विरहाचे सपाट वर्णन...

बरी आहेस तू हल्ली असे मी ऐकले आहे
बरी तू आजही नाहीस हे ऐकायचे आहे

मला सोडून जाताना किती होतीस रडलेली
तुझ्या या वर्तमानाला मला कळवायचे आहे

जिथे आहेस तेथे एकदा येईनसुद्धा मी
परंतु 'त्या' तुला कोठे मला भेटायचे आहे?

कधी आलीस येथे, 'येत आहे' हे नको कळवू
'इथे नाहीस तू' हे सत्य मी पचवायचे आहे

तुझी ती वाट, माझी ही,  अता विसरायचे सारे
तरी हे आठवू की कायसे विसरायचे आहे?