शहारा

पळणे इतके मुरून गेले
जरा थांबता... थकून गेले

गप्पा रंगत आल्या अन मी -
कशी अचानक उठून गेले?

मनात डोकावले; दचकले
किती किडे वळवळून गेले!

अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले

जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू सावरून गेले...

कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"

आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?

हा देहाचा सुंभ राहिला
पीळ मनाचे जळून गेले!

श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?