धुयमाती

थ्या रोजी धुयमाती झाली. या होयीले मी भल्लाच खुश होतो. मायी हे पयलीच होयी होती. मांगच्या साली लगीन ठरलं होतं. होयीच्या आठ दिस पयले "शालमुंदी" झालती. पण शालमुंदीमधं मामा (बायकोचा बाप) खडुस अन रागिट हाये हे सोतच्या डोळ्यानं पायलं व्हतं. अन माया एक साया पैलवान होता. म्हणुनशान मांगच्या साली सासरी जायची हिंमत झाली नव्हती. पन यावर्षी म्या चानस सोडला नायी. सासऱ्यान खुप फडफड केली पण म्या बी त्याले सिदंसिदं सांगितलं. मीनं म्हतलं,

"पैली होयी हाये, आमच्या घरी सुनेचं कवतिक केल्या जाते, तिले साडी चोळी द्याचे परंपरा हाये... " आता ही आमच्या घराची "कष्टम" आहे म्हनल्यावर बुडा काय बोलनार ?

मी बी बायकोले काही थांग लागू देल्ला नाय. तिले सांगितलं का आपण होयिले गावाले जानार हाय, मातर होयिच्याच दिवशी म्या तिले धुयमातीच्या दुसऱ्याच दिशी "इनिस्पेक्षन " हाये म्हनून घरी (तिच्या सासरी) जाता येनार नायी असं सांगितलं. तिले दुक कमी अन खुशी जास्त झाली. मले थे काही समजलं नायी. मी माह्याच तालात होतो.

होयीच्या दिशीच बाजारातून रंग घेउन आलो पण बायकोच्या लपून आलमारीवर ठेवून देल्ला. तिचा हात आलमारीवर पोचनार नाही हे मले चांगलच माहीत होतं. यावर्सी बायकोले मनसोक्त कलर लावाचा प्लॅन केला व्हता. म्हनुनशान ना सासरी गेलो ना गावी. नोकरीच्याच गावी रायलो. बस्स मी अन बायको, दोघच. मी सप्न रंगवत होतो, बायकोले कसंकसं रंगवाच, याचं.

होयीले सालाबादाप्रमानं "पुरनपोळी" केलती. दुपारी उशिरा जेवलो, म्हनून रात्रीबी उशिराच जेवाले बसलो. "पुरनपोळिवर तुप घेतलं तवा बायको म्हनली, " आवो, माह्यं चुकलच जरा"

मले समजेच नायी. पुरनपोळी केली, अजून काय पायजे? म्या मतलं, "काय झालं? "

"तुप संपलं, आता उद्या धुयमाती.  पुरनपोळीवर तुप वाढाले तुपच नायी राह्यलं"

"तू बी नं. भल्ल्या सडल्या गोष्टी सांगते बॉ. घेउन येइन उद्या पायटे. आता किल्च्या नको पाडु. जेवून घे अन झोप मुकाट्यानं".

रातच्याले मले मातर झोप लागत नव्हती. पायटे उठून बायकोले कलर लावाच सप्न उद्या पुर्ण होणार व्हतं.

सकाळी म्या लौकर उठाच ठरवलं होतं पन "पुरनपोळीतलं जायफळ" जास्त चढलं होतं. उठाले उशिर झाला. म्या इचार केला पैले तुप घेउन याव अन मंग बायकोले कलरनं धुवाव.

म्या तोंड खंगाळून, तुपाची भरणी घेतली अन बबन्याच्या दुकानाकडं निगालो. रस्त्यात चार दहा लोकं दिसले त्यायनं हासत हासत "रामराम" केला. आमचे गुर्जी दिसले. गुर्जीचा चेहरा हमेशा रागात राहे. पोट्टेच नायी तर त्यायचे बापही गुर्जीले भेत होते. पण आज सकायी सकायी गुर्जीन हासून म्हतलं,

"रामराम इजुभौ"

"रामराम गुर्जी" मीनं बी त्यायले रामराम केला. गुर्जीले रातच्याले कोणितरी "भांग" पाजली असन असं मले वाटलं, अन मले हासू आलं.

बबन्याच्या दुकानातून तुप घेउन बाहेर निगालो, तं राधाकाकू बाहेर दिसली. मले पायलं अन तिच्या हातातला फडा गयून पडला. अन मंग थे बुडी तोंडाले पदर लावून घरात गेली, मले कायी समजे नायी. घराजवळ येईतो मले लोकं मले पाहून हासून काउन रायले मले समजे नायी.

माह्या शेजारची सुजी मले पाहून दातकाडं काढाले लागली. तिच्या बापानं तिले चुप करावं, म्हनून शांतारामकडं पायलं तं थो, "इजुभौ ? " असं म्हनत हासाले लागला. मंग काय सगळा वट्टाळ जमा झाला अन माह्याकडं पाउन हासाले लागला. आता मले ध्येनात आलं का काईतरी गडबड हाये. म्या वसरीतला आरसा पायला अन दचकलोच. माह्या ताल "यक्कु"सारखा होता. मले समजेच नायी इतक्या पायटे माह्या हा मेकप कोनं केला.

मी बह्याडसारखा गावात अश्याच तालात फिरत होतो. एकदम मले समजलं का हे माह्या बायकोचं काम हाये. मी उठाच्या आधी मायं तोंड कायं केलं. राक्षसासारख्या जाड मिश्या अन "यक्कु" टाईप भिवया... मीच मले वयकू शकत नव्हतो.

मले भल्ला घुस्सा आला. मीनं आलमारीच्या वरचा हिरवा रंग घेतला, पाणी टाकून मस्त कलर बनवला. अन अंदर घुसलो. मांगच्या आंगणात बायको माह्याकडं पाठ करून उभी होती. मीनं मौका सोडला नाही.

रंगाची अर्धीआधिक डबी घेउन बनवलेला रंग तिच्या तोंडाले असा लावला का तिने काही कराचा चानसच देल्ला नायी. थ्या झटक्यामंदीच तिच्या डोळ्यात रंग गेला का तोंडात ते मले समजलच नायी. माह्या अवताराचा मीनं पुरा बदला घेतला असं वाटून मी जोरजोऱ्यात हासाले लागलो. हासता हासता मले एकदम ठसका लागला, कावून का जिले मीनं कलर लावला होता तिच्या मागून मायी बायको पाण्याचं भरणं घेउन येत व्हती. अन तिचा चेहरा एकदम कोरा होता. मले कायी समजेच नायी. घर मायच होतं, साडी बायकोचीच होती, पण थे बायको नव्हती.

मग थे होती कोण?

"भावजी ऽऽऽऽऽऽ" तिचा म्हशीसारखा आवाज आला अन मले समजलं का मीनं घोय केला हाय. बायको समजून सायीले कलर लावला. बायकोचे डोये तशेच लाल झाले. तेव्हड्यात मले मागून कोणितरी धरलं.

"आता लाव तु कलर भावजीले मी पकडून ठेवतो त्यायले" असा आवाज आला अन मले समजलं का माया पैलवान सायाबी आला हाय. मंग काय सांगू राजेहो. मले हालता येत नव्हतं इतकं कप्प पकडलं व्हतं सायानं. पैले मले सायीनं माकडावानी लाल केलं, मंग त्याच्यावर हिरवा कलर लावला. त्यात काच होता का काय होतं काय मायित, पण माह्ये डोये लालेलाल झाले. लाल केस, हिरवं थोबाड, अन लाल डोळे अन लाल दात, असा अवतार केलता. पन तिचं त्यानं समाधान झालं नायी, म्हणून वॉर्निश आणलं. मले समजलं, जर का वॉर्निश लागलं का झालं ..... २-३ दिवस थो कलर निघणार नायी, हे मले समजलं. बर साया नुस्ताच तोंडाले नायी लावणार.... थो तं मौकाच पायून रायला व्हता. मीनं बायकोकडं पायलं पण तिच्या डोळ्यातून तं अंगार बरसत होता... सायानं एक पुडी काढली अन सायीले देल्ली. हे टाक म्हंजे मजा येन. मले समजलं का थो काचकुरी देउन राह्यला होता.  आता माह्यई सहनशक्ती संपली. "काचकुरी" लागली तं झालच काम.... असा इचार केला अन म्या एकदम पैलवानाले झटका देल्ला अन पयालो. जो धावत निगालो तो मारुतीच्या टेकडीकडं. तिकडं जंगलात एकदा घुसलो का मी सापडणार नव्हतो. पण साया अन सायी दोघबी चिडले व्हते. त्यायनं मले मारुतीच्या मंदीरात पकडलं. पण साया थोडासा चुकला अन मी सरळ वडाच्या झाडावर येंगलो.

सायाले झाडावर येंगता येत नवतं. पन २-३ घंटे त्यायनं मायी वाट पायली, मंग भुका लागल्या म्हनून निगून गेले. मी मातर लागलीच उतरलो नायी. २ घंटे मी झाडावरच झोपलो. ३ वाजता उतरून मिनं अंदाज घेतला. थे दोघबी कुटंच दिसले नाही. मंग मी गेलो नदिकडं. मस्त पोयलो, आंघोळ केली, अन उनातच कपडे वायवले. घरी जाचा इचार होत पन साया अजून घरिच हाये असा निरोप मले माह्या दोस्तानं देल्ला, म्हनून मी घराकडं न जाता रानाची वाट धरली. जे भेटन थे खाउन घेतलं. सांजच्या पारी बसस्टॅंडवर लपून बसलो. माह्या अंदाजानं ६ वाजता माया साया, सायी अन बायको येताना दिसली. साडेसाहावाजता एस्टी गेली, अन माया जिवात जिव आला. मी हळुहळू घरी गेलो.

घरी जाउन पायतो तं काय, बायको बाहेरच बसली व्हती. मी दिसलो तशी घरात गेली. मले वाटलं सकायचा राग अजून गेला नायी. पडती बाजू घेउन प्रकरन मिटवाचा विचार कर म्याबी आत घुसलो, तं मले घरात बायको ताट मांडताना दिसली.

"तुमी बसा, मी गरम पुरनपोळी करतो तुमच्यासाठी"

"अवं पन"

"दिसभर तुमी काई खाल्लं नायी, मले भाय दुक झालं. सणाच्या दिशी तुमी उपाशी व्हता" तिनं डोळ्याले पदर लावला.

मले तिचं प्रेम समजलं, पण भावाले अन बहिणीले बोलावलं अन मायी फजित्या केली त्याचा मले राग व्हताच. म्या एकदम चिडलो,

"मंग कायले बलावलं? आपून दोघं मस्त होयी खेयली नस्ती का? "

"मायं चुकलं वो. मीनं फालतू शानपना केला. त्यायले फोन करून बलावलं. पण याच्याफुडं मी तुमी म्हणान तसं करिन. मी माफी मागतो तुमची. तुमी आधी जेवून घ्या.... आता राग नका धरु" तीनं माह्यापुढं हात जोडले, तसा मी पुढं झालो. तिचा हात हातात घेतला अन म्हतलं, " जाउ दे आता. चाल पटकन पुरनपोळी कर.... "

मंग मीनं तिले घास भरवला अन तिनं मले.... अन तिच्या गालावर आपसुकच लाल कलर आला. अशी पैली धुयमाती बिना कलर लावता बायकोले रंगीत करून गेली.

ता. क. :- येंगने = (झाडावर) चढणे.