च्याव ज्झ

 चीनला जायचे तर सिंगापुरला लेकराला भेटुनच जावे असा विचार करून आस्थापनेच्या पर्यटन संस्थेला सिंगापुर मार्गे प्रवासाची व्यवस्था करायला सांगितली तर त्यांनी नकारघंटा वाजवली. म्हणे सिंगापुर एअरलाईन्सने पर्यटन संस्थांना अडत देणे बंद केल्याने सर्व पर्यटन व्यावसायिक संस्थांचा सिंगापुर एअरलाईन्सवर सध्या बहिष्कार आहे. त्यांनी शिताफीने हॉंग कॉंग, कुआला लुंपुर, बॅंकॉक अशा तीन रुपरेषा आखून दिल्या. पण जाणार तर पोराला भेटुनच जाऊ यावर मी ठाम होतो. मग मी सिंगापुर एअरलाईन्सच्या संस्थळावर गेलो आणि चार दोन वेळा मागे पुढे होता करता अखेर हव्या त्या तारखांची तिकिटे जमवली. आता एक गोची होती; आमच्या आस्थापनेचा नियम आहे की आस्थापनेने निश्चित केलेल्या पर्यटन संस्थे व्यतिरिक्त कुणीही अन्यत्र तिकिटे विकत घेऊ नयेत आणि या नियमाला बगल द्यायची असेल वित्त - लेखा वगैरे मंडळी काड्या करतात. मग अखेरचा मार्ग - व्यवस्थापकिय संचालकांची परवानगी. नेमके साहेब त्या दिवशी बाहेर होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या स्विय सहायिकेला लग्गा लावून सकाळीच त्यांची भेट घेतली. ’हात्तीच्या, इतकेच ना? तुझे तिकिट काढ तुच आणि जा, कामाबरोबर मुलाची भेट होत असेल तर अवश्य जा, आल्यावर देयक माझ्याकडे पाठवून दे" असे म्हणत त्यांनी परवानगी दिली. पण पुन्हा लोचा. मुंबई सिंगापुर तिकिटे सर्व तारखांसाठी उपलब्ध असली तरी सोमवारी सकाळी सिंगापुर - ग्वांग्ज्झौ चे उड्डाण ओसंडून जात असल्याचे शुभवर्तमान समजले. आता एकच पर्याय होता, शनिवारी रात्री सिंगापुर आणि रविवारी सकाळी पुढे चीन; परतीच्या प्रवासात सुदैवाने हवी ती तिकिटे उपलब्ध होती म्हणजे येताना भेट नक्की.

तिकिटे काढली खरी, पण रविवारी दुपारी एक नाही वाजला तर चीनला पोचून करणार काय? सोमवारी सकाळी कामाला सुरुवात करता येईल हे सोयीचे असले तरी रविवारी काय? ताबडतोब चिंग वनला निरोप धाडला, ती रविवारी इथेच आहे का आणि तिला वेळ आहे का? उलट टपाली निरोप आला की ती इथेच आहे आणि तिला दुसरे काही लष्टक नसल्याने ती मोकळीच आहे. तिने आग्रहच केला की अनायसे तिचे आई बाबा सध्या इथेच आहे तर त्यांची माझी गाठभेट होईल. तिने तिच्या आईचा आग्रहाचा निरोप दिला की सामान हॉटेलात टाक आणि घरीच ये, च्याव ज्झ खायला. च्याव ज्झ? माझ्या प्रश्नाला तिने उत्तर दिले, ’ते इथे आल्यावर समजेल, आत्ता नाही सांगत’ बरे झाले, रविवारी जरा वेळ काढून मित्रांच्यात जायचे तर नेमका रविवार एकट्याने पकायची वेळ आली होती, ते टळले. शिवाय चीनमध्ये आत्तापर्यंत अनेक गावच्या अनेक हॉटेलात अनेक प्रकारचे जेवण झाले असले तरी अजून चीनी घरात घरगुती जेवण जेवायचा योग आला नव्हता. शेवटी घरचे जेवण वेगळे. आपल्या कडे नाही का, मराठी पदार्थ देणारी उपाहारगृहे असली तरी बाहेरचे थालिपिठ वेगळे, घरच्या थालिपीठाची चव त्याला नाही. चिंग वन मला घ्यायला थेट विमानतळावरच येणार होती, पण मला तिथून घेऊन इथे फोशनमध्ये हॉटेलवर उतरवण्याची व्यवस्था झाल्याचे मी तिला सांगितले. रविवारचा आराम सोडून तिला उगाच तीन तासाचा प्रवास कशाला? मी हॉटेलवर आलो, की कळवतो मग आपण भेटू असे मी सुचवले.

दुपारी हॉटेलवर पोचलो. मस्त गरमागरम चहा मारू, आंघोळ करू आणि मग चिंग वनला बोलावू असा विचार केला, मात्र चहा घेता घेताच तिची साद आली ’कुठे आहेस? ’ ’अठ्ठेचाळीसाच्या मजल्यावर’ मी तिची गंमत कराय्ला उत्तरलो. मग लगेच खुलासा केला ’हन आन र्री स’ - म्हणजे स्विस्सोटेल. चीनमच्ये हॉटेलचे नाव चीनी भाषेत वेगळे असते आणि अनेक चीन्यांना मूळ इंग्रजी नाव माहित नसते हा शोध मागे मला चिंग वनमुळेच लागला होता. तेव्हा मी फोशानला न येता बाईयून विमानतळावरील नोवोटेल मध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच्या उड्डाणाने परस्परच चावझ्झौ ला जाणार होतो. मग संध्याकाळी ती विमानतळावर आली आणि तिने मला दूरधवनीवरून विचारले की या हॉटेलचे चीनी नाव काय? कारण तिने विमानतळावर दोघा तिघांना विचारले तर हे हॉटेल कुणालाच माहित नव्हते! मी चक्रावलो, इतके मोठे अगदी समोर असलेले हॉटेल कुणालाच माहित नसावे? मग मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता शोध लागला की नोवोटेल ला चीनी भाषेत ’लु फु ते’ म्हणतात. हे नविनच होते. भाषा कुठलीही असली तरी नाव कसे बदलेले? ताज ला एखादा भैया ताजवा म्हणेल तर एखादा मद्रदेशिय थाज म्हणेल, बस इतकेच. पण चीन मध्ये स्थानिक भाषेत हॉटेलचे नाव वेगळे असते हे ऐकून मी चकित झालो होतो. तेव्हापासून कुठल्याही हॉटेलात उतरताना त्याचे स्थानिक नाव आवर्जून विचारून ठेवतो.

अर्ध्या तासातच स्वागतकक्षातून चिंग वन आली असल्याचा निरोप आला आणि मी खाली उतरलो. साधारणत: चिंग वन नववर्ष साजरे करायला सुट्टीत तिच्या हुबै प्रांतात जाते पण यंदा तिचे आई बाबाच इथे राहायला आले होते. त्यांची सचित्र ओळख असली तरी तरी प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता. मीही त्यांना भेटायला उत्सुक होते. बरेच दिवसांनी भेट होत असल्याने आम्ही निवांतपणे गप्पा मारत बसलो. अचानक तिच्या लक्षात आले की घरी आई बाबा वाट पाहत असतील. आज काही नेहेमी सारखी गप्पा मारून व जेवण करून ती तिच्या घरी आणि मी माझ्या खोलिवर असा प्रकार नव्हता. आम्ही तिच्या घरी पोचलो. तिच्या आई बाबांनी आनंदाने स्वागत केले. नि हाव म्हणत नमस्कार चमत्कार वगैरे होऊन आम्ही गप्पा मारू लागलो. खरे तर त्यांना इंग्रजी अजिबात येत नाही, पण दुभाषाचे काम करायला चिंग वन होती आणि त्याही पलिकडे सांगायचे तर दोन माणसांना मनापासून बोलायची इच्छा असेल तर भाषेचा अडसर येत नाही. लवकरचे ते माझे शाग शेंग काका आणि वु झन छीन काकू झाले.

j1lr

मला चिंग वनने सांगितले की छीन या शब्दाचा एक अर्थ पियानो असा होतो. अरे वा! चिंग वन म्हणजे वाऱ्याच्या सळसळीचा नाजुक आवाज. एकंदरीत घराणे सुरेल असावे. मी इंदू म्हणजे नक्की कुठला? गाव कुठले मग मुंबई भारतात कुठल्या दिशेला वगैरे चौकशा करता करता कौटुंबिक गप्पांना सुरुवात केली. शाग शेंग काकांनी आपल्या नातवाची म्हणजे चिंग वनच्या मोठ्या बहिणीच्या मुलाची - युआनची छबी आणून दाखवली. आजी आजोबा आपल्या नातवाचे कौतुक करण्यात रंगून गेले. एव्हाना सहा वाजून गेले होते. काकू तुम्ही बसा असे म्हणत स्वयंपाकघराच्या दिशेने निघाल्या. पाठोपाठ त्यांच्या मदतीला काकाही गेले. ते साध पण प्रसन्न घर आणि मनमोकळी माणसे मला खुप आवडली. बाहेर एकुण तयारी पाहताच मी चिंग वनला विचारले की बेत साधाच आहे ना, उगाच जास्त करत राहू नका. मी काय खाणार आहे मोठा? पुन्हा एकदा सुगंधी फुलांच्या चहाची फेरी झाली. मग आम्ही सध्याची व्यावसायिक परिस्थिती, बाजार, घटलेली निर्यात असे काही बोलत बसलो.

आतून हाक आली, चला गप्पा पानावर होऊद्यात, जेवण गरम आने तोवर पानावर बसा. टेबलावर चीनी मातीचे कुंडे, बशा मांडल्या होत्या. पटापट एकेक पदार्थ बाहेर आले. शाग शेंग काका चुरचुरणारा तवा घेऊन बाहेर येताच चिंग वनने तव्याकडे बोट दाखवित सांगितले की हेच ते च्याव ज्झ! j2lr च्याव ज्झ म्हणजे मोदकासारख्य पाकळ्यांची कड अस्ललेया उकडीच्या करंज्या. माझ्यासाठी आज संपुर्ण फंग कुटुंबाचा शाकाहार होता. त्यामुळे सारणात कोबी व अन्य भाज्याच घातल्या होत्या, एरवी यात गोमांस वा डुकराचे मांस वापरतात. थोडक्यात हे डंपलिंग. च्याव ज्झ दोन प्रकारचे. उकाडलेले आणि खमंग परतलेले. आज दोन्ही प्रकार होते. चीनी जेवण म्हणजे निदान दक्षिण पूर्व चीनमध्ये जेवणात फारसे तिखट वा जळजळीत मसाले वापरत नाहीत. सर्व पदार्थ सौम्य. माशांच्या पदार्थातही रस्सा अगदी पाण्यासारखा पातळ आणि बराचसा पारदर्शक. मला जरा चमचमीत लागते हे चिंग वनला माहित होते. बाहेर जेवताना ती माझ्यासाठी लाज्या म्हणजे लाल मिरचीचा ताजा ओला ठेचा मागवायचे. ते तिने छीन काकू सांगितले असावे, कारण काकुंनी च्याव ज्झ बरोबर एका वाडग्यात मस्त लाल मिरच्यांचा विनेगार व मसाला घालून केलेला ओला ठेचा आणून ठेवला, त्यात सोयाबिनचे कोवळे शिजवलेले दाणेही घात्ले होते. मला वऱ्हाडी ठेच्याची आठवण झाली. याला म्हणतात तौ पन च्यांग. या तौ पन च्यांगने जेवणाला चांगलीच झणझणीत चव आणली. बरोबरीला तु दो (परतेले उकडलेल्या बटाट्याचे काप), शि लान व्हा (किंचित तेल व हलकासा मसाला घालून मध्यम शिजवलेली ब्रॉकोली), हह लान दौ (वाफवून तेल व मिठ लावलेल्या पापडीच्या शेंगा), छीन त्साई चाव-श्यांग कान (सेलेरी व के प्रकारच्या तोफुची परतेली भाजी) व शेवटी मी फान (गचका उकडलेला भात. बहुधा

काडीने खायला सोयीचा म्हणून भात गचका करत असावेत j3lr j4lr j5lr j6lr j7lr बेत तर मस्त जमला होता. मी आपला माझ्या मानाने खात होतो. पण मी काटा चमचा न मागता काड्यांनी खात होतो हे काका काकुंना एकदम आवडलेले दिसले. ते माझ्या जुजबी चीनी भाषेचे उगाच कौतुक करत होते, उच्चार चांगले जमतात म्हणाले. मला कुठे काय फार येतात, आपले किरकोळ काही शब्द, काही वाक्ये येतात इतकेच. आपले जेवण पाहुण्याला आवडेल का अशी शंका मनात असताना पाहुण्याने बशी साफ केली याचा त्यांना आनंद झाला. छीन काकुंचा आग्रह झाला की मी उजव्या हाताने काड्या उंचावत व डावा हात पोटावर फिरवत पाव ला असे म्हणायचो. पाव ला म्हणजे ’अगदी पोट तुडुंब भरले’ म्हणजे आपण भरून पावलो म्हणतो तसे करून पाव ला आणि मी खाऊन पाव ला.

j8alr

जेवण झाले. आता जेवण झाल्यावर जवळच्या उद्यानात जरा शतपावली करू असे म्हणत सगळेच निघाले. मात्र निघण्यापूर्वी त्यांनी मला स्वहस्ते बनविलेले शुभेच्छापत्त दिले आणि मी अवाक झालो. j9oklr इतक्या मोठ्या शुभेच्छा मी यापूर्वी फक्त राजकारण्यांच्या शहर विद्रुप करणाऱ्या फलकांवरच पाहिल्या होत्या. त्यांचे आभार मानून त्यांच्या पाया पडत मीही चिंग वन साठी नेलेले चिमुकले कानातले दिले. हा कार्यक्रम अगदी अचानक ठरल्याने मला काका काकुंसाठी काही नेले नाही याची रुखरुख लागली. निघताना काका काकुंनी आग्रहाने संगितले की यापुढे ते असताना जर मी फोशानला आलो तर जेवायला घरीच यायचे.

च्याव ज्झ हे एक निमित्त झालं, त्या निमित्ताने मला परक्या देशात घर मिळाल.