देशद्रोही

"अर्चना, डबा तयार झाला की नाही? ", बूट घालून होताक्षणीच अनिलने
स्वयंपाकघराच्या दिशेने आवाज दिला.
"आले हो", आतून आवाज आला आणि पाठोपाठ अर्चना एका हातात डबा आणि एका हातात पाण्याची बाटली घेउन बाहेर आली. नेहमीच्या तत्परतेनं तिने
बॅगमध्ये सगळं भरलं आणि बॅग त्याच्या समोर धरली. इतकावेळ तिच्या मनमोहक
हालचाली पाहण्यात मग्न झालेल्या त्याला भानावर यायला एक-दोन क्षण लागले.
ती जरी फार शिकलेली नसली तरी दिसायला लाखात नाही तरी हजारात एक नक्कीच
होती. तिला पाहताक्षणीच त्याने पसंत केली होती आणि ती त्याची बायको झाली
तेव्हा त्याचा स्वतः बद्दलचा अभिमान दुणावला होता. तिला त्याने काहीही कमी
पडू दिलं नव्हतं. घरात मायक्रोवेव्ह पासून ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन पर्यंत
सर्व वस्तू तिच्या दिमतीला हजर होत्या.
"शशांक उठला? ", त्याने विचारलं.
 "नाही. उठवते आता. तसा वेळ आहे अजून बराच".
"बबडूला नवीन शूज घेउ या
रविवारी. त्याला आवडलेले बोन्साय मधले.", तो म्हणाला.
"हं. पुढच्या आठवड्यात पॅरेंटस मीट आहे त्याच्या स्कूल मध्ये. लक्षात आहे ना?
".
"अं हो. रजेचं सांगून ठेवलंय मी ऑफिसात".
 एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणाबद्दल अनिल फार जागरुक होता.
मुलाला त्या भागातल्या सर्वोत्तम (आणि अर्थातच महागड्या)
शाळेत तर त्याने घातलंच होतं,
शिवाय शाळेतल्या सर्व उपक्रमाना तो जातीने हजेरी लावत असे. शशांक मोठा
होउन अमेरिकेला गेल्याची स्वप्नं त्याला आतापासूनच पडू लागली होती.
"मी काल
बोलले ते लक्षात आहे ना? लवकरच बुकिंग करावं लागेल. दिवाळी दोन महिन्यावर आलीय".
"काय? अं हो हो.. बँकॉकचं ना? आहे लक्षात",   तो म्हणाला आणि मग निघालाच.
स्टेशनकडे चालत असताना त्याचं विचारचक्र चालू झालं.मे महिन्यात
ती खालच्या मजल्यावरची सुब्रमण्यम फॅमिली सिंगापूरला जाउन आल्यापासून
अर्चनाचं हे बँकॉकचं टुमणं चालू झालं होतं.जायला ३०-३५ हजार कमीतकमी
जाणार. तसं काही अवघड नाही पण गफूर आला असता म्हणजे वरच्यावर झालं असतं.
पण महिना झाला गफूर गायब आहे. आज त्याला परत फोन करतोच असा त्याने पुन्हा
एकवार निश्चय केला आणि मग झपाझप चालू लागला.                    
ऑफिसच्या
बाहेर जमा झालेल्या गर्दीकडे त्रासिक नजरेने बघत तो स्वतःच्या खोलीत गेला.
बॅग टेबलवर ठेवून सही साठी आलेल्या अर्जांच्या ढीगाकडे दोन मिनिटे नुसताच
बघत राहिला. शिंदेने येउन पंखा लावल्यावर तो भानावर आला. शिंदेला चहा
आणायला सांगून त्याने खुर्चीत बसकण मारली. दोन-तीन वेळा त्याने गफूरच्या
मोबाईलवर फोन करायचा प्रयत्न केला पण दर वेळी एंगेज्ड टोन ऐकून वैतागून
प्रयत्न सोडून दिला. मग ऑफिसचा दिवस नेहमीच्या संथपणे सुरू झाला. अधूनमधून
अर्जांवर सह्या करत, वरून आलेले
आदेश खालच्या लोकांच्या अंगावर टाकत, मध्येच मित्राना वगैरे फोन करत त्याने जेवणापर्यंतचा वेळ काढला. जेवण झाल्यावर खुर्चीतच मान
मागे टाकून अर्धातास डुलकी काढली असेल नसेल तोच शिंदेने कँटीनमध्ये गफूर येउन बसल्याची वर्दी आणली. "क्या बात है! "
तो खुशीत येउन स्वतःशीच म्हणाला आणि उत्साहाने कँटीनच्या दिशेने चालू
लागला. अपेक्षेप्रमाणे गफूर तिथे ३-४ माणसाना घेउन त्याचीच वाट पाहत होता.

"सलाम वाघमारे साब", त्याला पाहताच गफूर हसत हसत म्हणाला.
"सलाम गफूरभाई!
कहाँ हो आजकल भाई? काफी दिन दिखाई नही दिये? " अनिलने विचारले.
"अरे साब,
गाँव गया था. कल ही लौटा सुबह. आज आपके दीदार के लिए चला आया"."ठीक ठीक.
बोलो क्या खातिरदारी करू? ".
" खातिरदारी तो हम करेंगे आपकी
साब. अपना हमेशा का काम.
ये कुछ हमारे गाँव के लोग है, हमारे साथ ही आये है. टॅक्सी चलाना चाहते है अपने शहर में.
इनपे अपनी रहम की मोहर लगा दिजीये. इनको राशनकार्ड मिलजाये तो टॅक्सी
लायसेन्स के लिए अर्जी करेंगे बेचारे.", गफूर मिठ्ठास वाणीने हसत हसत
म्हणाला.
"हं", अनिल त्या
लोकांकडे वळून म्हणाला, "अपना नाम बोलो."
"रामशरण शर्मा".
"इस्माईल
शेख".
"हसन अली".
"ऑसिफ ऑली". अनिलने चमकून गफूरकडे पाहिले. त्याने नजर
चुकवली.
"असिफ भाई तुम्हारे गाँव के नही लगते...
" अनिल हसत हसत म्हणाला.
"सॉरी साब. हम बताना भूल गए की असिफ बंगाल से आया
है", गफूर सारवासारवीच्या सुरात म्हणाला.
"बंगाल से या बांग्लादेश से? ",
अनिल ने रोखून पाहत पण मिस्कील आवाजात विचारलं. गफूर काहीच बोलला
नाही.
"ठीक है. असिफ के लिए पच्चीस लूंगा. " अनिल
म्हणाला.
काहीही विरोध न दर्शवता गफूरने मोबाईल उचलला. नंबर लावून "वाघमारे साब को आज शाम को चालीस" एवढंच बोलून ठेवून दिला.
अनिलने खुशीत येउन त्याच्या पाठीवर थाप मारली आणि कँटीनच्या पोऱ्याला चहा
आणायला ओरडून सांगितले. २००७ साल त्याच्यासाठी
 फारच चांगले ठरले होते आणि आता तर दुधात साखर पडली होती. त्या दिवशी घरी जाईपर्यंत तो बँकॉकच्यासुखस्वप्नातच
मग्न होता. *************************************
एक
वर्षानंतर.................
*************************************
नुकत्याच
आणलेल्या ४२ इंची टी. व्ही. समोर अनिल, अर्चना, शशांक आणि अर्चनाचा भाऊ
तुषार खिळून बसले होते. वृत्तवाहिन्यांवर त्या रात्री शहरात झालेल्या
भयंकर दहशतवादी हल्ल्याचे तात्काळ प्रक्षेपण चालू होते. वृत्तनिवेदक
अधूनमधून तावातावाने गुप्तचर संस्थांचे अपयश, राजकारण्यांची बेपर्वाई,
पोलेसांकडच्या शस्त्रास्त्रांची कालबाह्यता इत्यादी गोष्टींवर टिप्प्णी
करत होते. ती ऐकून अनिल व तुषारला त्वेष चढत होता.

"एकेका राजकारण्याला फासावर लटकवला पाहिजे", तुषार म्हणाला.
"नाही तर काय.
सगळ्या देशाची वाट लावली आहे या नेत्यानी", अनिलने पुस्ती जोडली.
 टी.
व्ही. वर बातम्यांचा भडिमार चालूच होता. अतिरेकी कसे आले, कुठून कोठे
गेले, कसा गोळीबार केला, किती निष्पाप लोक कसे क्रूरपणे मारले इत्यादी
वर्णनाची पारायणं तर चालू होतीच शिवाय मध्येमध्ये तथाकथित जाणकार मंडळी
येउन अतिरेक्यांनी प्लॅन कसा केला असावा, आधी या शहरात येऊन त्यानी या
शहराचा अभ्यास केला असणार वगैरे अंदाज वर्तवत होते. इतक्यात एक 'ब्रेकिंग
न्यूज' आली आणि सगळेच सावरून बसले.
"अतिरेक्यांपैकी काही जण एक
महिन्यापुर्वी शहरात येउन सगळा अभ्यास करून गेल्याचा पुरावा पोलिसाना
मिळाला आहे", वृत्तनिवेदक सांगत होता, " इतकेच नव्हे तर कोळीवाड्यातील एका
मुलाने स्वतः पुढे येउन दिलेल्या माहिती वरून पोलिस
एका टॅक्सीड्रायव्हरच्या शोधात आहेत. त्याला एक महिन्यापुर्वी या मुलाने
टॅक्सीतून २ जणाना धक्क्याच्या जवळ घेउन जाताना पाहिले असा या मुलाचा दावा
आहे. टॅक्सीच्या क्रमांकावरून पोलिसानी टॅक्सी जप्त केली असली तरी
टॅक्सीड्रायव्हर फरारी आहे. त्याचे नाव असिफ अली असे असून तो
बांग्लादेशाचा नागरिक असल्याचा पोलिसांचा संशय आहे.पोलिसानी त्याचे
छायाचित्र प्रसारित केले आहे. कोणालाही या व्यक्तीबद्दल काही माहिती
मिळाल्यास कृपया पोलिसांशी संपर्क साधावा. " आणि मग टी. व्ही. वर आसिफचा
फोटो दिसू लागला. बातमी ऐकून आणि फोटो पाहून अनिलच्या काळजाचा ठोकाच
चुकला. घशाला कोरड पडली. त्याला फार अस्वस्थ वाटू लागले. तुषार मात्र
रागाने पेटून उठला होता."या राजकारण्यांची तर.... ", तुषार म्हणत होता,
"हरामखोर लेकाचे मतांसाठी या ****ना खुशाल घुसखोरी करू देतात आणि मग तेच लोक आपल्या जीवावर उठतात. रांगेत उभे करून गोळ्या घातल्या पाहिजेत या देशद्रोही नेत्याना ".
त्याच्या या म्हणण्याला अनुमोदन देण्याची शक्ती अनिलमध्ये नव्हती.