स्मरेना चेहरा आता...!

...........................................
स्मरेना चेहरा आता...!
...........................................

किती हा काळ वेगाचा; किती हा काळ घाईचा!
स्मरेना चेहरा आता मला माझ्याच आईचा!

जिवाची काहिली शमवायला शोधू कुठे जागा?
मला देशील का पत्ता तुझ्या घनदाट राईचा?

कितीदा वाक्य हे येई नको त्यांच्याच का तोंडी?
'जमाना राहिला नाही तसा आता भलाईचा! '

जुन्या त्या भांडणाची कारणे का शोधशी आता?
इरादा का तुझा आहे नव्याने दिलजमाईचा?

विटेचा प्रश्न कानाआड केला पांडुरंगाने...
'तुला का वीट येईना, अरे एक्याच ठाईचा? '

तुझ्या नावामुळे झाली कशी रंगीत ही जादू ?
लिहू मी लागलो... झाल गुलाबी रंग शाईचा!

तसा आतून-बाहेरून काटेरीच आहे मी...
कशाला जीव गुंतावा पुन्हा माझ्यात जाईचा?

सफाईदार खोटे बोलला आहेस तू आधी...
खुलासाही तुझा; अर्थात हा, आहे सफाईचा!

रमे हा जीव थोडा; तोच होई वेळ जाण्याची...
लळा उशिराच का लागे जगाच्या या सराईचा?

- प्रदीप कुलकर्णी
.............................................
रचनाकाल ः १६ जानेवारी २००९
.............................................