फायदा?

हो न हो, थांबूच, पाहू थांबण्याचा फायदा
थांबणे हाही असावा चालण्याचा फायदा

मालकाचा त्रास सोसावा कसा हे जाणले
हा तुझ्या हृदयात आम्ही राहण्याचा फायदा

ताठ केव्हा व्हायचे केव्हा पुरे वाकायचे
जो शिके त्यालाच पाठीच्या कण्याचा फायदा

घेत गेलो मी तुझ्या त्या बोलण्याचा फायदा
पण तुला झाला कुठे मी ऐकण्याचा फायदा?

ताट तू ढकलायचे नव्हतेस त्यावेळी तसे
काय आता दात मित्रा कोरण्याचा फायदा?

रोज कोणी वेगळा माणूस छद्मी हासतो
हाच आहे आरश्याला पाहण्याचा फायदा

काय आहे मी मला कळलेच नसते हे कधी
केवढा झालाय माशी शिंकण्याचा फायदा

जाग येते हाच आहे झोपण्याचा फायदा
झोप येते हाच आहे जागण्याचा फायदा

फार होतो त्रास मोठे व्हायचे म्हणजे इथे
घेत जाऊ फक्त मोठे भासण्याचा फायदा

घेतला नाहीच आपण भांडण्याचा फ़ायदा
काय आता भांडणे ती काढण्याचा फायदा?

मी तुझी आहे तुझी आहे तुझी आहे तुझी
लाटला आहेस थापा मारण्याचा फायदा

वाटते, झालाच नाही बोलण्याचा फायदा
बोलता आले मला हा वाटण्याचा फायदा