इरसाल

काही काही लोकांच्या इरसालपणाचं मला फार आश्चर्य वाटतं. अतिशय शांतपणे आणि हजरजबाबीपणे ते असं काही बोलतात की समोरचा निरुत्तर होऊन जातो. उदाहरणार्थ माझ्या एका इरसाल मित्राचे काही किस्से पाहा.

१. स्थळः कपिला रेस्टॉरंट, ढोले पाटील रस्ता, पुणे.

आम्ही सगळे कार्यालयीन मित्र एकाच्या निरोपसमारंभानिमित्त दुपारच्या जेवणासाठी गेलेलो. तब्येतीत मागणी नोंदवून झाल्यावर हा माझा मित्र वाढप्याला म्हणाला," मित्रा, रोटी गव्हाच्या पीठाची हवी बरं का! मैद्याच्या नको देऊस". बरं म्हणून वाढपी गेला. थोड्यावेळाने जेवण आले तर सगळ्या रोट्या पांढऱ्या शुभ्र.

"अरे दोस्ता, तुला गव्हाच्या रोट्या सांगितल्या होत्या ना? ", मित्र.

"गव्हाच्याच रोट्या आहेत साहेब. ", वाढपी.

"मग कणिक मळताना त्यात ब्लीचिंग पावडर टाकली होती काय? "

"----".

२. स्थळः कार्यालय

माझ्या दुसऱ्या एका मित्राच्या गाडीची किल्ली हरवली होती म्हणून तो शोधत होता. पार्किंगमध्ये पडली असेल असे वाटून त्याने एका हरकाम्याला जाऊन बघायला सांगितले. तो पोऱ्या थोडा नाखूष दिसला.

"मधुकरसर को बोलो ना", तो पोऱ्या म्हणाला. मधुकर हा या सगळ्या पोरांचा साहेब असावा.

"मित्रा", माझा हा इरसाल मित्र त्याला थांबवून म्हणाला, " प्रि-कर्सर ऐकलंय, डेटाबेस कर्सर(cursor) ऐकलंय, हा 'मधु'कर्सर काय प्रकार आहे? ". त्या पोराला काहीच समजलं नाही पण आम्ही मात्र हसून हसून आडवे झालो.

३. स्थळ: चहाची टपरी

पुराणकाळात भारत प्रगत होता की नाही या वर लोकांची चर्चा चालू होती. काही लोक तावातावाने पुर्वी विमानं वगैरे होती असं छातीठोकपणे सांगत होते तर बाकीचे ते सगळं थोतांड आहे असं म्हणत होते. इरसाल मित्र बराच वेळ शांतपणे चहाचे घुटके घेत राहिला. बोलून बोलून बाकीचे जरा शांत झाल्यावर याने घसा साफ केला आणि म्हणाला,

"बाकी काही असेल किंवा नसेल पण त्या काळी इस्त्री होती एवढं मात्र नक्की. "

"कसं काय? ", थोतांडवाद्यांपैकी एकाने विचारलं.

"तू रामानंद सागरचं रामायण पाहिलं की नाही? त्यात तो अरूण गोविल सारखा म्हणत नाही का.. 'इस्त्री का कर्तव्य है के... '"

त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत एका-दोघानी फुर्रकन चहा उडवला आणि एक-दोन जणाना हसता हसता जोरदार ठसका लागला.

४. स्थळः इ-स्क्वेअर, पुणे.

सकाळी सकाळी तिकीट काढायला मी आणि माझा हा मित्र गेलो. एवढ्या सकाळी कोण उचलणार म्हणून दुचाकी रस्त्याच्या कडेलाच लावून तिकीट काढायला आत गेलो. तेवढ्यात दुर्दैवाने पोलिसांची गाडी आली आणि माझी दुचाकी उचलून ते निघाले. ते पाहून आम्ही पळत पळत गेलो आणि त्यांची गाडी थांबवली. हवालदारसाहेब खाली उतरले आणि माझ्या मित्राने घासाघीस चालू केली. हवालदार १०० रुपयांवर अडून बसला होता. मला तो काहीच प्रकार आवडला नाही. मी मित्राला म्हणालो की   पैसे द्यायची काही ही गरज नाही आपण पावती फाडू.

"पावती फाडायची तं दीडशे लागतीन. ", हवालदारसाहेब म्हणाले.

"जाऊ दे रे निऱ्या, " माझा मित्र म्हणाला, "कुठं एक पावती फाडायला ५० रुपये घालवतो? आमच्या घराच्या मागच्या गल्लीतच छापून घेतात हे मामा लोक असली पावती पुस्तकं. तिथं जाऊन ५ रुपयात आख्खं पुस्तक फाडता येईल तुला. काय मामा? ".

मामाने गपचूप १०० घेतले आणि गाडी देऊन गेला.