धागे उभे आडवे..

मनुष्य अनुभवाच्या साठ्यातून वेचून लिहितो म्हणतात. 'म. ला. व्यं. ' (महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पुलं ) च्या लिहिण्यावर इतकं लिहिलं गेलंय की आणखी लिहिणं म्हणजे पांढऱ्यावर (आणखी) काळं करणं..

पण तरीही पुलंचे  वाङ्मय वाचलेल्या वाचकास त्यांच्या लिहिण्यात अटळ पुनरावृत्ती आढळते. तसे पुलं म्हणजे 'उत्कट, भव्य त्या सगळ्यासमोर झुकणारे' - गुण गाईन आवडी, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत या सगळ्या पुस्तकांतून हा गुण दिसून येतो.

हे सारं साहित्य पुन्हा पुन्हा वाचताना त्यांचे एकमेकांत गुंतलेले धागे मिळाले, त्यांची गाथा -

सहजच सांगायचं तर त्यांचे फणसळकर मास्तर (गणगोत) थेट चितळे मास्तरांशी नातं सांगतात. फरक इतका की मास्तर नसलेल्या फणसळकरांना चितळे मास्तरांच्या माध्यमातून पूर्ण मास्तरकीचा दर्जा दिला. बाकी ऐवज तोच - स्वातंत्र्यपूर्व काळातले ध्येयवादी विचार - मुलांचं कल्याण व्हावं ही निरपेक्ष आणि मनोमन इच्छा - शेवटची ओळ पुरी करण्यास देणे हाही एक असाच जोडणारा दुवा.

त्यातून आभारप्रदर्शनाचा प्रसंग बापू काणेच्या आभारप्रदर्शनाची उगाचच आठवण करून देतो.

रामूभय्या दातेंच्या लेखात पुलंनीच त्यांच्या (दातेंच्या) व्यक्तिरेखेवरून 'तुझे आहे' चा काकाजी घेतला आहे का अशी विचारणा झाल्याचे म्हटले आहे. साहित्यिक चमत्कृतीतून त्यांनी हे नाकारले तरी काकाजींवरचा रामूभय्यांचा ठसा पुसताच येत नाही. तो इंदोरचा 'मझा' - दिलदारी, जीवन रसरसून जगण्याची इच्छा - सगळे षोक करून कसलाही 'शोक' न करणारा माणूस - बस बस; अजून काही सांगायची गरज नाही..

ब. मो. पुरंदरे अर्थात हरितात्या - दोघं इतिहास जगणारी माणसं, दोघेही इतिहासाला रुक्ष रुमालात बांधून न ठेवता प्रत्येक क्षणाची महती आपल्या खास शैलीत सांगून अंगावर रोमांच उठवणारे.. पुरंदरेंच्या व्यक्तिचित्रात पुलंच्या आजोबांचे (ऋग्वेदी) संदर्भ घातले की हरितात्या तयार..

चिंतामणराव कोल्हटकर खुशीत आले की समोरच्याला 'मिस्टर' असं संबोधत हे वाचताना परोपकारी गंपू नजरेआड करता येणार नाही.

*%&#* .. अर्थात रावसाहेब - रांगडे, कोणाचीही भीडभाड न बाळगणारे व लौकिकार्थानं 'फुकट' गेलेले. त्यांचा रंग बहुदा 'बबडू'त मिसळला आहे. बबडू घरी भेटल्यामुळे त्याची भाषा जरा नियंत्रणाखाली असते; रावसाहेबांचा सगळाच व्यवहार खुल्लमखुल्ला... वरून रांगडे व रोखठोक पण आत कुठेतरी शैशव जपणारे व लहान मुलाच्या उत्सुकतेने जगाकडे बघणारे - बहुदा दोघांचेही शैशव उद्ध्वस्त झाल्यानं...

अंतू बर्वा हा पुलंचा तुफान लोकप्रिय झालेला स्वयंभू विनोदी प्रकार. याचं मूळ कुठे असेल याची उत्सुकता मलाही होती, आणि गणगोतमधील आप्पा (पुलंचे श्वशुर) वाचल्यावर तेही कोडं सुटलं. त्यातूनच मग 'जावयबापू'ची गाठही उकलली. जावयाच्या भूमिकेतून जे कोकण बघितलंय तसंच नेमकं अंतू बर्व्यात उतरलंय यात शंका नाही.

शेवटला उल्लेख 'दिनेश'चा. पुलंनी त्यांच्या मेव्हण्याच्या लहानशा मुलाचं व्यक्तिचित्र रेखाटण्यामागे त्या मुलास त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर वाढवले हा इतिहास आहे, पण कदाचित आपल्या स्वतःच्या संसारवेलीवर न फुललेल्या फुलास पाहण्याची आसही त्यातून दिसते...