ठुमरी

बोलायाला मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती तितकी आता 'ती'ही उपरी नाही

जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही

मास्तर विझलेले अन बेचव चोथापाणी शिक्षण
घडते रडके जगणे जेथे शाळा हसरी नाही

मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही

जगणे आता झापडलेले; लेझिमतालावरचे
ख्याल, तराना नाही किंवा टप्पा ठुमरी नाही