पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचा घोळ

बे एरिया मध्ये महाराष्ट्र मंडळाने येत्या फेब्रुवारी मध्ये पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन करण्याचे ठरवले आहे. त्या बाबत बरीचशी जाहिरातबाजी, स्वतःची पाठ थोपटून घेणे हे प्रकार सुरु झाले आहेत. परंतू या संमेलना मागचा हेतू काय? त्याने नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत? आणि हे सर्व करताना कोणाची पोळी भाजून घेतली जाणार आहे? हे आणि असे अनेक प्रश्न बे एरियातील असंख्य मराठी लोकांना पडले आहेत.

मुळात हे संमेलन भरवताना जे मुद्दे लपवले गेलेत अथवा खोट्या पध्दतीने सांगीतले गेलेत त्याचे कारण काय? ही धुळफेक करण्याचे प्रयोजन काय? बे एरिया महाराष्ट्र मंडळ किती खोटे बोलते आहे हे लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हा प्रयत्न.

१. मंडळाने असा दावा केला आहे कि त्यांचे २००० सदस्य आहेत:
नक्की? मुळीच नाही. मंडळाची सदस्य संख्या २५० च्या वर नक्कीच नाही. मंडळ हे अमेरिकेत ना-नफा (नॉन प्रॉफिट) तत्वावर चालणारी संस्था आहे. ह्या संस्थेच्या साठी असणार्‍या मार्गदर्शक तत्वानुसार मंडळाच्या सदस्यांची संख्या आणि नावे सर्वांना खुली असली पाहिजेत. मंडळ ही यादी प्रसिध्द करू शकते का? त्याच प्रमाणे कॅलिफोर्निया नॉन प्रॉफिट गव्हर्निंग बॉडी कडे याची यादी द्यावी लागते. ती तशी दिली आहे का? त्याच नियमानुसार नॉन प्रॉफिट संस्थेने दरवर्षी अहवाल प्रसिध्द करणे आणि तो सगळ्या सदस्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मंडळाने गेली कित्येक वर्षे अहवालच प्रसिध्द केला नाही. का? कारण मंडळाच्या कार्यक्रमांना भरगोस(?) प्रतिसाद मिळाला असा तद्दन खोटारडेपणा आणि मागल्या दाराने केलेले व्यवहार उजेडात येतील ना!!

2. मंडळाचा असा दावा आहे कि मंडळ असे मोठे कार्यक्रम करू शकते आणि असे कार्यक्रम करण्यासाठी लागणारे कौशल्य, पैसा आणि मनुष्यबळ मंडळाकडे आहे. आता हे कसे फसवे आहे हे आपण बघूया:
- मंडळाचे बहुतांशी कार्यक्रम तोट्यात जातात.
- मंडळाचा एप्रिलमध्ये होणारा चैत्रधुन हा कार्यक्रम २००० सालापासून सदैव नफ्यात व्हायचा. २००७ आणि २००८ या दोन्ही वर्षी हा कार्यक्रम १००० डॉलर तोट्यात का आहे?
- मंडळाच्या इतिहासात नाटक हे सदैव दुभती गाय होती. २००५ साली मंडळाला ३५०० डॉलर्स इतका निव्वळ फायदा नाटकामुळे झाला. असे असताना २००७ साली झालेल्या नाटकात ५०० डॉलर्स तोटा आणि २००८ साली केलेल्या सुयोगच्या नाटकांना पण प्रचंड तोटा सहन का करावा लागला? सुयोगची नाटके झालीत त्याची तिकीटविक्री होती अवघी १२५. सभागॄहाची क्षमता ४५०. म्हणजे फक्त १/४ सभागॄह फक्त भरले होते. लोकांनी दिलेला हा भरगोस(?) प्रतिसाद बघून मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव सभागॄहाकडे फिरकलेसुध्दा नाहीत. सुयोगचे कलाकार त्यादिवशी मंडळावर भयंकर उखडले होते हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे.

3. इतर कार्यक्रम अंदाजे २००० डॉलर्सचा तोटा. का? कारण कुठल्याही कार्यक्रमांना लोकंच येत नाहीत. मंडळाने २००७-०८ मध्ये जे ठळक कार्यक्रम केलेत त्याला उपस्थित असलेल्या संख्याच पुरेशी बोलकी आहे. बे एरियात जर १००० मराठी कुटुंबे रहातात तर ही संख्या एव्हढी कमी कशी आणि का?
- २००७ नाटक - १३०
- २००७ चैत्रधून - १७०
- २००८ सुयोग नाट्यमहोत्सव १२५
- २००८ चैत्रधून - १००
- २००८ मराठी सिनेमा (वासूदेव बळवंत फडके) - ५५
थोडक्यात म्हणजे या कार्यकारीणीकडे मोठा कार्यक्रम करण्यासाठी लागणारे कौशल्या अजिबात नाही. मग कसे काय हे एव्हढ्या मोठ्या प्रमाणवर भरणारे साहीत्य संमेलन यशस्वी करणार?

4. मंडळाने साहित्य संमेलन भरवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतले होते का?
नाही. या बातम्या वर्तमानपत्रातुन कळल्या. जर कार्यक्रम स्थानिक लोकांसाठी आणि त्यांच्या जिवावर करायचा तर त्यांना सांगायला देखील नको? परस्पर घाई घाईत मंडळाकडून १००० डॉलर्स महामंडळाला पाठवायचे. महामंडळानेही त्वरेने त्यांना सदस्य म्हणून मान्यता द्यायची आणि महाराष्ट्रातील इतर संस्थांच्या तोंडाला पाने पुसायची, यात कोणालाच काही काळेबेरे दिसत नाही? ही घाई आणि लपवाछपवी कशासाठी? मग यात मंडळाचे किंवा साहित्यपरिषदेचे काही आर्थिक हितसंबंध तर गुंतले नाहीत ना? अशीच शंका येते.

५. लपवाछपवीचे आणखी एक उदारहण म्हणजे, मंडळाला नक्की किती वर्षे झालीत? मंडळाला २५ वर्षे झालीत मग मंडळाच्याच संकेत स्थळावर १९६९ साली झालेल्या सहलीचे छायाचित्र (सौजन्यः सौ. अलका करंदीकर) दिसते आहे. तसेच मंडळाने प्रसिध्द केलेल्या 'स्पंदन' या वार्षीक अंकात देखील याचा उल्लेख आहे. (या 'स्पंदन' अंकासाठी सौ. कर्‍हाडे यांनी प्रचंड मेहनत घेतली पण मंडळाने अंकातील साहित्य टाईपसेटर कडुन परस्पर पळवून छापला आणि त्यावर संपादक म्हणून सौ. कर्‍हाडे यांचे नाव न टाकता कोणातरी भलत्याच माणसाचे नाव संपादक म्हणून छापले. का? तर सौ. कर्‍हाडे यांनी मंडळातील गैरकारभार उजेडात आणण्याचा गुन्हा केला म्हणून.) आणि त्याच पानावर 'MMBA’s 25th Year Celebration!!!' असेही लिहिले आहे. काय खरे मानायचे? हे काय गौडबंगाल आहे? २५ वर्षे नक्की कशाची पुर्ण झालीत? या बाबत अधिक संशोधन केले असता मंडळाने घुमजाव करून उत्तर दिले कि मंडळाची घटना लिहून २५ वर्षे झालीत म्हणून हे रौप्यमहोत्सवी वर्ष. हरकत नाही भारत नाही का १९४७ साली स्वतंत्र झाला आणि घटना १९५० साली अस्तित्वात आली? पण मग ही माहीती स्पष्ट शब्दात आधीच का नाही सांगता आली? ही धुळफेक का? हा संदिग्धपणा काय साधण्यासाठी केला जातो आहे?
आज या घटनेला २५ वर्षे झालीत म्हणून हा खटाटोप चालला आहे त्याच घटनेला काळीमा फासणारी कॄत्ये मंडळाने गेली दोन वर्षे केलीत त्याचे काय? मंडळाच्या कार्यकारणीतील काही लोकांनी तर 'आम्ही ही घटना-बिटना ओळखत नाही' अशी मुक्ताफळे उधळली होती. आणि या मनमानी कारभाराचा जाब विचारायला गेलेल्या श्री. डॉ. भिवंडकर यांचे सदस्यत्वच मंडळाने रद्द केले. हे डॉ. भिवंडकर म्हणजे मंडळाचे संस्थापक. काय गंमत आहे पहा, आपला स्वार्थ साधण्यासाठी, मनमानी कारभार करण्यासाठी आणि लपवाछपवी साधण्यासाठी, संस्थेच्या संस्थापकालाच हाकलून देण्यापर्यंत मंडळाच्या कार्यकारीणीची मजल जाते. या आणि अशा अनेक सुरस कथांनी भरलेला इतिहास आहे या मंडळाचा. मग ही मनमानी करण्यासाठीच का ही २५ वर्षाची सबब?

६. मंडळ बे एरियात ग्रंथालय चालवते असे म्हणतात, मला तर ते कधी रांगताना देखील दिसले नाही. किती नियमीत वाचक आहेत मंडळाच्या ग्रंथालयाचे? २०-२५. मंडळ त्या पुस्तकांमध्ये दरसाली किती भर घालतं? शुन्य. मंडळाच्या कार्यकारीणीपैकी किती लोक ही पुस्तकं वाचतात? यु-ट्युबवरती मुलाखत बघीतल्यावर मनात आलेला आकडा, शुन्य. बाकी काही म्हणा भारतीयांनीच लावलेला शुन्याचा शोध हा फारच उपयुक्त शोध आहे.
यु-ट्युब वरती मंडळाच्या प्रतिनिधींनी 'आमच्या लायब्ररीमध्ये ५०० पुस्तके आहेत' (अरे चुकलो! खरं म्हणजे 'बुक्स' म्हणायला हवं नाही का? कारण यु-ट्युब वर तर त्यांनी असेच म्हटले आहे.) अशा प्रकारचे निवेदन केले आहे. मंडळाच्याच संकेतस्थळावर मात्र फार तर २३६ पुस्तकांची यादी दिलेली आहे. ही त्या संबधीची लिंकः http://www.mmbayarea.org/main/library.htm
म्हणजे एकतर मंडळ या बाबतीतही दिशाभूल करते आहे किंवा मंडळाच्या ग्रंथालयात जर खरेच ५०० पुस्तके असतील तर त्यांची सुची करण्या इतपत देखील त्यांना आस्था नाही.
आणि मग असे अचानक मंडळाचे मराठीवरचे प्रेम एकाएकी का उतू जाते आहे? या कार्यकारीणी पैकी कोणी साहित्तिक आहे? नाही. कोणी साहित्य, कला, नाटक, संगीत याच्यासाठी काही केले आहे? नाही. यांच्यापैकी कोणी साहित्यसंमेलनाला तरी गेले आहे? नाही. यांच्यापैकी कोणी मराठी साहित्य नियमीत वाचतो? यु-ट्युब वरच्या यांच्या मुलाखती बघून तर ही मंडळी मराठी बोलतात तरी का अशीच शंका येते. मग का? याचे उत्तर मला तरी एकच दिसते 'प्रसिध्दी'. एक वचन आहे:

घटं भिंद्यात, पटं छिंद्यात, कुर्यातरासभरोहणं,
येनकेनप्रकारेण, प्रसिध्द: पुरुषो भवेत।

याचाच प्रत्यय येतो आहे.

७. जुलै महिन्यात मंडळाने 'मैत्र' संमेलन सॅन फ्रन्सिस्को येथे आयोजीत केले होते. भयंकर गर्दी झाली होती (म्हणे)!! १७५-२०० लोकं आली होती, आख्ख्या अमेरिकेतून!!! म्हणजे ५० राज्यातून २००, तर प्रत्येक राज्यातून ४!!!! साहित्य संमेलानाची गत याहून वेगळी असण्याचे कारण नाही. आणि त्या साठी १-१.५ लाख डॉलर्स इतका खर्च! का?

८. वर्तमानपत्रात दिलेल्या प्रसिध्दीवरुन असे लक्षात येते कि या संमेलनाला भारतातून लोक आणण्याचा प्रयत्न चालला आहे. राजा-राणी ट्रॅवल्स याच्या साठी पॅकेज देते आहे. तुमचे आई-वडिल, भाऊ-बहिण, काका-मामा यांना संमेलनाला अमेरिकेत बोलवा असा प्रचार चालू आहे. थोडक्यात म्हणजे इथे संमेलनाच्या नावाखाली अमेरिकेत पिकनिक करायला या (जमल्यास तुमच्या मुलीचे/सुनेचे बाळंतपण सुध्दा उरकून घ्या, तेव्हढेच पॅकेजमुळे जरा स्वस्त पडेल. नशीब पॅकेजच्या नावावर मुलाला/मुलीला कळवायला सांगीतले नाही कि यंदा येतोच आहोत तेव्हा बाळंतपणाचे मनावर घ्यावे इ. इ. इ.). तुमचा साहित्याशी (अथवा संमेलनाशी) काही देणे-घेणे असो किंवा नसो. (नशीब संमेलनाला येणार्‍या प्रत्येकाला एक विदेशी मद्याची बाटली मोफत भेट म्हणून देत नाहीयेत. नाही तर महाराष्ट्रात निवडणुकीच्या वेळेला जसे ट्रक भरून माणसं आणतात आणि जय-जय ओरडायला ५० रू., मोर्च्यात नाचायला २०० रु आणि मतदानाला जाण्यासाठी एक मोसंबी-नारंगीची बाटली देतात तसलाच प्रकार केला असता.). हे असेच पॅकेज राजा-राणी ट्रॅव्हल्सने या पुर्वी महा इतर राष्ट्रातल्या संमेलनाला दिल्याचे कधी स्मरत नाही. मग यंदाच का? कि 'आर्थिक (गैर?) व्यवहार' हेच या मागचे कारण आहे? संमेलन वगैरे सोडा हो! त्याचा आमच्या ट्रॅव्हल्सशी काय संबध?

९. या यात्रेत किती फुकट्यांची वर्णी लागणार आहे? नक्की साहित्तिक किती? नुसतेच फुकटात हिंडायला मिळते म्हणून येणारी पदाधीकारी किती? ज्यांचा साहित्याशी कसलाही संबंध नाही असे राजकारणी किती? आणि यांचा खर्च नेमका कोण करणार? कि तो भुर्दंड सामान्य सदस्य, जो स्वतःचा वेळ आणि पैसा मोजून जाणार त्याच्याच खिशातून उपटणार?
एकंदर अपेक्षीत खर्च आहे 1.5 लाख डॉलर्स. हा खर्च करण्यापेक्षा मंडळाचेच लोकं महाराष्ट्रात संमेलनाला का नाही जात? तिकडून येणार्‍या लोकांना पॅकेज देण्यापेक्षा इथून संमेलनाला जावू इच्छीणार्‍या लोकांनाच का नाही प्रोत्साहन देत? वाटल्यास ह्या पैशातून महाराष्ट्रातच एखादा प्रकल्प का नाही चालू करत? हे विधायक काम संमेलन भरवण्यापेक्षा चांगले नाही का?
आणि या सगळ्यांमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस संमेलनाला मुकणार नाही का? एव्हढेच नाही तर दरसाली पुस्तकांची कोट्यावधींची उलाढाल होते, ते प्रकाशकांचे नुकसान कोण भरून देणार? मराठी भाषेच्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या पण आपल्याच मराठी लोकांना खड्ड्यात घालायचे, 'अस्सल मराठी बाणा' दुसरे काय?

१०. आणखी एक गोष्ट मंडळ सांगते आहे कि संमेलनाला बर्कले-स्टॅनफर्ड यांचे प्राध्यापक वगैरे येतील आणि या विश्वविद्यालयातून मराठी शिकवायला प्रोत्साहन मिळेल. स्टॅनफर्ड मध्ये १८ भाषा शिकवल्या जातात. त्यात हिंदी, पंजाबी आणि संस्कॄत या भारतीय भाषांचा समावेश आहे. तेलगू, तामिळ, गुजराथी, मल्याळी यांची संख्या मराठी लोकांपेक्षा जास्त असून त्या भाषा शिकवल्या जात नाहीत तर मराठी का शिकवतील? आणि त्यांनी असे प्रयत्नही केलेत. मग जर ह्या भाषा या विश्वविद्यालयांनी शिकवायला सुरू नाही केल्यात तर मराठीच का करतील? बरं असे किती प्राध्यापक संमेलनाला येणार आहेत? आणि संमेलनाला आल्याबरोबर मराठीचा उदोउदो सुरू करतील अशी अपेक्षा करणेच मुर्खपणाचे नाही का?

११. या संमेलानाला ज्या-ज्या व्यक्तींनी विरोध केला त्या त्या प्रत्येकाला मंडळाने त्रास द्यायचा भरपूर प्रयत्न केला. का तर त्यांनी "हे साहित्य संमेलन आहे डोंबार्‍याचा खेळ नाही" हे सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून? काही लोकांच्या विरोधात मंडळाने अमेरिकन सरकारकडे त्यांचा व्हिसा रद्द करा अशा प्रकारची पत्रेही पाठवलीत. खरे तर मंडळाने इथे स्थायीक झालेल्या (वा होवू इच्छीणार्‍या) व्यक्तीला मदत केली पाहीजे नाही का? मग हे कॄत्य कशासाठी? आपल्याला हवे तसे नाचायला आक्षेप घेणार्‍या लोकांना फक्त त्रास देण्यासाठी?

१२. सुरुवातीला '२५०० लोकांची उत्साहवर्धक उपस्थीती' असे जाहीर करण्यात येत होते, त्यावेळेस बुकिंग जवळ्पास शुन्य होते. आता परिस्थीतीची जाण आल्यावर कार्यक्रमाची जागा बदलली ज्यात फक्त ७०० लोकांची सोय होवू शकते. त्यात देखील ३००-४०० लोक भारतातून येणार आहेत, जर व्हिसा मिळाला तर. म्हणजे फक्त ३०० लोक सबंध अमेरिकेतुन हजर रहाणार. त्यातही संमेलनात भाग घेणार्‍या कलाकारांनाही तिकीट घेणं अनिवार्य केले आहे. म्हणजे एव्हढा आटापिटा करुन फक्त २०० च्या दरम्यान लोक येणार. काय काही गणीत जमतय का?

१३. या संबध कार्यक्रमात साहित्या विषयक कार्यक्रम किती आहेत? अंकुष चौधरी, र्‍हुदयनाथ मंगेशकर, प्रशांत दामले, भरत जाधव, यांना साहित्तीक दर्जा देवून काय साध्य करायचे आहे? कि साहित्य संमेलनाच्या नावावर नाच-गाणी आणि गल्लाभरु कार्यक्रमच करायचे आहेत? कि साहित्य परिषदेचे सदस्य पण फक्त फुकटात अमेरिकावरी वारी करायला मिळते आहे म्हणून याच्या कडे डोळेझाक करून बसलेत?

१४. महाराष्ट्र सरकार या संमेलनासाठी २५ लाख रुपये देणार आहे आणि हे मंडळ निर्लज्ज पणे घेणार आहे. अरे काही जनाची नाही तर मनाची. भारतातून पैसे आणून ईथे चंगळ करण्याचा एव्हढा का अट्टाहास? खरं म्हणजे एन. आर. आय. लोकांनी भारतातल्या लोकांसाठी काही करावे ही अपेक्षा असते/आहे. या २५ लाख (आणी हे मंडळ करणार आहे तो खर्च वेगळाच) रुपयात महाराष्ट्रात कितीतरी गावात बोअरवेल बांधता येतील. कित्येक ठिकाणी शाळा सुरु करता येतील. किंवा आणखी काही विधायक कार्ये करता येतील.
आणी एव्हढाच जर मराठी साहित्या विषयी कळवळा असता तर भारतातील एखाद्या ग्रंथालयाला भरीव मदत करता आली असती किंवा असे आणखी बरेच उपक्रम आहेत की ज्यांना मदत करता येईल. कलाने मराठी पुस्तकांचा प्रकल्प चालू केला आहे त्याला मदत करता आली असती. याच कला या संस्थेने या पुर्वी 'लेखक आपल्या भेटीला' या सारखे उपक्रम बे एरिया मध्ये राबवले होते, त्याला मंडळाने किती हातभार लावला? शुन्य. कला सारख्यासंस्थेने मराठी सहित्य, नाट्य, संगीत या साठी नुकसान सोसून प्रकल्प राबवले. आणी याच साठी कलाच्या श्री. मुकुंद मराठे यांनी या संमेलनाला विरोध केला. पण दुर्दैवाने त्यांचे सांगणे अरुण्यरुदनच ठरले. आजही कला सारखी संस्था नुकसान सोसून हे प्रकल्प चालवते आहे. या संस्थेला विश्वासात घेवून जर हा कार्यक्रम आ़खला असता तर मला नक्की खात्री आहे की हे साहित्य संमेलन खरोखरच दॄष्ट लागण्या सारखे झाले असते. परंतू विश्वासात घेणे तर सोडाच पण साधे सांगण्याचे देखील कष्ट मंडळाला घ्यावेसे वाटले नाही. अहो बरोबरच आहे तसे केले असते तर हवे तसे नाचायला नसते ना मिळाले.

१५. बरं जर मंडळ ईतके उदात्त कार्य करते आहे तर अमेरिकेतील एकाही मंडळाच्या वेब साईटवर किंवा बृहन-महाराष्ट्र मंडळाच्या वेब साईट्वर या साहित्य संमेलनाचा साधा उल्लेखही नसावा हे आश्चर्य नाही का? पण खरी गोष्ट अशी आहे कि या पैकी एकाही संस्थेला हे संमेलन अमेरिकेत पळवून आणणे आवडलेले नाही. त्याच प्रमाणे बे एरियामध्ये रहाणार्‍या आणी ज्यांचा साहित्याशी संबंध आहे अशा एकाही व्यक्तीला ईथे संमेलन होणार आहे याच्याशी काहीही घेणेदेणे नाही असे का?

या सगळ्या उदाहरणा वरून काही गोष्ट लक्षात येतातः
१. या मंडळाला साहित्याविषयी कसलाही कळवळा नाही. केवळ खोटे बोलून प्रसिध्दीसाठी धडपड चालू आहे.
२. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आखणी करण्याचा या मंडळाला कोणताही अनुभव नाही.
३. बे एरियात अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची कोणतीही आवश्यकता नाही.

थोडक्यात म्हणजे हे संमेलन करण्यामागचा हेतू जरी उदात्त दाखवण्यात येत असला तरी तो नक्की तितका उदात्त नाही ही शंका घ्यायला भरपूर जागा आहे. या प्रश्नांची मुद्देवार उत्तरे मंडळ देऊ शकेल काय? आणि दिलीत तर 'एव्हढे मोठे कार्य करायचे म्हणजे विरोध होणारच' अशी मंत्र्याच्या थाटातली गुळमुळीतच असणार.

--> श्रीपाद कुलकर्णी