हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता

हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी हा रस्ता धरला नव्हता

मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता

एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता

एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

एवढ्यात काही विशेष लिहिले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता