म्हणू नका रे....

पिल्लांस मांजराच्या छावा म्हणू नका रे,
हे बोल कळकळीचे, कावा म्हणू नका रे

 
सामोपचार ठेवा, ठेवा सदा जिव्हाळा,
होताच खुट्ट लावू, दावा म्हणू नका रे


ही काळजे सशाची येतील काय कामा?
पडताच पान कोठे, धावा म्हणू नका रे


ती बासरी निराळी, फुंकून प्राण गाते,
(पुंगीस गाजराच्या, पावा म्हणू नका रे)


हे मोल कौतुकाचे ध्यानी असो जरासे,
फाजील लेखनाला, वा वा म्हणू नका रे


दोन्ही करात आहे सामर्थ्य प्रार्थनेचे,
उजवा कुणी, कुणाला, डावा म्हणू नका रे

--अदिती
( २६ जून २००७,
निज ज्येष्ठ शुद्ध ११, शके १९२९)