अज्ञेय

अज्ञेयाच्या वाटेवरला यात्रिक आहे
जरा तामसी, जराजरासा सात्त्विक आहे

मोक्षासाठी वणवण केली रानोमाळी
अखेर कळले तोही रस्ता कायिक आहे

तसा भेटुनी असेल गेला अनेकदा तो
मला न आले ओळखता, मी नास्तिक आहे

मिठी सोडुनी निघून जाते पहाट होता
सजून येणाऱ्या रात्रीचा लौकिक आहे

हात तिने हातात दिल्याने नकोस हरखू
तिला वाटले कुणी तरी सामुद्रिक आहे

कशास साता जन्माच्या मारतात गप्पा
करार हल्ली लग्नाचा प्रासंगिक आहे

नाहित घटना, नाहित प्रेक्षक, अर्थही नाही
नाटक माझ्या जगण्याचे प्रायोगिक आहे