काय संबंध यात?" मी आणखीच गोंधळात पडून विचारले.
"अहो एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही,मिसेस टेमकर म्हणजे जोशींचे बॉस टेमकर त्यांची बायको. त्यानी सांगितल टेमकरांना जोशींचा बंदोबस्त करायला."
"मग काय टेमकरांनी जोशींना सांगितले का नाटकाच्या तालमीला जाऊ नका म्हणून?"
" ते कशाला तस सांगताहेत ?  त्यांनी जोशींना उद्यापासून दररोज संध्याकाळी ऑफिसात ओव्हरटाइम करावा लागेल म्हणून सांगितलेय. आता जोशी कसे येतील नाटकाच्या तालमीला ? "
विजयी मुद्रेन माझ्याकडे पहात सुमती उत्तरली. तेवढ्यात दाराची घंटी वाजली.दार उघडताच दारात एक मोठे खोके घेऊन एक माणूस उभा होता.
"कुळकर्ण्यांच घर हेच ना ? वॉचलॅन्ड कडून हे घेऊन आलोय."
हे म्हणजे काय असेल हे मी न सांगताच ओळखले.
"अरे वा आलाच वाटत,मिसेस टेमकरांचा फोन आल्यावर लगेचच मी वॉचलॅंडमध्ये जाऊन ओनिडा पाठवून द्या म्हणून सांगून आले होते , आपण तसेच ठरवले होते, की नाही? "
"माझ्या प्रश्नांकित मुद्रेकडे पहात सुमतीने खुलासा केला.तिच्या सल्ल्याचे मोल आता माझ्या ध्यानात आले होते.