आजकालची मुलं

मी माझ्या भाचीला कावळ्याची गोष्ट सांगत होतो. आश्चर्य म्हणजे ती शांतपणे ऐकत होती. (तिच्यामते मी एक रागीट जिराफ आहे  )

कावळा तहानलेला असतो, रांजणात पाणी दिसते, तो दगडं टाकतो, पाणी वर येते, कावळा पाणी पितो.

शेवटी मी तिला म्हणालो, आहे की नाही कावळा हुशार ? त्यावर ती म्हणाली, "हॅट, तो मुर्खच होता. "

मला आश्चर्य वाटलं. मी तिला विचारलं, "मुर्ख कसा ? "

ती म्हणाली, " सरळ स्ट्रॉ घेतला असता आणि पाणी पिले असते तर हुशार झाला असता. "

*****************************************************************

दुसरा प्रसंग. इतिहास, वर्ग ३ रा (बहुदा). मी पाठांतर घेत होतो. बहिणीकडे असलेल्या शिकवणीच्या मुली.

मी : "सांग बरं शिवाजी महाराजांचा जन्म केंव्हा झाला ?"

ती :- "मागच्या वर्षी" 

मी :- "मागच्या वर्षी ? "

ती :- "हो, शिवाजी महाराजांचा जन्म मागच्या वर्षीच्या पुस्तकात होता, तु या वर्षीचे प्रश्न विचार"

*****************************************************************

बरेचदा असं जाणवतं की आपण लहान असताना (म्हणजे आता मी म्हातारा झालो नाही बरं का  ) धडेच्या धडे पाठ असायचे, (किमान मराठी आणि इतिहासतरी). अजुनही आठवतात. राम गणेश गडकरींचा "विसरभोळा गोकुळ" "सोनाली" नावची सिंहिण, पु. लं. चा "गंपु", किंवा बाबल्या चितेवरून पळाला, वगैरे...

मात्र आजकालची मुलं वाचनाच्या बाबतीत मागे तर तर्काच्या (लॉजिक), तंत्र, संगणक याबाबतीत पुढे आहेत. "आजकालची मुलं फार हुशार झाली आहेत" असं बरेचदा ऐकण्यात येतं. आपणही आपल्या आईवडिलांच्या मानाने "हुशार" (? ) होतो का ?

त्यावेळी अवांतर वाचनालासुद्धा वेळ मिळायचा. (आम्हीतर रिकामटेकडेच होतो  ) आता अभ्यासालाच वेळ कमी पडतो का ?

तुम्हाला काय वाटतं ?