मनातले

मी हे का नि काय लिहिते आहे हे खरेच मला कळत नाही. मला खरेतर माझ्याबद्दल लिहायचे आहे पण मी माझे वेगळेपण पूर्णपणे विसरून गेले आहे, इतकी मी त्याच्यात हरवून गेलेय. तो नि मी गेली ४दशके बरोबर आहोत लग्नाआधी ७ नी नंतरची ३३ म्हणजे खूप दीर्घकाळ नाही का? पण हा काळ कसा गेला ते कळलेच नाही.

आम्ही एका वर्गात शिकलो,वर्गातला एक हुशार विद्यार्थी,कवी,वक्ता,लेखक,गायक नि आणखी काय काय सांगू , या सगळ्यांची अशी भुरळ पडली नि मी मनाने त्याची कशी झाले ते मलाच कळले नाही.आता मी ३ मुलांची आई आहे, एका नातीची आजी आहे पण यापेक्षाही मी त्याची ती आहे हेच खरे‌ .सुख -दुःखाची व्याख्या मला माहीत नाही, त्याचा प्रसन्न चेहरा हे माझे सुख नि तो सचिंत दिसला की मनाची उलाघाल सांगता येत नाही.तो माझा कसा झाला हे खरेतर मला न उलगडलेले कोडे आहे. माझ्या ध्यानीमनी नसताना त्याने मला सरळ विचारले "माझ्याशी लग्न करशील?"तू मला पत्नी म्हणून आवडलीस, त्या नंतरचे काहीच आठवत नाही.त्यानेच 'पती'' बद्दलची माझी मते घडविली.

पण मी खरीच आशीच होते का, की त्याच्या झंझावाताने मला सावरूच दिले नाही, हे मला अजूनही कळलेले नाही.

----

मी जाणीवपूर्वक आज माझ्या मीपणाचा शोध घ्यावा असे ठरवले आहे. त्याची भेट होण्यापूर्वी मी नुकतीच वयात आलेली मुलगी होते. वयातला बदल शरीरातही जाणवत होता. ̱घरीदारीही आता तू लहान नाहीस असे बोलले जायचे. पण नेमके काय घडले आहे ते कळायचे नाही. मैत्रिणीही माझ्यासारख्याच होत्या. मला गाण्याची आवड होती, आजही आहे. तो तर काय प्रसिद्ध गायक होता. आमच्या स्नेहसंमेलनात मात्र धमालच झाली, गाण्यात माझा पहिला क्रमांक आला, त्याचा दुसरा! आजही तो म्हणतो, तू मुलगी असल्याने सरांनी माझ्यावर अन्याय केला. आता यात माझा काय दोष