पत्ता सांगण्याची चमत्कारिक पद्धत!

मी आत्तापर्यंत कमीतकमी पन्नास वेळा हा अनुभव स्वतः घेतल्यावर व त्यावर समविचारी अशा काही मंडळींशी साधारण दोन तीन वेळा पोटतिडकीने चर्चा केल्यावर आता मनोगतावर हा चर्चेचा प्रस्ताव मांडू इच्छितो. आपण आपली मते द्यावीत अशी विनंती.

संभाषण चातुर्याचा पूर्ण अभाव असणे किंवा आपण घोळ घालत आहोत याची जाणीवच न होणे किंवा दुसरा आपले म्हणणे आपल्याइतकेच व्यवस्थित समजू शकतो ( आपण आपले म्हणणे समजू शकतो इतके ) अशा प्रवृत्तीमधून अशा प्रकारच्या अत्यंत चीड आणणाऱ्या घटना घडतात. ( अर्थातच चीड येणे ही त्यावरील माझी प्रतिक्रिया आहे. )

एखाद्याला भेटायचे असल्यास बरेच वेळा तो 'एखादा' त्याचा पत्ता असा काही सांगतो की रागच येतो. त्यातील काही विधानेः

इकडून सरळ खाली या ---- ( खाली म्हणजे काय ? ) ( सरळ खाली म्हणजे काय? )

चौकात डावीकडे वळा ...... ( चौकातील कोणत्या रस्त्यावरून आपण येणार हेच माहीत नसतानाचे हे विधान )

त्या चौकातच दुसरी बिल्डिंग - (चौकाला चार रस्ते आहेत. त्यातील कुठल्या बाजूच्या बिल्डिंगमधील दुसरी? )

त्या बेकरीपाशी कुणालाही विचारा - ( बऱ्याच वेळा कुणीच सांगू शकत नाही. )

माझ्यामते पत्ता सांगताना अतिशय सोपा करून सांगणे शक्य आहे.

विभाग सांगणे - जसे कोथरुड, बिबवेवाडी वगैरे
रस्त्याचे / चौकाचे नाव - जर रस्ता किंवा चौक प्रसिद्ध असेल तर. ( पुण्यातील सर्वात महत्त्वाच्या चौकांपैकी एक, डेक्कन कॉर्नर चौक याचे नामकरण 'खंडुजीबाबा चौक' असे आहे. त्या नावाने शेंबडा मुलगा सुद्धा त्या चौकाला ओळखत नाही. )
मोठा लँडमार्क सांगणे - एकलव्य कॉलेज वगैरे
लहान लँडमार्क सांगणे - गुरू गणेश नगर वगैरे
तिथून नेमका पत्ता सांगणे - ( जसेः समोरच्या / डावीकडच्या तिसऱ्या गल्लीतील उजवीकडचे चौथे घर, नाव सो अँड सो )

मी नुकतेच सातारा रोडवरील एका माणसाला भेटण्यासाठी प्रचंड उलटापालटा फिरल्यानंतर व चार फोन केल्यानंतर पाचव्या फोनच्या वेळेस त्याच्या त्याच्या तोंडावर बुद्धीचे वाभाडे काढले अन मग त्याला भेटू शकलो. त्याच्या ऑफीसपाशी दोन मोठ्ठी हॉटेल्स होती, एक मोठे थिएटर होते, एक पेट्रोल पंप होता, एक सिग्नल होता. एवढे असून तो मला फक्त "बिबवेवाडीच्या कॉर्नरलाच आहे, त्याच चौकातील दुसरी बिल्डिंग आहे, तुम्ही खूप पुढे गेलात, तुम्ही तिकडे गेलात - इकडच्या बाजूला या, कुणालाही विचारा" वगैरेच करत बसला होता.

चर्चेचा प्रस्ताव हा की पत्ता व्यवस्थित सांगण्यासाठी एक किमान बुद्धी लागते काय? अन तसे असेल तर त्याचे क्लासेस काढावेत काय? की व्यवस्थित पत्ता न सांगणाऱ्यांना ब्रेक नसलेल्या मोटारमध्ये डांबून बसवून तिला पाचव्या गिअरमध्ये टाकून सोडून द्यावे? जातील तेथे जातील! फिरतील लेकाचे! आपल्याला फिरवतात तसे!