जातीचा नामोल्लेख हा बागुलबुवा का?

कोण ही 'टवळी'? नावाचा प्रीति छत्रे यांचा लेख गद्य विभागात प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखात एक वाक्य आहे.

"त्यांत प्रामुख्यानं तथाकथित उच्चवर्णीय सुशिक्षित/उच्चशिक्षित लोकांचा समावेश होता."

हे वाक्य बघा. यातल्या तथाकथितनं उच्चवर्णीयची धार खरंच कमी होते का? की जरा अधिकच परजली जाते?

आडवळणानं जाऊन उच्चवर्णीय म्हणण्यापेक्षा सरळ ब्राह्मण का म्हणू नये? ब्राह्मण हे एका जातीचं नाव आहे. त्याच्या किंवा कोणत्याही जातीच्या नावाच्या उच्चाराने जातीय उतरंडीचा प्रत्यक्ष उल्लेख होत नाही. मग ते उच्चारण्याचा बागुलबुवा टाकून का देऊ नये?

ब्राह्मण असा उल्लेख करणं हे जितकं जातीयवादी वाटतं त्यापेक्षा तथाकथित उच्च्वर्णीय, खालच्या मानल्या गेलेल्या जातीचा, असे उल्लेख जास्त जातीयवादी आहेत. सुप्त पातळीवर आपल्या मनात शिल्लक असलेल्या सामाजिक उतरंडीचे ते प्रतीक आहेत असं मला वाटतं. वरच्या जातीतला, खालच्या जातीतला असं म्हणवण्यापेक्षा अमक्या जातीचा असा स्पष्ट नावानिशी उल्लेख कोणत्याही जातीच्या माणसाला अधिक अभिमानास्पद/स्वीकारार्ह असेल.

मला प्रीतिवर जातीयवादाचा आरोप करायचा नाहिये, उलट आपल्या सर्वांसाठीच एक सूचना आहे की जातीच्या नावाचा बागुलबुवा करून नको ठेवूयात नको. जातीचा नामोल्लेख न करण्याचा निरुपयोगी शिरस्ता टाकून देऊया.

बघा पटलं तर.....