श्वासात ताल आहे

तलवार चालवावी दुसऱ्या कुणीहि येथे
माझी सदाचसाठी हातात ढाल आहे

भक्ती स्वतःच करता, मूर्तीस जान देता
वरती तिलाच नमता, तुमची कमाल आहे

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
होता 'उद्या' जो 'परवा', आता तो 'काल' आहे

मदिरा खराब आहे जो सांगण्यास येतो
तोही पिऊन जातो, सगळी धमाल आहे

'जाणे तिचे नि येणे', सारे थिजून पाही
दुर्मीळ फार हल्ली हंसाची चाल आहे

भेटो कितीक येथे, पण गीतकार माना
त्यालाच सत्य ज्याच्या, 'श्वासात ताल आहे'

हिरवा गुलाल येथे दंग्यास मूळ होतो
पण रंग दोन्हिकडच्या रक्तास लाल आहे

बाजार हा कवींचा, सवलत हजार टक्के
करणार काय सांगा? बकवास माल आहे

चाळीस वर्ष माझी चालू असे परीक्षा
माहीत ना मलाही, केव्हा निकाल आहे!

या लोचनांत लाली, ओठात धूर काळा
हिरवे विचार, माझा, रंगीन हाल आहे

झाले जगून ज्याचे, सोडून जात आहे
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे

-भूषण कटककर - पुणे - ९३७१० ८०३८७