यशस्वी कवी

कवीचे यशस्वी होणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. कविता चांगल्या असणे , हृदयाला भिडणाऱ्या असणे हा एक भाग झाला. इतरही अनेक गोष्टींनी कवी प्रसिद्ध होताना दिसतात.
समजा, एखाद्या कवीच्या १०० पैकी १० रचना चांगल्या आहेत. त्या वारंवार लोकांसमोर आल्या तर साहजिकच तो कवी चांगला गणला जातो. मात्र, दुसऱ्या कवीच्या १०० पैकी ५० रचना चांगल्या आहेत पण काही कारणाने त्या लोकांसमोर नाही आल्या तर तो कवी तितका यशस्वी ठरत नाही.
........
काही कवी सर्वात यशस्वी विषय घेऊन कविता करताना दिसतात. सांप्रदायिक भाव जपून कविता करणारेही त्या त्या समाजात यशस्वी होताना दिसतात.
.......
सततच्या वादग्रस्ततेमुळे प्रसिद्ध होणारे कवीही आहेत.
.......
५० ठिकाणी एकच कविता सादर करून 'चांगला कवी' म्हणून गणले जाणारेही आहेत.
.........
कुणातरी प्रसिद्ध कवीच्या छत्र-छायेखाली राहून - त्या प्रसिद्ध कवीला आणखी मोठे करून - त्या आधारे स्वतःही मोठे होणारे कवीही आहेत.
......
एक म्हैस (कोकणातली नव्हे.. पूलंची नक्कीच नव्हे) जेवढे लिटर दूध आठवड्यालाही देत नसेल तेवढ्या कविता दिवसाला करणारे कवी महानच म्हटले पाहिजेत. तसेच, आटलेल्या म्हशीप्रमाणे वर्षातून एखाद-दोन कविता लिहून तपश्चर्येचे महत्त्व समजाविणारेहे कवी आहेत. एखाद्या गाजणाऱ्या विषयावर 'यमके' जुळवून आयुष्यात एखादी कविता... (म्हणजे ती कविता आहे असे ते म्हणतात) रचणारे उल्का कवीही आहेत.
इतर नवोदित कवींचा आधार घेऊन स्वतः मोठे होणारे कवीही आहेतच.
असो. हे कवीपुराण न संपणारे आहे. परंतु, यशस्वी कवी आणि उत्तम काव्य यातील विसंगती हे या चर्चेचे मुख्य कारण आहे.

(शब्द सारे भेटले या माझ्या कवितासंग्रहातील काव्यविषयक मनोगतामधील काही परिच्छेद.....)