गझलेतील अलामत

सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की स्व. सुरेश भटांची 'मराठी गझलेची बाराखडी' वाचायला उपलब्ध झालेली नसती तर मला 'अलामत भंगणे' हे 'नैसर्गीकरीत्या काही जाणवणे' अश्या पद्धतीने कदाचित थोडेसे वाटू जरी शकले असते  तरी स्पष्टपणे किंवा व्यवस्थितपणे असे काही असते हे कळले कधीच नसते. ( 'थाटला आहे' व 'खेटला आहे' यातील 'आ' व 'ए' खटकणे नैसर्गीकरीत्या कदाचित होऊही शकेल, पण 'अलामत' गझलेत अत्यंत महत्त्वाची आहे हे बाराखडी वाचल्याशिवाय मला समजले किंवा माहीत झाले नसतेच. काहीतरी खटकले असे म्हणून दुर्लक्ष झाले असते किंवा कदाचित मुळीच खटकलेच नसते. )

पण ते शिकल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला ज्यावर याबाबतीतील तज्ञ लोकांनी मत द्यावे अशी विनंती. आपल्या मत देण्यामुळे फक्त माझे शंकानिरसन किंवा समाधान होणार आहे हे आधीच स्पष्ट करतो. ही फक्त एक नम्र शंका आहे.

तो विचार माझे अत्यंत आवडते गझलकार श्री मिल्यासाहेब यांच्या 'स्वप्न एखादे जणू' गझलेच्या प्रकाशनानंतर माझ्या मनात आला. अर्थात श्री मिल्यासाहेब यांनी मी तेथे विचारलेल्या शंकेचे समाधानकारक ( तांत्रिकदृष्ट्या ) निरसन केलेच आहे. पण तरीही मला तो प्रश्न अजूनही पडतो.

त्यात काफिया होतेः

चालले
कोसले
गोठले
तोडले
मांडले
रागावले
उमलले ... वगैरे

त्या गझलेत 'रदीफ' नव्हती.

अर्थातच, त्या गझलेतील 'अलामत' ही तांत्रिकदृष्ट्या 'अ' अशी होती.

माझी शंका -

ज्या गझलेत रदीफ नाही व 'न बदलणाऱ्या अक्षरसमुहाच्या' आधीचे अक्षर 'अ'कारांत आहे त्यात त्या 'अ' च्या आधीचा स्वर जास्त प्रभाव पाडत नाही काय?

म्हणजे 'चालले' तील 'चा' मधील 'आ' हा 'चालले' या शब्दातील सर्वात प्रभावी उच्चार वाटत नाही काय?

समजा आपण अशी ओळ उच्चारलीः

'चारचौघांसारखे आयुष्य माझे चालले'

तर यातील 'चा', 'चौ', 'घां', 'सा', 'खे', 'आ', 'ष्य', 'मा', 'चा', 'ले'  हे उच्चार ठळकपणे जाणवतात असे माझे मत आहे. यातील शेवटचा 'चालले' हा शब्द काफिया असल्यामुळे त्यातील 'न बदलणारा अक्षरसमुह' जो 'ले' आहे तो सोडला तर 'ल' या अक्षरापेक्षा 'चा' हे अक्षर जास्त प्रभावीपणे उच्चारले जाते. 'चालले' मधील 'ल' वर जेवढा जोर दिला जाईल त्याहून जास्त जोर 'चा'वर दिला जाईल. मग त्यानंतरचा काफिया ( कोसले ) जर 'आ' असा न येता 'ओ' ही अलामत घेऊन आला तर काहीतरी बदलल्याची जाणीव होत नाही काय?

उदा. -  'पाडले' व 'रोखले' यात 'आ' व 'ओ यात काहीतरी भिन्नता आहे असे वाटत नाही काय?

चर्चेच्या प्रस्तावामधील माझे मतः

ज्या गझलांमध्ये रदीफ नसेल व 'अ'कारांत अक्षर 'न बदलणाऱ्या अक्षरसमुहाच्या आधी' असेल त्या गझलांमध्ये 'अलामतीचे अक्षर' हे त्या 'अ' च्या आधीचे अक्षर का समजले जाऊ नये?

हे मत मांडण्याचे कारण - अलामत ही उच्चारावर ठरते. जो उच्चार अधिक प्रभावी असेल त्याला अलामतीचा उच्चार म्हणावेसे वाटते. तसेच जो उच्चार करताना त्या उच्चाराला कवीकडून किंवा ऐकणाऱ्यांकडून नैसर्गिकरीत्याच काही महत्त्व दिले जाणार नाही अशी अशक्त अलामत ( जसे 'अ' ) टाळावीशी वाटणे.

सर्वांच्या मतांचा आदर आहे.

धन्यवाद!