जुन्या निवडणुकीतील गमती-जमती...

१९५२ मध्ये प्रथम संसदेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. त्यानंतर १९५७. १९५७ मध्ये मी जेमेतेम सात वर्षांचा होतो. मला आई बरोबर मतदानास गेलेले आठवते. त्यावेळी, मतपत्रिकेवर उमेदवरांची नावे नसत. एकच मतपत्र असे. विविध उमेदवारांसाठी वेगवेगळ्या मतपेट्या असत. त्यावर त्या त्या पक्षाच्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह रंगवलेले असे. आपले मतपत्र आपणास हव्या असणाऱ्या मतपेटीत टाकले जाई. कित्येक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराखेरीजच्या मतपेट्या रिकाम्याच येत. एक वदंता अशी होती, की इतर पेट्यातील मतपत्रे काँग्रेसच्या मतपेटीत वर्ग केली जात. अर्थात हे केवळ काँग्रेसच्या बाबतच होत असेल असे नव्हे! जेथे ज्या पक्षाचा जोर तेथे त्या पक्षाबाबत तसे होण्याची शक्यता! (सर्वात मोठा पक्ष मात्र काँग्रेसच असे. इतर पक्ष फक्त तोंडी लावण्यापुरते!) पुढे ही पद्धत बदलली.

निवडणूका म्हणजे मतदारांची आळवणी! त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा तयार केल्या जातात. त्यात सुंदर काव्य देखील दिसे. अशाच काही जुन्या घोषणा मनोगतींसाठी मनोरंजक वाटतील म्हणून येथे देत आहे. 

तत्कालीन जनसंघाची १९६२ मधील घोषणा पहा- " चीन के हमले होते हैं/ नेहरू-मेनन सोतें हैं/ सोते हैं तो सोने दो, जनसंघ को आगे आने दो/"

जनसंघाचीच दुसरी घोषणा होती- "रोटी भाजी दे न सके, वो सरकार निकम्मी है/ जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है/"  आणि त्याला काँग्रेसचे उत्तर होते -" जनसंघके दीप में तेल नहीं, सरकार बदलना खेल नहीं/" (त्या वेळी 'दीप' हे जनसंघाचे निवडणूक चिन्ह होते.)

१९६७ मध्ये स. का. पाटील मुंबईमधून उभे होते. पाटील म्हणजे काँग्रेसमधील बडे प्रस्थ! त्या वेळच्या केंद्रीय मंत्रींमंडळात ते अन्नमंत्री होते. मुंबईतून तीनदा निवडून गेलेले! ते सहज निवडून येणार हे नक्की होते. त्यांच्याविरुद्ध समाजवादी पक्षातर्फे (प्रजासमाजवादी की संयुक्त समाजवादी, आता आठवत नाही.) जॉर्ज फर्नांडीस! कामगार पुढारी! त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी फलक लावले - " तुम्ही पाटलांना पाडू शकता! " आणि आश्चर्य म्हणजे पाटील पडले, जॉर्ज आले!

आचार्य अत्र्यांनी साहित्यीक, नाटककार, पत्रकार म्हणून नाव कमावले होतेच! पण राजकारणही गाजवले! एकदा ते पुण्यातून उभे होते. समोरचा उमेदवार होता काँग्रेसचा- ढमढेरे आडनावाचा! अत्रे गरजले. - " अरे, ज्याच्या नावात एक ढ आणि एक मढ आहे त्याला कशाला निवडून देता?" अर्थात हा अत्यंत हीन दर्जाचा विनोद होता. पण अत्र्यांना कशाचाच विधिनिषेध नसे!

बहुदा १९७२ ची घटना असावी. इंदिरा कॉग्रेसला दोन तृतियांश बहुमत मिळाले. अनेकांच्या मनात इंदिरा काँग्रेसने काहीतरी जबरदस्त घोटाळा करून हा विजय मिळवला आहे अशी शंका होती. एक शक्यता अशी वर्तवण्यात आली होती की मतदारांनी दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उठवलेला शाईचा शिक्का गायब होऊन त्या ऐवजी गायवासरू (त्यावेळचे इंदिरा काँग्रेसचे निवडणूक चिन्ह) च्या चिन्हावरील शाई आपोआप उमटली. खरे खोटे कधीच सिद्ध झाले नाही! पण त्या वेळी बाळ ठाकरे उद्गारले होते,"हा विजय ना गाईचा, ना बाईचा( इंदिरा), हा विजय शाईचा!!"

असे अणखीही किस्से जुन्या-जाणत्यांना आठवत असतील.