स्त्रीत्वदिनानिमित्ताने...

१.
इव्ह, "मी खूप विचारात पडलेय..."
दैवीशक्ती, "काय चाललंय तुझ्या मनात?"
इव्ह, "हे बघ, तू मला बनवलंस, ही सुंदर बाग बनवलीस, पशु-पक्षी बनवलेस, पण आजकाल मला जरा भीती वाटायला लागलीय."
दैवीशक्ती, "बोलत राहा..."
इव्ह, "बऱ्याच वेळा मला कंटाळा येतो- काही मजाच नाही आयुष्यात. आणि हे इकडे तिकडे फिरणारे जंगली श्वापदं, विषारी साप...मला खूप भीतीपण वाटते."
दैवीशक्ती (विचारात पडून), "बरं..."
"हे बघ इव्ह माझ्याकडे एक कल्पक विचार आहे. मी एक "पुरुष" बनविणार तुझ्यासाठी"
इव्ह, "पुरुष?" हे काय प्रकरण आहे?"
दैवीशक्ती, "पुरुष हा एक दोषपूर्ण प्राणी असेल. त्याला अनेक कमकुवती असतील व हलक्या सवयी असतील. तो खोटं बोलेल, फसवेल आणि मूर्खासारखा वागेल- खरं म्हणजे तो एक कायमची डोकेदुखी असेल. पण त्याला काही चांगल्या बाजूही आहेत. तो ताकदवान असेल, आडदांड असेल. तो तुझे रक्षणही करेल, तो शिकार करेल आणि हे तुला बरेच फायद्याचे असेल."
इव्ह, "हं..मला असे वाटतेय की ही "पुरुष" कल्पना राबवायला बरी आहे. पण मला सांग, मला आणखी काही माहिती करून घ्यायला हवी आहे का?"
दैवीशक्ती, "एव्हढेच..की, पुरुष एका अटीवर मी तयार करीन...जसे आपण बोललो की, त्याच्या उद्धटपणाचा विचार करता, ताळतंत्र सोडून वागण्याच्या सवयीनुसार व स्वकेंद्रित व्यक्तिमत्त्वाला धरून, पुरुषाला नेहमी असे वाटत राहील की, जगात सर्वप्रथम तोच आला. आणि तुला माहीतच आहे की, जगात इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत वाद घालण्यासाठी त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य ठरेल. आणि हे बघ ही गोष्ट आपल्या दोघांतच राहिली पाहिजे.. तुला तर माहितीच आहे बायका-बायकांमधील गोष्टी...
२.
एक लहान मुलगा आणि त्याचे वडील कारने जात असता त्यांना अपघात होतो व त्यात ते दोघे जबर जखमी होतात. यथावकाश त्यांच्यापर्यंत मदत पोहोचते व त्यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला आणले जाते. ते दोघेही तो पर्यंत बेशुद्ध झालेले असतात. हॉस्पिटल मध्ये ही अपघाताची बातमी आधीच पोहोचल्यामुळे डॉक्टर तयारच असतात व त्यांचा स्टाफ दारात स्ट्रेचर घेऊन वाट पाहत असतात. डॉक्टर आत ऑपरेशनची तयारी करत असतात.
रुग्णवाहिका हॉस्पिटल मध्ये पोहोचते पण तो लहान मुलगा आणि त्याचे वडील कोण आहेत हे कोणालाच माहीत नसते. त्यांच्या नातेवाईकांना कसे कळवावे ह्या विवंचनेत असतानाच, त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाते.
नर्स डॉक्टरांना माहिती देते की, पेशंट कोण आहेत हे अजून कळले नाही.
ह्यावर डॉक्टर म्हणतात, त्याची काही गरज नाही, तो माझा नवरा आणि मुलगा आहे.
ज्यांनी ज्यांनी दैवीशक्ती आणि डॉक्टरच्या जागी "पुरुष" पात्र मनात पाहिले, त्या मानसिक घडणीला मानसशास्त्रात "इम्प्लिसिट असोसिएशन" म्हणतात.
हे माझे वैयक्तिक मत आहे- जेव्हा स्त्रीला पुरुष (व पुरुषाला स्त्री) त्याच्या/तिच्या मनातल्या ह्या अशा "इम्प्लिसिट असोसिएशन" मध्ये न अडकवता "पाहिलं", तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष नात्यात प्रगती होईल.
कोणताही प्रतिसाद देण्याआधी हे पाहावे अशी नम्र विनंती:
मग भारताच्या झेंड्यावर टिचकी मारा, आणि मग "जेंडर" हा विषय निवडा.
[वरील दोन्ही प्रसंग मी भाषांतर केले आहेत. माझे त्यातील कष्ट म्हणजे भाषांतर करणे व डोक्यात असलेल्या सारांशाच्या आशयाला शोभतील अशा कथा शोधून काढणे. पहिली कथा कोणाची आहे हे कोणालाच माहीत नाही- ती इंटरनेट वर आहे. दुसरी कथा मी माल्कम ग्लडवेलच्या "ब्लिंक" मध्ये वाचली असावी पण काही केल्या मला ते पान आज सापडले नाही.]