लेखणी

काय मी सांगू तुला, केव्हा उचलली लेखणी
तू तिथे फुललीस अन् येथे बहरली लेखणी

पाहिले गजगामिनीसम चालता जेव्हा तुला
त्या दिसापासून लिहिताना ठुमकली लेखणी

पाहिले नव्हते तुला, झुंजार होती तोवरी
पाहता तुज काव्यपंक्तींने निथळली लेखणी

काव्य गुजगोष्टीत आहे, काव्य आहे मीलनी
आजवर मी कागदावर का झिजवली लेखणी?

कोडकौतुक संयमाचे मी तिच्या केले खरे
सोबतीने, हाय, पायाच्या घसरली लेखणी

------------------------------------------------------------------------------------

'पिंड गाण्याचा नसे माझा', गरजली लेखणी
शस्त्र हाती घेतल्यागत मी परजली लेखणी

काय ताळू, काय कागद, माणसा संयम कुठे ?
जीभ कोणी उचलली, कोणी उचलली लेखणी !

काय अन् सांगू किती, होते असे कायम तिला
मोजक्या शब्दांत बोलाया न शिकली लेखणी

सांगते तोंडावरी राजासही, "तू नागवा"
ती खरी निर्भीड बाण्याची निपजली लेखणी

लादले निर्बंध त्यांची पेटली सिंहासने
दहशतीच्या प्राणवायूने भडकली लेखणी

छाटल्या जेव्हा जिभा, कैदेत लाखो टाकले
आग झाली, घन तमी पेटून उठली लेखणी

ऐकले नाही कुणाचे, थांबली नाही कधी
हाक आली दूरची तेव्हाच मिटली लेखणी...