... कुठेतरी आहेस!

...................................
... कुठेतरी आहेस!
...................................

कुठेच तू नाहीस;   परंतु कुठेतरी आहेस!
असेल खोटे साफ; तरीही खरोखरी आहेस!!

जिवातही नाहीस जिवा तू, कुडीहुनीही दूर...
असा कधीपासून अरे तू अधांतरी आहेस?

उगाच बाळगलास अबोला तुझ्यासवे का तूच?
उगाच का नाराज असा तू स्वतःवरी आहेस?

तुला तरी माहीत कुठे तू उद्या कसा असशील...
तसा कुठे तू आज मना, कालच्या परी आहेस?

जमे तुझ्यावाचून कुठे अन् रमे तुझ्यावाचून?
तशी बरी नाहीस; तरीही तशी बरी आहेस!!

कुणामुळे अद्याप कळेना तगून माझा जीव...
बनून माझा प्राण जणू तूच अंतरी आहेस!   

निघूनही जाईल रिकाम्या घरात माझा काळ...
तरी असे वाटेल मला रोज, तू घरी आहेस!

- प्रदीप कुलकर्णी

...................................
रचनाकाल ः ४ मार्च २००९

...................................