वासना जातात कोठे, काय की!

काय नवलाई? तुझेही चालते!
औषधांनी वांझ बाई व्यायते

हात कोमल केवढा आहे तुझा!
पण तरीही अंग माझे भाजते

'स्वप्न आहे मी तिचे' ती सांगते
प्रश्न हा, ते ती कधी साकारते!

भान वस्त्रांचे कुठे कवितेस या?
ती नको तेथे कशीही नाचते

मी कसे ते चालवावे सांग ना?
ते 'तुझे' डोके असावे वाटते!

बोलतो मी आज ते नोंदून घे
की प्रमेयासारखे टिकणार ते

ती नशा आहे तुझ्या विजयात की
त्याचसाठी एक व्यक्ती हारते

तू बरा आहेस हे मी जाणतो
सोड त्यांना, 'साथ जे देतात ते'

मी शहाण्यासारखा वागू कसा?
समजणारे कोण आहे सांग ते?

नाव पाठीशी असावे नेमके
ऐकले नाही कधी जे नाव ते

माहिती आहे तरी बोलू नका
रोज येथे कोण कचरा टाकते

माहिती आहे तरी बोलू नका
रोज येथे कोण गझला टाकते

तेवढे द्या दुःख मित्रांनो मला
जेवढे हृदयात माझ्या मावते

पश्चिमेला जोडते पुर्वेसवे
काय सांगू काय तीही चालते !

कोठच्या कोठे अता मी पोचलो
पण तरी रक्तात आहे बाळ ते

जिंदगी वा ती असो, उत्सूकता !
कोणचा पोशाख आता घालते!

नीट घेतो उचलुनी मजला स्वतः
राहते खालीच, काही सांडते

भाळतो मीही कधी माझ्यावरी
अन कधी माझ्यावरी ती भाळते

काय परमानंद झाला सांग ना?
आरसा फुटला तुझा की काय ते?

वासना जातात कोठे काय की!
वेळ येता जिंदगी ही वारते!