अंमळ

तुझ्या सयींची रोरांवत ये अशी वावटळ
अलिप्ततेने उभे राहणे अशक्य केवळ

तुला पाहिले, कथकामधल्या मात्रा हुकल्या
तुला न बघणे, लक्ष लागणे, कठीण अंमळ...

निरोप दे ना हसून तूही खोटाखोटा
कथा निराळी जरी सांगते द्रवले काजळ

गलबत इवले निळसर करडे क्षितिजावरती
माग ठेवता माझी येथे किती धावपळ

क्षणाक्षणाला पडतो आहे चरा मनावर
कधी थांबते थांबवल्याने सांग पानगळ?

--अदिती
( २५ फेब्रु. २००९ ,
माघ अमावास्या, शके १९३०)