प्रामाणिकपणा व संस्कार

२-३ देशांमध्ये जाउन आल्यावर व अनेक देशांच्या लोकांशी जवळून संबंध आल्यानंतर माझं असं मत बनलंय की भारतीय लोकांमध्ये प्रामाणिकपणा थोडा कमीच आहे. कित्येक लोक प्रामाणिकपणाने वागणे म्हणजे अव्यवहारीपणा (खरे तर मूर्खपणा) आहे असे सर्रास समजतात तर कित्येक लोक थोडी आर्थिक झळ बसणार असेल तर सोयीस्करपणे प्रामाणिकपणा विसरून जातात. याला मुख्यत्वाने आपल्या समाजात लहानपणापासून जे संस्कार होतात ते कारणीभूत आहेत असं वाटतं. समाजमान्य अप्रामाणिकपणाची काही उदाहरणे अशीः

  1. कर चुकवणे. मोठे व्यवहार करताना चेक ऐवजी रोखीने व्यवहार करून बरेच लोक कर चुकवतात.
  2. काम शिताफीने टाळणे. पैसे घेउन कसेतरी काम उरकणे. नोकरीतही अळंटळं करणे.
  3. दिलेली वेळ न पाळणे.
  4. खोटी कारणे सांगून घरी आलेल्याना कटवणे.
  5. लहान मुलांची वये चोरून तिकीटाचे वगैरे पैसे वाचवणे.

असं मोठी माणसं वागत असताना लहान मुले ते पाहत असतात आणि मग त्याना त्यात काही चूक आहे असं वाटतच नाही. त्यामुळे अप्रामाणिकपणा पिढी दर पिढी वाढतच जातो.  नुसतं रामरक्षा, शुभंकरोती किंवा मनाचे श्लोक म्हणून घेतल्याने किंवा गर्भसंस्कार केल्याने मुले सुसंस्कृत होतात का? मुले सर्व अनुकरणातून शिकतात, त्यामुळे नुसतं खरं बोलावे, अन्याया विरूद्ध लढावे वगैरे तोंडी उपदेश करून काहीच होणार नाही असं वाटतं.

हे सगळं पाहता आणि सध्या घरोघरी होणारे मुलांचे अतिलाड पाहता पुढच्या पिढ्या आणखी अप्रामाणिक आणि आत्मकेंद्रीच निपजणार या विचाराने कधीकधी नैराश्य येते. मुलाना खरोखरीच नीट वाढवणारे आहेत पण ते फार थोडे आणि त्याना नेहमीच इतरांच्या अप्रामाणिकपणाचा त्रास होत राहणार.

यावर उपाय काय? काही देशांत लष्करी प्रशिक्षण अनिवार्य आहे. तसं आपल्याकडे होणार नाही. मला तर वाटते अशा परिस्थितीत कोणीही सुजाण माणूस मुलाना जन्म देणार नाही किंवा किमान त्याना अशा समाजात वाढवणार नाही.

आपले काय मत आहे?