चुकीच्या मराठीचे नमुने

आज महराष्ट्रदिनी सकाळमध्ये ही बातमी वाचायला मिळाली. इथे मराठीतून चर्चा करणे सोपे जावे म्हणून येथे उतरवून ठेवली आहे.

मूळ बातमी : 'प्रसारमाध्यमांनी चुकीची मराठी स्वीकारू नये'
(सकाळ पुणे, ता. १)

"प्रसारमाध्यमांत वापरल्या जाणार्‍या मराठीची जबाबदारी त्या माध्यमांतील संबंधित अधिकार्‍यांबरोबरच श्रोते, प्रेक्षक आणि इतरांचीही आहे आणि त्यांनी चुकीची मराठी स्वीकारू नये," असे मत आज येथे याबाबत आयोजिलेल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले. ... .... मराठी अभ्यास परिषदेने आयोजिलेल्या या परिसंवादात माध्यमांशी संबंधित श्रीरंग गोडबोले, संज्योत आमोंडीकर व उज्ज्वला बर्वे यांनी भाग घेतला. प्र. ना. परांजपे अध्यक्षस्थानी होते. खुल्या चर्चेत डॉ. गं. ना. जोगळेकर, श्याम भुकरे, अनिल गोरे, डॉ. नीलिमा गुंडी आदींनी भाग घेतला.

"प्रसारमाध्यमांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर मराठीवर इंग्रजी आणि हिंदी भाषेचे संस्कारही होत आहेत. माध्यमांतील बातम्या, कार्यक्रम, जाहिराती यांवर त्याचा परिणाम होत आहे. अशा वेळी सर्वसामान्य श्रोत्यांनी माध्यमांमधील मराठी वापरातील दोष संबंधित अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून द्यावे आणि माध्यमांनीही त्याची दखल घ्यावी," असे मत बहुतेकांनी व्यक्त केले. त्यासाठी विविध उदाहरणेही या वेळी देण्यात आली.

श्री. गोडबोले म्हणाले, "दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखविताना त्यांचे निर्माते आधी प्रेक्षकवर्ग निश्चित करीत असतात. येत्या काळात 'माध्यम संगम' होणार आहे. कार्यक्रम संग्राहित करून पाहण्याचे तंत्रज्ञान त्यामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे मराठीबद्दल अधिक जागरुकता दाखविणे गरजेचे आहे."

श्री. परांजपे म्हणाले, "माध्यमांसाठी उमेदवारांची निवड करताना मराठी भाषेतील प्रावीण्य हा निकष असला पाहिजे. त्यामुळे माध्यमांतील मराठीचा दर्जा सुधारू शकेल."


आता एक प्रस्ताव.

पूर्वी अमृत मासिकात उपसंपादकाच्या डुलक्या, मुद्राराक्षसाचा विनोद आणि जाहिरातदाराचा विनोद अशी सदरे असत. त्यात मुद्रित प्रसारमाध्यमातल्या चुकीच्या मराठीतून उत्पन्न झालेले हास्योत्पादक नमुने सादर केलेले असत. सोबतीला त्या नमुन्यांवर आधारित (वसंत सरवट्यांनी काढलेली?) धमाल व्यंगचित्रे असत. आपल्याला असे नमुने पाठवायचे असल्यास कात्रणे पाठवावी लागत.

सध्या अमृत मासिक आहे का? असल्यास त्यात ही सदरे आहेत का?

आपणही असे हजारो चुकीच्या मराठीचे नमुने रोजच्यारोज प्रसार माध्यमांत पाहात असाल. ते येथे पाठवून त्यावर चर्चा करता येईल.

करा तर मग सुरुवात!