विश्राम

मान्य, गर्दी फार येथे अन् तिथे विश्राम आहे
मुक्तिच्या वाटेवरीही हाच ट्रॅफिक जाम आहे

वाट जग ह्याचीच बघतय, मी कधी कोषात जातो
रेशमाचा भाव हल्ली वाढला बेफाम आहे

खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
का तरी माझा स्वत:शी चालला संग्राम आहे?

लक्तरे लेऊन अंगी धाडले होते लढाया
अंत्ययात्रेला परंतू केव्हढा इतमाम आहे

चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, " नाहीतरी मज काय दुसरे काम आहे? "

मूर्तिपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच काफिर
पूजती काबा कुणी, कोणास शालिग्राम आहे

उडवुनी घेऊन गेला शब्दपाचोळ्यास वारा
राहिले निष्पर्ण मागे मूक अंतर्याम आहे...