फरगिव्हींग बट नेव्हर फरगेटस !

तू निघून गेलीस! आणि मी सुद्धा.......

त्या शेवटच्या भेटीनंतर.... भेट कसली? कदाचित तो नियतीचा डाव असावा. पण तो डावही फार भयंकर होता. क्षणार्धात सगळे सत्य उघडे पाडणारा... सत्य? तुला आजही त्याबद्दल शंका असावी!

तू निघून गेलीस एकदाही मागे न पाहता. मी कितीतरी वेळ तिथे स्तंभित होउन उभा होतो. पाच मिनीटांनी तुला फोनही केला. बोललो, "लग्नानंतर मला हे सगळं चालणार नाही! " हे सगळं होउनही मला तुझ्याशी लग्न करायचे होते? नाही, मी असं बोललोच नाही! माझ्यातला तुझ्यावर नितांत प्रेम करणारा बोलला होता.. किती मुर्ख होतो ना मी? तु मझ्या मुर्खपणावर हसली असशील नाही??? आणि सारं कसं विचित्र झालं नाही?? म्हणजे असं नव्हतं की मला हे सगळं ठावूक नव्हतं, पण माझ्यातला तुझ्यावर प्रेम करणारा 'तो' माझे सर्व संशय निष्फळ ठरवत होता. किती प्रेम होतं माझं तुझ्यावर, तु कल्पनाही करू शकणार नाहिस. पण तुझं कुणावर प्रेम होतं? माझ्यावर? त्याच्यावर कि फक्त तुझ्यावर?? स्वतःवर...... आत्मकेंद्री????

त्यानंतर मी या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या फंदात नाही पडलो कारण मला माहीत होतं सगळी उत्तरे आपोआप सापडतील. आणि सापडलीसुद्धा! आपण परत एकमेकांना कधीही संपर्क केला नाही. आपण एक्मेकांपासून दूर गेलो होतो परत कधीही न भेटण्यासाठी!!! गेली ३-४ वर्षे मी जगतोय. फक्त जगतोय हं! माझ्यातला 'तो' तुझी सारखी आठवण काढतो आणि विफल होतो. पुन्हा ती जिवघेणी संध्याकाळ आणि कभिन्न काळोख! तु माझ्या मनातून जायला तयारच नाहीस. आठवणी आपल्या सहवासाच्या, प्रेमाच्या, एकमेकांत हरवून गेलेल्या नदी आणि सागरासारख्या.....

तुला यायची का गं माझी आठवण?? मला कधी ठसका किंवा उचकीही नाही लागली!!!!

आपण तेव्हा एकमेकांना पत्रे लिहायचो.. खूप सारी पत्रे! आपल्या सुखदुखा:ची, भावनांची, रुसव्या-फुग्व्यांची, प्रेमाची आणि आपल्या प्रत्येक भेटींची... किती मरायचो आपण ती पत्रे वाचायला. आता मी ती पत्रे नाही वाचत. हो, जपून मात्र ठेवलीत. कधीतरी ती काढतो आणि त्यांवरून हात फिरवतो.. तुझा सुगंध सर्वांगात भिनत जातो. तु जवळ असल्याचा भास होतो.. एखाद्याने त्या पत्रांना आग लावली असती.. पण मी ती जपून ठेवलीत.. ती पत्रे नेहमी माझ्या बॅग्मध्ये असायची. २६ जुलैच्या पावसात ती चिंब भिजून गेली होती. मी रात्री २. ३० वाजता घरी पोहचलो होतो. चालून दमल्यामुळे गाढ झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी दुपारी उठलो. पाहतो तर ती सगळी पत्रे जमिनीवर व्यवस्थित वाळत घातली होती. माझी आई ती पत्रं वाळत घालत होती. माझी अडाणी आई! तिला एक अक्षरही कळत नाही.. पण माझं तुझ्यावर असलेलं प्रेम तिला कळत होतं. मला गहीवरून आलं तिने ती पत्रं नीट वाळवली आणि घडी करून माझ्याकडे परत केली.......

ते सगळं आठवलं की आजही मेंदुला चिरा पडतात. पण आता सारं काही बदलून गेलयं. असं नाही की तुझी कधी आठवण नाही आली. तुला विसरणं शक्यच नव्हतं! आणि नाहीए! जखम खोल झाली की तिचा व्रण राहतोच की. प्रेमाचे सारे नवे रंग तूच मला दिले होते. जगण्याचे सारे तरंग मी तुझ्याकडूनच घेतलेले. ते सारे परत करन आता शक्य नाही. आता तर हे सारे आयुष्याचा एक अविभाज्य भाग होउन बसलयं. दूर किनारऱ्यावर लाटांच्या आवाजात मला तुझी हाक ऐकू येते. वारा विचल होतो. अंग शहारून जाते. मन भिजून जाते. माझे केस निर्वासितांसारखे वाऱ्याने उडत राहतात. वाऱ्याबरोबर मी तुला शोधत फिरतो. तु सापडली नाहीस की मग किनाऱ्यावर अंग टेकतो. संध्याकाळ झालेली असते. सुर्यही तुला शोधण्याच्या निष्फळ प्रयत्नांत पश्चिमेकडे उंदडत असतो. हळूहळू काळोख होतो. तारका आकाशात चमकू लागतात! मी त्या तारकांना तुझा आकार देतो तुझ्या नावाचे नवीन नक्षत्र!! आणि ते ही सर्वस्वी माझे फक्त माझे! मग सुरू होतात नेहमीच्या गप्पा! तुझं हसणं, माझ्याकडे पाहत राहणं आणि न राहवून माझ्या मिठीत येणं मी सगळं अनुभवतो! तुला असे भास होतात का?? मी विक्षिप्त होतो, थोडा बावरतो आणि पुन्हा घराच्या दिशेने चालायला लागतो. तू सोबत असतेसच! मनात आणि तनातही!!!!

अशा तुझ्या आठणी आजही मला सतावतात, पण त्या सर्व मला हव्या असतात. कारण मी स्वार्थी आहे?? माझं शरीर जळून जातं, श्वास फुलून जातात, सर्वांगात तु भिनत जातेस काटा खसकनं पायात रूतावा तशी! तेव्हा मला तू हवी असतेस. माझ्या मिठीत, सर्वांगात समावून जाण्यासाठी. तुला फक्त डोळ्यांनीच प्राशून घ्यावं. तुझ्या अंगावरून माझे हात फिरावेत आणि त्या स्पर्शाने तू डोळे बंद करून घ्यावेस. तुझे ओठ माझ्या ओठांनी कैद केलेले असतात. तुला मला सोडवत नाही. तु माझ्यात पुर्णपणे समावून जातेस आणि आपण निघून जातो, सर्वांपासून दूर, आकाशाच्याही पुढे; आपल्या विश्वात परत न येण्यासाठी............

फरगिव्हींग बट नेव्हर फरगेटस!!