२६ जानेवारी २००९, गांधीभवन, पुणे - हिडीसपणाचा कळस!

हा मी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे.

दि. २६ जानेवारी २००९ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता गांधीभवन, पुणे या आवारात माझा कवितांचा कार्यक्रम होता. माझे काही स्नेही, काही रसिक जमले होते. मात्र आम्हाला ऐनवेळी आमच्या कार्यक्रमाचे स्थळ बदलावे लागले, सुदैवाने तितकेच किंवा त्याहुनही चांगले स्थळ लगेच उपलब्ध झाले व तेही अगदी जवळच, त्यामुळे बरे झाले.

असे होण्याचे कारणः

कोथरुड, पुणे येथे गांधीभवन हे महात्मा गांधी यांच्या स्मृती जपणारे स्थळ असून ते जवळ जवळ २५००० चौ फुटांच्या एरियामध्ये आहे. त्यात एक मोठे सभागृह असून ते सभागृह जवळजवळ १०००० चौ फुटांचे आहे. या सभागृहात एक व्यासपीठ आहे व सुमारे १५० जण बसू शकतील अशी व्यवस्था आहे.

या ठिकाणी त्यादिवशी 'आर्य व वैष्य' युवक प्रतिष्ठानला जागा देण्यात आली होती. त्यांचा कसलातरी वर्धापनदिनासारखा दिवस असावा, ज्याचे नामकरण करण्यात आले होते 'जलसा २००९ - बॅचलर्ससाठी '!

या कार्यक्रमात साधारणपणे २५ युवती व ३० ते ४० युवक होते. एक डी जे होता. अत्यंत हिडीस गाणी लावून येथे बीभत्स नृत्य चालले होते. त्या बीभत्सपणामध्ये मुली अजिबात मागे नव्हत्या. आम्ही मोजून ३ वेळा विनंती केली, पण जवळजवळ ३ तास हा ओंगळवाणा कार्यक्रम चालूच होता.

मी अशा प्रकारचे नृत्य यापुर्वी फक्त पुण्याच्या गणेश उत्सवात व आयटेम साँग्ज मध्ये पाहिलेले आहे.

माझ्याकडे ( माझा कार्यक्रम असल्यामुळे ) कॅमेरा होता. मी त्या हिडीस नृत्याचे ३ फोटो काढले आहेत. त्यांचे काय करावे काही समजत नाही.

इथे महात्मा गांधींनी दाखवलेल्या  मार्गावरच मी कायम जातो असा दावा करायचा नसून निदान त्यांच्यासाठी असलेल्या सभागृहात असे होऊ नये असे मनात वाटले, हे सांगायचे आहे.

मित्रांनो,

माझी अशी मनापासून इच्छा आहे की कुणाला शक्य असल्यास हा मुद्दा खरच पेटवावा ज्याने काही प्रमाणात तरी निर्लज्ज वर्तावास मर्यादा पडू शकतील. निदान मला तरी हे सांगावे की कुणाचे काही काँटॅक्टस आहेत काय, जेथे मी ते फोटो व माझा लेख पाठवू शकेन.