सारेगमप लिटल चँपस

पल्लवी : "नमस्कार आयडीआ सारेगमप लिटल चँपस मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांच स्वागत. आपल्या स्पर्धकांची ओळख तर होईलच, ओळख करून घेउया आपल्या मान्यवर परीक्षकांची. A फॉर अवधुत गुप्ते!!! V फॉर वैशाली सामंत!!!!"

नेहमीप्रमाणे अवधूत सलाम करतो आणि वैशाली दोन्ही हात हलवून अभिवादन करतात.

पल्लवी : "स्वागत करूया आजच्या पहील्या स्पर्धकाचं, आपला फ्युचर मुझिक डायरेक्टर, हिरो आणि गायक हिमेश रेशमिया!!! "

हिमेश येतो.

पल्लवी : "ये बाळ!!! किती गोड दिसतोस रे तू. काय मस्त टोपी आहे रे!!! तुला अशा नवीन-नवीन टोप्या कुठून मिळतात रे? "

हिमेश : "मला कोणीतरी खुप टोप्या घातल्या. तेव्हा पासून मी रोज नवीन टोपी घालतो. "

पल्लवी : "बरं!! तुझे गाल किती छान आहेत. गोबरे गोबरे. तुझ्या गालाचा पापा घेउ? "

पल्लवी एका गालाचा पापा घेते.

हिमेश : "पल्लवी माझा दुसरा गाल राहीला ना!!! "

पल्लवी दुसऱ्या गालाचा पण पापा घेते.

हिमेश : "तू माझ्या गालांचा पापा घेतला, आता मी तुझ्या गालांचा घेऊ? "

पल्लवी : "नको!! तुझी टोपी लागेल ना मला!! मग नको घेऊ हं बाळ. आपण गाणं सुऱू करूया का? "

हिमेश गाणं सुरू करतो.

हिमेश : "ओ.ऽऽ..ओ.ऽऽ..ओ.......ऽऽऽऽ उं ..ऽऽऽऽ उं...ऽऽऽऽऽऽ नांचं रें मोंरां आंब्याच्य्यां वंनांत नांचं!!!! नांचं रें मोंरां आंब्याच्य्यां वंनांत नांचं!!!! कांळां कांळां कांपुंसं पिंजंलां रें....ओ. ऽऽ.. ओ. ऽऽ.. ओ....... ऽऽऽऽ उं.. ऽऽऽऽ उं... ऽऽऽऽऽऽ ढंगांस्गी वांरां झुंजंलां रें!!!!! आता तुझीं पांळीं विंजं देंतें टांळीं फुंलंवं पिंसांरां, नांचं ओ. ऽऽ.. ओ. ऽऽ.. ओ....... ऽऽऽऽ उं.. ऽऽऽऽ उं... ऽऽऽऽऽऽ "

पल्लवी : "मस्त झालं गाण हिमेश!!! आपण कोणा पासून सुरुवात करुया? "

हिमेश : "वैशाली काकू!!! "

वैशाली : "हिमेश, कित्ती गोऽऽड दिसतोस रे तू!!! तुला मी लाडू म्हणू का? अगदी लाडवासारखा दिसतोस!!! आणि अगदी लाडवा सारखाच गायलास!!! एकदम गोऽऽड!!!! तू वरती मान करून गातोस तर तुझे वरचे सूर खुप छान लागतात. आज खालचे सूर पण मस्त लागले!!! एक्स्प्रेशन्स थोड्या टोपी मुळे कळाल्या नाहीत. पण अजून हव्यात. नाच रे मोरा म्हणतांना चेहरा कसा आनंदी हवा!! 'कर्ज' ची वसुली करायला माणूस आल्यावर कसा चेहरा होईल तसा आत्ता झाला. तर लक्षं ठेव. बाकी गाणं मस्त झालं. "

पल्लवी : "अवधूत!!!! "

अवधूत : "तोडलंस मित्रा, तोडलंस!!!! झकास!!! बेष्ट गाणं झालं, बेष्ट!!! काय गायलास!! अरे, मोर काय, कुत्रे आणि गाढवंसुद्धा नाचतील.!!! तुझ्या सारखी टोपी घातली असती तर अशी टॅक करून फेकली असती. म्हण ए अवधूत दादा!!! "

हिमेश :"ए अवधूत काका! "

अवधूत : "म्हण ए अवधूत दादा!!! "

हिमेश :"ए अवधूत काका!!!! "

अवधूत : "हे असं चांगलं नाही हं!!! वैशाली काकू, मी काका आणि पल्लवीला नुसतं पल्लवी. असं का? "

हिमेश :"तुला दाढी आहे ना, म्हणून तू काका!! आणि पल्लवी नेहमी संतूर वापरते म्हणून पल्लवी!!! "

अवधूत : "बरं!! म्हण ए अवधूत काका!!!! "

हिमेश :"ए अवधूत काका!!!! "

अवधूत : "मी कसा गायलो, असं तुला गाता येईल का? मला 'नी' दे 'नी'!!!!"

हिमेश :"मी कसा गायलो, असं तुला गाता येईल का? मला 'नी' दे 'नी'!!!! "

अवधूत आणि वैशाली दोघेपण 'नी' देतात.

पल्लवी : "वा हिमेश!!! 'नी' मिळाला!!! वा खुप छान!!"

हिमेश :"अवधूत काका, मी एक विचारू??? तुला कसं कळालं की मी माईक तोडला??? "

आई: "अरे तू रीमोट पाडलास!!! बंड्या उठ सारेगमप संपलं"

बंड्या : "नाही, मी तोडला!!!! "

आई: "बंड्या, मेल्या ऊठ आता. संपलं एकदाचं ते लिटल चँप. आता उद्यापासून लौकर झोपायचं. "

बंड्याने निमूटपणे झोपेतच रीमोट उचलला आणि परत आतल्या खोलीत जाऊन झोपला!!!