'संतसूर्य तुकाराम', आनंद यादव आणि साहित्य संमेलन

काट्याचा नायटा होऊन पार पाय कापायला लागावा, आणि पाय कापूनही रोगी दगावावा, तसे या बाबतीत झाले.

'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीवर वारकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर आनंद यादवांच्या प्रतिक्रियांच्या चार पायऱ्या होत्या.

पहिली पायरी मग्रुरीची होती. "या खुळ्यांना कादंबरी कशी वाचायची हे कुणीतरी शिकवले पाहिजे. त्यांना माझ्याकडे येऊंद्यात, मी शिकवेन" ही पहिली पायरी (वृत्तपत्रांत आलेली). बरोबरच आहे. एव्हाना संमेलनाध्यक्षाची निवडणूक पार पडली होती आणि ते जिंकलेले होते. त्यामुळे नम्रपणा दाखवायचे कारण नव्हते.

पण कुत्र्याला हाकलायला म्हणून दगड भिरकवावा, आणि तो मधमाश्यांच्या पोळ्यावर जावा अशी त्यांची अवस्था लौकरच झाली. मेहताशेठच्या दरबारात नेऊन सोडवण्यासारखा हा प्रश्न नव्हे हे उमगल्याबरोबर त्यांनी दुसरी पायरी ओलांडली. माफी तर मागितलीच, पण लगेच अख्खे पुस्तकच मागे घेऊन टाकले.

पण वारकरी कसले खट. त्यांचे काही समाधान होईना. थेट 'संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा' या मागणीवरच ते अडून बसले. पण एवढ्या नवसासायासांनी मिळवलेली ही ओसाडगावची जहागीर अशी सुखासुखी कोण सोडील?

जरा वाट पाहून यादवांनी तिसरी पायरी ओलांडली. थेट देहू गाठले, आणि तुकाराम मंदिरात आपला माफीनामा सादर केला.

पण तिथे वारकऱ्यांनी अजूनच वरच्या सप्तकातला सूर लावला. वातावरण निवळेपर्यंत यादवांना दोन तास गाडीतच बसून राहावे लागले. आणि शेवटी देवळात जायला खाली उतरले तिथे घोषणाबाजीचे व धक्काबुक्कीचे प्रकार घडले. एकदाचा माफीनामा सादर करून यादव पुण्याला परतले.

पण वारकरी मागे हटायला तयार नव्हते. 'डाऊ'सारख्या आंतरराष्ट्रीय आस्थापनेला चेपल्यामुळे त्यांचा धीर चांगलाच वाढला होता. संमेलनात येऊन 'गाथा पारायण' करण्याचा निश्चय त्यांनी पुनःपुन्हा जाहीर केला.

अखेर शेवटची पायरी गाठत यादवांनी राजीनामा जाहीर केला.

एव्हाना सगळी वृत्तपत्रे त्रयस्थपणे घडल्या गोष्टीचे reporting करण्यात मग्न होती. पण चौथी पायरी ओलांडल्यावर 'सूत्रे हाती न घेतलेला अध्यक्ष राजीनामा देतो' यातले नाट्य ठळक होऊ लागले. यादव हे 'परिवारा'तले समजले जातात असा शोध लावून, आणि 'परिवारा'तून यादवांना काहीही पाठिंबा मिळाला नाही हे पाहून, 'लोकसत्ता'ने हा विषय गाजवायला घेतला. 'अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर यादव कसे "याखेरीज मला काहीही बोलायचे नाही" असे म्हणून निघून गेले', 'यादवांचे निकटवर्तीय कसे मराठी साहित्यिकांनी यादवांना पाठिंबा न दिल्यामुळे दुःखी आहेत', 'पुल-कुसुमाग्रज-तेंडुलकर असते तर त्यांनी कशी यादवांची बाजू घेतली असती' (इति यादव निकटवर्तीय) असले रकाने रंगवायला सुरुवात केली.

इथून वेगवेगळ्या प्रश्नांचे भुईनळे फुटायला सुरुवात झाली.

पहिला प्रश्न म्हणजे, यादवांची साहित्यातली इयत्ता काय? दुसरा प्रश्न म्हणजे, अध्यक्षपद वाचवण्यासाठी त्यांनी कादंबरी मागे घेण्याइतके लोटांगण घालणे योग्य होते काय? तिसरा प्रश्न म्हणजे, या अध्यक्षपदाची नक्की काय किंमत उरली आहे? चौथा प्रश्न म्हणजे, हे संमेलन भरवणाऱ्यांची लायकी काय?

माझ्या मगदुराप्रमाणे या प्रश्नांची उत्तरे देतो. हा चर्चेचा प्रस्ताव असल्याने त्यावर वाद झडावा ही अपेक्षा.

पहिला प्रश्न. यादवांची साहित्यातली इयत्ता काय? इथे माझे मत नोंदण्याआधी शंकर सारडांनी यादवांच्या साहित्याबद्दल काय म्हटले ते बघू. सारडा हे संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत यादवांचे प्रतिस्पर्धी होते हे खरे असले तरी ते समीक्षक म्हणूनही नावाजलेले आहेत. तर सारडांचे म्हणणे की यादव ग्रामीण साहित्याच्या नावाखाली एकच कादंबरी पुनःपुन्हा लिहितात.

माझे मत असे, की त्यांनी 'कलेसाठी कातडे' हा जो मलविसर्जनाचा प्रकार केला, तो त्यांची साहित्यातली इयत्ता जी असेल तिच्यात किमान काहीशे पायऱ्यांची घसरण करवणारा ठरला. वैयक्तिक हेवेदावे जमतील तेव्हा आणि तिथे तंडवणे ही मानसिक प्रवृत्ती आहे हे मान्य. पण विरुद्ध बाजूची व्यक्ती शरपंजरी पडलेली असताना (तात्या माडगूळकर तेव्हाना dialysisच्या दुष्टचक्रात अडकले होते; त्यानंतर लौकरच त्यांचे निधन झाले) अशी विष्ठा कागदावर उतरवणे हा स्वतःच्या 'साहित्यिक'पणाचा स्वतःच केलेला शिरच्छेद म्हणावा असे मला वाटते.

दुसरा प्रश्न म्हणजे, अध्यक्षपद वाचवण्यासाठी त्यांनी कादंबरी मागे घेण्याइतके लोटांगण घालणे योग्य होते काय? या प्रश्नाला माझे निःसंदिग्ध उत्तर - "नाही". लेखक जेव्हा काही लिहितो, आणि ते छापण्याच्या पातळीला पोहोचते, तोपर्यंत 'ते छापायचे की नाही' हा विचार करता येतो. एकदा छापल्यानंतर मग (काही महिन्यांनी) ते मागे घेणे ही स्वतःशी केलेली प्रतारणाच होय. अगदी रश्दी, नसरीन अशी जागतिक पातळीवरची नामावली घेतली नाही, तरी 'सखाराम', 'घाशीराम' याबद्दल तेंडुलकरांना वा 'सती' बद्दल पुंडलिकांना काही कमी मनस्ताप सहन करावा लागला नाही. आणि संमेलनाध्यक्षपद वाचवण्यासाठी म्हणून असे करणे हा तर कूपमंडूक संधीसाधूपणाचा कळसच झाला. शेवटी यादवांचे गाढव आणि ब्रह्मचर्य दोन्ही गेले हा भाग निराळा.

तिसरा प्रश्न म्हणजे, या अध्यक्षपदाची नक्की काय किंमत उरली आहे? एक वाचक म्हणून माझे मत असे, की हे तथाकथित साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्षपद हे दोन्ही केव्हाच संस्थानिकांप्रमाणे कालबाह्य झालेले आहेत. तरीही अजून जसे काही संस्थानिकांचे भाट त्यांची जीहुजूरी करण्यात धन्यता मानतात, तसे इथल्या साहित्यिकांचे पित्ते त्यांचा गणपती बसवायला निघतात.

एकंदरीतच मराठी साहित्याची अवस्था भीषण आहे. 'अठरा लक्ष पावलं' यासारख्या पुस्तकाची पुढची आवृत्ती निघायला दशके उलटावी लागतात. 'शेलूक' सारखे पुस्तक, 'रात्र थोडी सोंगे फार' सारखा अनुवाद, र वा दिघ्यांची ग्रंथसंपदा, हे आता केवळ स्मरणातूनच जागवायचे. ज्या पु ल देशपांड्यांना उद्धृत केल्याशिवाय बहुसंख्यांचे पान हलत नाही त्या पुलंनी केलेला 'काय वाट्टेल ते' सारखा सरस अनुवादही विस्मरणाच्या गर्तेतच आहे.

आणि याबाबतीत काहीही न करणाऱ्या संमेलनाला आणि त्याच्या अध्यक्षपदाला काहीही किंमत असणे शक्य नाही.

'संमेलनाच्या निमित्ताने अमुक लक्ष रुपयांची ग्रंथविक्री होते' असे 'समर्थन' करण्याचा काहींचा यत्न असतो. पण त्यामध्ये संमेलनाचा वाटा किती? ग्रंथविक्री करण्यासाठी 'अक्षरधारा' आणि त्यासारख्या प्रदर्शनांनी जे कार्य केले आहे, त्या बैलगाडीखालून या संमेलनाचे कुत्रे चालवण्याची गरज काय?

चौथे म्हणजे हे संमेलन भरवणाऱ्यांची लायकी काय? कौतिकराव ठाले-पाटील या व्यक्तीचा साहित्याशी संबंध काय? साहित्य महामंडळावर कुणाची वर्णी लावायची हे कोण ठरवतो? त्या महामंडळाची घटना काय? सुरुवातीच्या काळातली साहित्यसंमेलने ही तर केवळ खाजगी होती. पुढे त्या प्रक्रियेचे लोकशाहीकरण झाल्याची अंधश्रद्धा पसरवली गेली. आजही बहुतेकजण या अंधश्रद्धेचे बळी आहेत.